बाणस्तारी अपघात : पोल‌िसांनी तपासात फेरफार न करता कार चालवणाऱ्यावरच कारवाई करावी

वाहतूकमंत्री : पारदर्शक तपास करून सत्य बाहेर आणण्याचे पोलिसांना निर्देश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th August 2023, 03:51 pm
बाणस्तारी अपघात : पोल‌िसांनी तपासात फेरफार न करता कार चालवणाऱ्यावरच कारवाई करावी

पणजी : बाणास्तरी अपघातातील मर्सिडीज कार कोण चालवत होता, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. अनेकांनी प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची गरज आहे. तपासात फेरफार न करण्याचे स्पष्ट निर्देश आपण पो​लिसांना दिले आहेत, असे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

बाणास्तरी पुलावर रविवारी रात्री मद्याच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवून मर्सिडिज चालकाने तिघांचा बळी घेतला. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. या प्रकरणी कार मालक श्रीपाद ऊर्फ परेश सिनाय सावर्डेकर याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे. परंतु, अपघातातील मर्सिडीज कार महिला चालवत होती आणि ती मद्याच्या नशेत होती, असे स्थानिक सरपंचांनी अगोदरच स्पष्ट केले होते. असे असतानाही पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. याबाबत विचारले असता, ‘यात कोणीतरी पॉवरफूल व्यक्ती आहेत, असे मला समजले. कार नेमके कोण चालवत होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. कार कोण चालवत होते ते अनेकांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पारदर्शकपणे तपास करून पोलिसांनी कार चालवणाऱ्या व्यक्तीवरच कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश आपण त्यांना दिलेले आहेत’, असे त्यांनी स्पष्ट केले.

भरधाव वेगाने वाहने हाकणाऱ्यांनाच द्यावी लागेल मृतांच्या कुटुंबांना भरपाई

मद्याच्या नशेत भरधाव वेगाने वाहने हाकून अनेकजण निष्पापांचा बळी घेत आहेत. अशा घटनांमुळे अनेकांची कुटुंबे उद्धवस्त होत आहेत. मृत पावणाऱ्यांच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळेच यापुढे अशा अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्यांकडूनच नुकसान भरपाई वसूल करून ती मृतांच्या नातेवाईकांना देण्याचा नियम करण्याबाबत आपण वाहतूक सचिव आणि संचालकांशी चर्चा केलेली आहे. रस्ते सुरक्षा मंडळाच्या बैठकीतही आपण या विषयावर चर्चा करणार आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी नमूद केले.