बाणस्तारी अपघात : परेशला वाचवण्यासाठी पत्नी चालकाच्या सीटवर बसली!

पोलिसांचा दावा; प्रकरण ‘हायप्रोफाईल’, पण दबाव नसल्याचेही स्पष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th August 2023, 09:33 am
बाणस्तारी अपघात : परेशला वाचवण्यासाठी पत्नी चालकाच्या सीटवर बसली!

पणजी : बाणस्तारी अपघातातील मर्सिडिझ कार श्रीपाद उर्फ परेश सिनाय सावर्डेकरच चालवत होता. तिघांच्या जबाबातून तेच समोर आलेले आहे. परेशला वाचवण्यासाठी त्याची पत्नी तो कारमधून बाहेर पडल्यानंतर चालकाच्या जागेवर बसली, असा दावा या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांनी केला आहे.

बाणस्तारी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या व्यक्ती हायप्रोफाईल आहेत, हे खरे असले तरी या प्रकरणाच्या तपासात पोलिसांवर कोणताही दबाव नाही. परेश सावर्डेकर याने दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवत तिघांचा बळी घेतला. त्यामुळेच त्याच्यावर गंभीर कलमे दाखल करून त्याला अटक करण्यात आलेली आहे. यात पोलिसांवर दबाव असता, तर तो या प्रकरणातून लगेच सुटेल अशी कलमे लावली असती, असे शिरोडकर म्हणाले.

अपघातावेळी मर्सिडिझ कार कोण चालवत होते, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. पण पोलिसांनी याप्रकरणी तिघांचा जबाब घेतला असून, त्यात परेशच कार चालवत होता, हे समोर आले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. अजूनही पोलीस सीसीटीव्हींचा शोध घेऊन या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्षदर्शी विश्वजीत दिग्विजय वेलिंगकर यांनाही बोलवून त्यांचा जबाब घेण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

अपघातानंतर परेशने आपल्या मुलांना कारमधून बाहेर काढले आणि तो पणजीच्या दिशेने निघून गेला. त्याला मध्येच गाठून अटक करण्यात आली, असे त्यांनी​ सांगितले. मर्सिडिझ कारमध्ये पोलिसांना दोन भरलेल्या दारूच्या बाटल्या, तर दोन रिकाम्या बियरच्या बाटल्या सापडल्या आहेत. सावर्डेकर पती-पत्नी खांडेपार येथे आयोजित पार्टी करून पणजीला परतत होते, त्यावेळी हा अपघात झाल्याचे त्यांनी नमूद केले. भरधाव वेगाने चालवण्याप्रकरणी अपघातग्रस्त मर्सिडिझ कारला याआधी सात चलने देण्यात आलेली आहेत. परंतु, त्याचा दंडही सावर्डेकरने भरलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, र​विवारी रात्री झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, गंभीर असलेल्या तिघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.