कला अकादमी नूतनीकरण; कंत्राटदाराकडून कृती दल घेणार खर्चाचे स्पष्टीकरण

कामाच्या गुणवत्तेबाबत कृती दल सदस्यांकडून नाराजी व्यक्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
कला अकादमी नूतनीकरण; कंत्राटदाराकडून कृती दल घेणार खर्चाचे स्पष्टीकरण

पणजी : कला अकादमी नूतनीकरणाच्या कामाचा दर्जा निकृष्ट असून नूतनीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना कृती दलाकडे खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे. येत्या १० नोव्हेंबरला कंत्राटदारासोबत कृती दलाची बैठक होणार आहे. यावेळी खर्चाचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तपासणी अंती कामांना उत्तीर्ण होण्याएवढेही गुण कृती दलाकडून मिळणार नाहीत, असे कृती दलाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध दिग्दर्शक विजय दामू केंकरे यांनी बैठकीनंतर सांगितले. तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही कामे पुन्हा हाती घ्यावी लागतील, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.सरकारने ५० कोटींपेक्षा अधिक पैसे खर्च करून कला अकादमीची दुरुस्ती आणि नूतनीकरण केले आहे. नूतनीकरणाच्या कामांवर पूर्वीपासूनच संशय व्यक्त केला जात आहे. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्ष तसेच कलाकारांनी बऱ्याच वेळा केलेला आहे. कामांच्या दर्जाची तपासणी व्हायला हवी, अशी मागणी कलाकारांकडून झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कृती दलाची स्थापना केली.
सोमवारी कला अकादमीची पाहणी केल्यानंतर मंगळवारी कृती दलाची बैठक झाली. यावेळी तोमाझिन कार्दोज, प्रवीण गावकर, देविदास आमोणकर यांच्यासह १३ जण कृती दलाचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, पाहणी करतानाच स्टेज तसेच वातानुकूलित यंत्रणेबाबत (एसी) सदस्यांनी नापसंती व्यक्त केली होती.

कला अकादमीचे व्यासपीठ, ध्वनी यंत्रणा, एसीसह एकंदर सर्वच कामे सदोष आहेत. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन काही कामे नव्याने करावी लागणार आहेत. नूतनीकरणाची कामे ज्या कंत्राटदारांनी केली आहेत, त्यांच्याशी १० नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. कृती दल कामांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करून शासनाला अहवाल सादर करेल. _विजय केंकरे, अध्यक्ष, कृती दल