भारत जागतिक लोकशाहीचा मोठा आधार

पंतप्रधान : नवीन संसद भवनाचे लोकार्पण; वैदिक मंत्रोच्चारात सेंगोलची स्थापना


29th May 2023, 12:55 am
भारत जागतिक लोकशाहीचा मोठा आधार

संत महंतांच्या उपस्थितीत, मंत्रोच्चारात सेंगोल नवीन संसद भवनात आणताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : नवीन मार्गांचा अवलंब केल्यानेच नवीन आदर्श प्रस्थापित होतात. भारत हे केवळ लोकशाही राष्ट्र नाही तर लोकशाहीची जननी आहे. भारत जागतिक लोकशाहीचा मोठा आधार आहे. लोकशाही ही आपल्यासाठी केवळ व्यवस्था नाही, संस्कृती, कल्पना आणि परंपरा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवीन अत्याधुनिक संसद भवन रविवारी राष्ट्राला समर्पित केल्यानंतर कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधानांनी सकाळी संसद भवनात मंत्रोच्चारात सेंगोलची स्थापना केली. इमारतीच्या बांधकामात योगदान देणाऱ्या मजुरांचा गौरव केला. दुपारी लोकसभा सभागृहात पंतप्रधानांनी कोलकाता मिंटमध्ये तयार केलेले ७५ रुपयांचे नाणे आणि विशेष टपाल तिकीट जारी केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश उपस्थित होते. या कार्यक्रमाला खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अनेक देशांचे राजदूत आणि इतर उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. नवीन संसद भवनाची आणि लोकसभेत सेंगोलची माहिती देणारे दोन माहितीपटही दाखवण्यात आले. 

 पंतप्रधान पुढे म्हणाले, आज आपण नवीन संसद पाहून आनंद साजरा करत आहोत. मला समाधान आहे की, आपण ३०,०००हून अधिक नवीन पंचायत इमारतीही बांधल्या आहेत. या वास्तूमध्ये वारसा, कला आणि कौशल्य, तसेच संस्कृती व संविधानाचा आवाज आहे.

राजदंड नवीन संसदेत स्थापित

तामिळनाडूच्या अध्यानम पुरोहितांनी विधीवत पूजा केली. धार्मिक विधीनंतर पुरोहितांनी राजदंड पंतप्रधानांकडे सुपूर्द केला. तो नवीन संसद भवनात स्थापित करण्यात आला आहे.

असा होता पंतप्रधानांचा दिवस

सकाळी ७.२५ वा. नव्या संसद भवनात दाखल.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन.

लोकसभा अध्यक्ष बिर्लांसोबत पूजास्थळी दाखल.

तामिळनाडूमधून आलेल्या १८ मठांच्या महंतांकडून फुले, पाणी आणि इतर वैदिक पद्धतींनी राजदंडाची स्थापना.

लोकसभा अध्यक्षांसोबत यज्ञविधींमध्ये सनातन परंपरेनुसार दिल्या एकूण नऊ आहुत्या.

राजदंडाला साष्टांग नमस्कार करून नंतर मंहंतांसोबत संसद भवनात प्रवेश करून अध्यक्षांच्या खुर्चीजवळ राजदंडाची केली स्थापना.

सर्वधर्मीय प्रार्थनेमध्ये घेतला सहभाग.

सेंट्रल हॉलमध्ये जाऊन सर्व खासदारांसोबत स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन.

संसद भवनाची वैशिष्ट्ये

भवनाला सहा दरवाजे व १७०० खिडक्या.

 राज्यसभेची बांधणी कमळ या राष्ट्रीय फुलाने प्रेरित असून सध्यापेक्षा दीडपट मोठी.

डिजिटल उपकरणे आणि बायोमेट्रिक प्रणाली.

लोकसभा चेंबरची क्षमता आधीच्या चेंबरच्या दुप्पट आणि राष्ट्रीय पक्षी मोरापासून प्रेरित. 

मुख्य परिसरात संविधानाची डिजिटल हस्तलिखिते.

६०,००० कामगारांच्या श्रमाला समर्पित डिजिटल गॅलरी.