कदंबच्या इलेक्ट्रिक बस चालकांचा पगार वाढवा : विजय सरदेसाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 hours ago
कदंबच्या इलेक्ट्रिक बस चालकांचा पगार वाढवा : विजय सरदेसाई

मडगाव : कदंब महामंडळातील सुमारे १५० इलेक्ट्रिक बस चालकांची पगार वाढ करावी आणि इतर बस चालकांप्रमाणे त्यांना पगार देण्यात यावा, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली. बसचालकांवर अन्याय सहन करून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
कदंब महामंडळातील इलेक्ट्रिक बसचालकांनी आमदार सरदेसाई यांची भेट घेत समस्या मांडल्या. सरदेसाई यानी सांगितले की, या चालकांना महिन्याला केवळ १६ हजार रुपये पगार दिला जातो. या उलट जे इतर चालक आहेत त्यांना २२ हजार रुपये पगार दिला जातो. कदंब महामंडळाचे चेअरमन तथा आमदार उल्हास तुयेकर सांगतात की त्यांना २४ हजार रुपये पगार दिला जातो जे धादांत खोटे आहे. अधिकाऱ्यांनी अध्यक्ष तुयेकर यांची दिशाभूल केली असावी, असे ते म्हणाले.

एरव्ही इलेक्ट्रिक बस चालकांना जास्त पगार द्यायला हवा होता. पण, तसे होत नाही. या चालकांना नियुक्तीपत्र सुद्धा दिलेले नाही. ते तत्काळ देण्यात यावे. बसवरील सर्व चालक गोमंतकीय असून त्यांच्यावरील अन्याय सहन केला जाणार नाही. राज्यातील नोकर्‍यांमध्ये राज्याबाहेरील लोकांना घेण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. - विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड

हेही वाचा