राज्यात आज, उद्या पावसाचा ‘यलो अलर्ट’

राज्यात १ ते २२ ऑक्टोबर दरम्यान सरासरी १०.६३ इंच पाऊस


12 hours ago
राज्यात आज, उद्या पावसाचा ‘यलो अलर्ट’

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे बुधवारी चक्री वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ २४ ते २५ ऑक्टोबर रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालला धडकण्याची शक्यता आहे. यामुळे गोव्याला धोका नसला तरी वातावरण ढगाळ राहण्याची आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हवामान खात्याने राज्यात बुधवार आणि गुरुवारी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मंगळवारी राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी संध्याकाळी ४ नंतर पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. राज्यात १ ते २२ ऑक्टोबर दरम्यान सरासरी १०.६३ इंच पाऊस झाला आहे. यादरम्यान वाळपई येथे सर्वाधिक १५.६३ इंच पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील कमाल तापमान ३२ अंश, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.