अबोली सासरी आली तेव्हा नवऱ्याने तांदळात त्याच्या रघू नावाशी मिळतंजुळतं रेवती हे नाव तिचं म्हणून रेखलं होतं तेव्हा अबोलीची हळदीची काया मोहरून निघाली होती. माहेराचे हळवे, प्रेमळ पाश सोडून आलेलं तिचं दुखरं मन पतीसानिध्यातली स्निग्धता शोधत होतं. आता आपण रेवती तिने मनाशीच म्हंटलं नि गोऱ्या कपोलांवर लाजेची लाली पसरली.
घरात सासूसासरे नव्हते पण तिच्या नवऱ्याने घरी आणून सोडलेली तशी तरणीताठीच बहीण होती. नव्या जोडप्याला खेळवतात हे ठाऊक होतं अबोलीला, म्हणजे आजूबाजूच्यांच्या लग्नात तिने ते विडा दातांनी तोडण्याचे, हळदीच्या पाण्यातली अंगठी शोधण्याचे खेळ पाहिले होते पण प्रत्यक्षात तिच्याबाबतीत तसं काहीच झालं नाही.
"झाला मा लगीन. आता कामाक लागा," म्हणत नणंदेने तिच्या हाती केरसूणी सोपवली. थोड्याशा अनिच्छेनेच तिने हिरवा चुडा भरलेल्या हातांत केरसुणी धरली. वाकून सांदीकोनातला केर काढला. नणंदबाई तशी बोलायला तिखट नि रघू घुम्या; त्यामुळे पाहुणेमंडळी कुणी वस्तीला थांबली नव्हती? आल्या पाऊली परत गेली होती.
सत्यनारायण झाल्यानंतर हूळहुळत्या मनाने अबोली रघूच्या खोलीत निजायला गेली पण शेजारच्या भिंतीतनं नणंदेचे दोन हिरवे डोळे तिच्यावर नजर फिरवत आहेत या विचाराने ती शहारली. तिने अंग अधिकच आकसून घेतलं. रघूला वाटलं, "ही बया आपनाक व्हयो तसो प्रतिसाद देईत नाय हा." त्याने तिला धसमुसळेपणे जवळ ओढलं, तिला न फुलवता, न मोहरवता अक्षरशः कुसकरलं.
"कोंबो आरवलो तरी नीजून रव्हलाहा. हेंची कामा करूक दासी आसय काय मी. रातीची रव्हली गजाली थापीत. जशी काय हेंचीच लग्ना झाली." नणंदेच्या तोंडाला थारा नव्हता. मुसळासारख्या पावसाच्या धारा पडाव्यात तसं सतत तिचं अबोलीला हिणवणं चालू होतं. अबोलीला वाटलं, "आपलो घोव आपली बाजू घेयत. आकाबायेक समजावून सांगीत," म्हणून रात्री तिने अगदी हळू आवाजात घोवाला नणंद काहीबाही बोलते नि नुसती कामाला लावते म्हणून सांगितलं. रघू यावर काहीच बोलला नाही. त्याने तिला जवळ ओढली नि त्याच्या लायकीपेक्षा जास्त पदरात पडलेलं ते चांदणसूख अधाशासारखा ओरपू लागला.
सकाळी आक्काबाईचा तोंडाचा पट्टा सुरू झाला होता. खडकाळ जमिनीवर घण घालावेत तशी ती जोरजोरात कर्कश्य आवाजात रेकत होती, "मी छळतय हेका अशी माझी कम्प्लेंट करता रातची घोवाकडे. रीतीचे चार शबुद सांगलय तर ऐकून घेऊक नुको. माझी अडचन होता झाल्या सरळ सांगूचा. मिया चलत रव्हतय.."असं म्हणत डोळ्याला पदर लावून अधनंमधनं नाकातनं सु सु आवाज काढत होती, हुंदके देत होती. रघू तोंड धुवून आत येत होता. नक्की काय झालंय हे विचारून घेण्याची तोशिस न करता त्याने कोपऱ्यातली काठी उचलली नि अबोलीला मारायला सुरुवात केली.
अबोलीच्या नाजूक हातातल्या हिरव्या बांगड्या वाढवल्या, केसांचा आंबाडा सुटला, गजरा सांडला, तिचा पदर ओघळला तरी तो मारतच होता. अबोली मार चुकवायचा प्रयत्न करत होती तसतसा त्याला आणिक चेव चढत होता. शेवटी काठी तुटली तेव्हा तो मारायचा बंद झाला. अबोली निर्जीव शिळेसारखी तिथेच बसून राहिली. आक्काबाई मात्र खूश झाली. तिने टोपभर पेज न्हेऊन रघूच्या पुढ्यात ठेवली, सोबतीला आंब्याच्या फोडी. "दमलो आसशीत. जेव पॉटभर. कर्म आपला. आपल्याच राशीक असा दळीद्री पॉर इला. पदरात पडला ता पवित्र करून घेऊक व्हया." अबोलीला कळत नव्हतं, नवऱ्याने आपल्याला एवढं गुरासारखं झोडून काढण्याएवढा आपण काय गुन्हा केला.
दोनेक महिने अशेच गेले. आक्काबाईचं घालूनपाडून बोलणं, रघूचा मार, रात्रीची झटापट अबोलीच्या अंगवळणी पडत होते, त्यातच अबोलीला डोहाळे लागले आणि रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे आक्काबायने रुप पालटलं. अगदी मध फिका पडावा अशी गोड बोलू लागली. अबोलीला अंघोळीला पाणी ओतून देऊ लागली. तिचं पाणी शेंदणं बंद केलं. तिला मागेल ते करून खायला घालू लागली.
अबोली खुळी, भाबडी अगदी खूश झाली. आक्काबाईची लेक जशी तिच्याशी वागू लागली. रघूही खूश होता. सगळं कसं छान चाललं होतं नि कुठूनशी माशी शिंकली. एका रात्री रघू निघून गेला. आक्काबायने त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. चारेक दिवसांत परत येईलसं वाटलं होतं. दोघीही त्याच्या वाटेला डोळे लावून बसायच्या पण रघूचा पत्ताच नसायचा.
आक्काबाय सकाळीच उठून रघूला शोधायला म्हणून बाहेर पडू लागली, आसपासचे गाव पालथे घालू लागली. वाटेत भेटलेल्यांकडे चौकशी करी,"असो असो माझो भाव घर सोडून गेलो हा. तुमका खय गमलो काय ओ. त्यांना रघूचा फोटोही दाखवी. फोटो कधीचा..जत्रेत काढलेला धूरकटसा तेव्हा तो दहा बारा वर्षांचा असावा,"त्या फोटोवरून कोणाला कशी या पंचवीशीच्या तरुणाची ओळख पटायला! तिच्या मनात यायचं,"श्या, लग्नात फोटोवालो हाडून दोन फोटो काढून घेऊक व्हये आसते."
अबोलीला मात्र ती धीर द्यायची, उगाचच सांगायची, "आरवलीत गेललय. थयल्या गुरवाक दिसललो म्हना होतो. जातलो खय, गरोदर बायलेक टाकून. येतलो बघीत रव्ह."
अबोलीला का कोण जाणे त्याचं जाणंच बरं वाटत होतं. त्याने रात्रभर देहाची चिंधी-चिंधी करणं, ढेकणाने रक्त शोषावं तसं तिचा जीवनरस शोषणं, पुऱ्या देहाचा चोळामोळा करणं हे नकोच होतं तिला. आताशा बाळाची हालचाल जाणवू लागली होती. "कसो आसतलो माझो बाळ दिसाक. माज्यासारो की बापाशीसारो? तसोच रागीट!!" त्या विचारानेच ती घाबरायची. पाठीवरले, मनगटावरले वळ आठवून तिचं अंग घामाने थबथबायचं.
आक्काबाई अबोलीची देखभाल करत होती. रघूचं नसणं तिला जाणवू देत नव्हती. हसतखेळत दिवस जात होते नि दिवस पुरे झाले तसा अबोलीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाची जिवणी अगदी अबोलीच्या जिवणीसारखी, डोळेही तिच्यासारखे रेखीव, अगदी मात्रुमुखी. अबोलीला बाळाला पाहून कोण आनंद झाला. "बाळ माजो मोठो साहेब होतलो. माका नि आक्काबायेक सुखात ठेवतलो. ठेवशीत ना रे बाबू," असं ती मोठे डोळे करत बाबूला विचारायची. "सोनू तो माजो" म्हणत पटापटा त्याचे मुके घ्यायची.
आक्काबाई मात्र बाबूसोबतच बसून राहू लागली. फक्त दुधापुरता ती बाबूला अबोलीकडे देई. बाकी सदासर्वकाळ तो आक्काबाईच्या ओटीत राहू लागला. अबोली विचार करी, "आक्काबायचा तरी कोन आसा आमच्याशिवाय. जीव लावतहत तो लावांदेत. मिया कामा करतय घरातली."
महिना व्हायच्या आधीच अबोलीने घरकाम करायला सुरूवात केली. कसं ते तिचं अंगावरलं दूधही आटलं. बाबू तिच्या दूधाला तोंड लाविनासा झाला. आक्काबाई वाटीचमच्याने त्याला मांडीत (पान ६ वर)
घेऊन दूध भरवू लागली नि मायलेकरांचा पान्ह्यापुरताचा संपर्कही तुटलाच जणू.
अबोली मात्र हातपाय हलवत होती. परडं फुलवत होती, भाजीपाला लावत होती, शेती करत होती, भात, माळवं विकून घरातल्या गरजा पुऱ्या करत होती. एखाद्या रात्री गाढ झोपेत असताना तिला रघूची आठव येई. त्याने तांदळात कोरलेलं आपलं रेवती नाव पुसटसं आठवे, त्या क्षणापुरती ती पुन्हा मोहरून जाई आणि मग आठवे त्याने तिच्या शरीराशी केलेली झोंबाझोंबी, त्याचा राक्षसी प्रणय आणि घामाने चिंब होऊन ती उठे. बाळ आक्काबाईच्या कुशीत गाढ निजलेला असे. "शेवटी आपनाक जीवाभावाचा, आपल्यार माया करनारा एकव मानूस नाय!" पुटपुटत ती सुस्कारा सोडायची.
आक्काबाईला सांधेदुखीने धरले. मनात असूनही तिच्याच्याने बाबूचं करणं होईना. बाबूचा ओढा सहाजिकच गोष्ट सांगणाऱ्या, आवडीचं करून घालणाऱ्या आपल्या आईकडे वाढू लागला. आक्काबाईला स्वतःच्या पायाने खोलीतनं बाहेर पडता येईनासं झालं. ढुंगण घसटत फिरायची तरी अबोली तिची निगा राखत होती, तिला न्हाऊमाखू घालत होती, खाऊ घालत होती.
आक्काबायच्या डोळ्यातनं मग आसवं गळायची. आपण अबोलीला कसं छळलं, आपल्यामुळे तिच्या नवऱ्याकडून तिला मार खावा लागला, तिच्या बाळालाही तिच्याशी खेळू दिलं नाही तरी अबोली काही किल्मिष मनात न ठेवता स्वतःच्या तान्ह्या लेकीची करावी तशी सेवा करतेय आपली. आक्काबाई देवाला सांगे, "देवा, मी वाईट जीव. मी लय चुका केलय पण माझी अबोली म्हंजे निष्पाप जीव. तिका सुखी ठेव."
अबोली मात्र आक्काबाईचे पाय चुरताना हसत होती. देवाला म्हणत होती, "देवा, तुझ्या आशीर्वादाने मिया जीव लावूक शिकलय. माझो झिल, आकाबाय अशी हक्काची, मायेची मानसा कमावलय."
समाप्त.