बंगळुरूमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू

ढिगाऱ्याखाली १७ जण दबल्याची भीती; बचावकार्य सुरू


12 hours ago
बंगळुरूमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे कोसळलेली बांधकाम सुरू असलेेली इमारत.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
बंगळुरू : मुसळधार पावसाने कहर केला आहे. पावसामुळेच मंगळवारी दुपारी हेन्नूरजवळील बाबूसापल्या भागात बांधकाम सुरू असलेली सहा मजली इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत १७ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आपत्कालीन प्रतिसाद पथकांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे.
प्राप्त माहितीनुसार, या इमारतीत जवळपास सर्वच कामगार असून १९ जण बिहारमधील आहेत. इमारत कोसळली तेव्हा ते सर्वजण बांधकाम करत होते. या दुर्घटनेनंतर चौघेजण सुरक्षितस्थळी पोहोचण्यात यशस्वी झाले. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य हाती घेतले आहे. ढिगा ऱ्याखालून मिळालेले मृतदेह शवचिकित्सेसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आले आहे. जखमी लोकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पावसाने मोडला विक्रम
गेल्या तीन दिवसांपासून बंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. एनडीआरफ मदतकार्य करत आहे, पाच तुकड्या शहरात अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. मंगळवारी २७ वर्षांतील ऑक्टोबरमध्ये २४ तासांत पडलेल्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत १८६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. यापूर्वी १९९७ च्या ऑक्टोबरमध्ये २४ तासांत १७८.९ मि.मी. पाऊस पडला होता.