परवाना नसल्याने केएफसी रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई


12 hours ago
परवाना नसल्याने केएफसी रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : येथील सांतिनेज परिसरातील काकुलो मॉलमधील एम/एस देवयानी इंटरनॅशनल लिमिटेडकडे (केएफसी) रेस्टॉरंट चालवण्याचा परवाना नसल्याने येथील काम बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. आवश्यक परवाने मिळेपर्यंत येथील काम बंद ठेवावे, असे आदेशात म्हटले आहे. आदेशाचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शमिला मोंतेरो यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, याबाबत काशिनाथ शेट्ये यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. यानुसार मंडळाचे कनिष्ठ पर्यावरणीय अभियंता साईश वालडणकर यांनी ४ सप्टेंबर रोजी केएफसीची पाहणी केली होती. तपासणी करताना रेस्टॉरंटकडे आवश्यक परवाना नसल्याचे स्पष्ट झाले होते. रेस्टॉरंटने ओसीएमएमएस पोर्टलवरून परवान्यासाठी अर्ज केल्याचे आदेशात म्हटले आहे.

असे असले तरी तपासणी वेळी आवश्यक परवानगी नसल्याने प्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ आणि १९८१ नुसार एम/एस देवयानी इंटरनॅशनल लिमिटेडला काम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला केएफसीतर्फे आदेशाचे पालन केले जाईल, याची खात्री करून याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल मंडळाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.