बाणस्तारी अपघातातील जखमींना सर्व अपघाती लाभ देणार !

मुख्यमंत्री : जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची दिली माहिती

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12th August 2023, 05:08 pm
बाणस्तारी अपघातातील जखमींना सर्व अपघाती लाभ देणार !

पणजी : बाणस्तारी अपघातात जखमी झालेल्या तिघांचीही प्रकृती सुधारत आहे. या तिन्ही जखमींना राज्य सरकारमार्फत अपघातग्रस्तांना दिले जाणारे सर्व लाभ दिले जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बाणस्तारी पुलावर गेल्या रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या तिघांनाही तत्काळ बांबोळी येथील गोमेकॉत उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांची विचारपूस करण्यासाठी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमेकॉला भेट दिली होती. यासंदर्भात आज पत्रकारांनी विचारले असता, आपण गोमेकॉत जाऊन तिन्ही रुग्णांची भेट घेतली. तिघांचीही प्रकृती सुधारत आहे. त्यातील एकाला दोन दिवसांत डिस्चार्ज मिळेल. उर्वरित दोघांना आठ दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात येईल.

गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर तसेच डॉ. राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. जखमी झालेल्या तिघांनाही सरकारतर्फे सर्व अपघाती लाभ देण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, बाणस्तारी अपघातप्रकरणी अटकेत असलेल्या श्रीपाद उर्फ परेश सिनाय सावर्डेकर याने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केलेला आहे. त्याची पत्नी मेघना सावर्डेकर हिच्या अटकेच्या मागणीने जोर धरल्यानंतर तिने फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने मेघना हिला तूर्त अटक न करण्याचे निर्देश देत या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.