गोवा : ‘बागायतदार’च्या चाव्या सावईकरांकडेच!

संचालक मंडळावर निर्विवाद वर्चस्व : १२ जागांवर उमेदवार विजयी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
12 hours ago
गोवा : ‘बागायतदार’च्या चाव्या सावईकरांकडेच!

गोवा बागायतदार सहकारी खरेदी-विक्री संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर यांच्यासह संचालक मंडळावर निवडून आलेले उमेदवार.

फोंडा :
गोवा बागायतदार सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या संचालक मंडळावर विद्यमान अध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. एकूण १९ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. त्यात दोन महिलांसह सात उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित १२ जागांवर सावईकर पॅनलचे उमेदवार निवडून आले. ही निवड २०२९ पर्यंत पाच वर्षांसाठी आहे.

सहकार खात्याचे अधिकारी राजू मगदूम यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. कुर्टी येथील सहकार भवनमध्ये मंगळवारी मतमोजणी​ करण्यात आली. या १२ जागांमध्ये सावईकर गटाने बाजी मारली आहे. त्यात व्यंकटेश उर्फ गौतम मोने, रोहन सावईकर, शुभदा सावईकर, जितेंद्र पाटील, पांडुरंग पाटील, रमेश प्रभू दाभोळकर, पंढरीनाथ चाफाडकर, हेमंत कथने, विकास प्रभू, समीर सामंत, नरेंद्र सावईकर, महेश शिलकर अशा एकूण १२ जणांची संचालक मंडळावर निवड झाली आहे.

गेल्या रविवारी २० रोजी फोंडा, डिचोली, सांगे अशा तीन केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली होती.

गोवा बागायतदार संस्थेच्या माध्यमातून बागायतदार तसेच ग्राहकांचे हित जपण्याचा संचालक मंडळ प्रयत्न करेल. मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याचा नक्कीच प्रयत्न करू. गेल्या ६० वर्षांतील वाटचालीच्या आधारे आणखी चांगली सेवा ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करू.
- अॅड. नरेंद्र सावईकर, गोवा बागायतदारचे विद्यमान अध्यक्ष

हेही वाचा