कारनामे

Story: ब्रम्हांडलेखिका फकीताई | प्रा. अदिती ब |
27th May 2023, 11:07 pm
कारनामे

संपादक रागाने लालबुंद झाले होते. जरात्कारुने केबिनबाहेर नजर मारली. सुदैवाने सगळे कर्मचारी आपापल्या कामात व्यग्र होते. संपादकांनी केबिनला भलीमोठी काच का बरं बसवून घेतलीय? सर्वांवर नजर ठेवता यावी म्हणूनच बहूतेक त्यांनी हे केलंय. ड्यांबीस माणूस आहे. सगळे जण कामं व्यवस्थित करतात म्हणून वर्तमानपत्र नंबर एकचं वर्तमानपत्र आहे. ही काच बसवून सरांनी अविश्वासच दाखवलाय. याचा बदला कधीतरी घेतला पाहिजे. याला याची जागा दाखवून दिली पाहिजे. असे राक्षसी विचार जरत्कारूच्या मनात येत असताना सर कडाडले-

“तुला फकीचे कारनामे माहीत नाहीत अजून. माझ्या सासूबाईंना हिने माझ्याबद्दल नाही नाही ते सांगितलं...”

“असं कसं होईल सर?” उसनं अवसान आणत जरत्कारू म्हणाला.

“अरे, मोठ्या साहेबांनी आपल्या ऑफिससाठी म्हणजे माझ्यासाठी पर्सनल सेक्रेटरी नेमली माहिती आहे ना?”

“हो ना सर! पण तिचं काम अगदी चोख असलं तरी ती अहंकारी आहे. माझ्यासारख्या साध्याभोळ्या माणसांकडे बोलत नाही ती...” जरत्कारू रागाने म्हणाला.

हा किती साधाभोळा आहे ते सर्वांनाच माहीत असल्याने संपादकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त न करता जरत्कारुला बसण्याची खूण केली आणि पुढे म्हणाले- “एका कार्यक्रमात, फकी आणि माझ्या सासूबाई जेवायला बसल्या एकत्र. तेव्हा हिने त्यांना सांगितलं की मी बाई ठेवली आहे. ती केवळ माझी कामं करते. अरे बाबा, ती माझी पर्सनल सेक्रेटरी आहे, म्हणजे माझीच कामं करणार ना!!”

संपादकांच्या डोळ्यांतून कोणत्याही क्षणी पाणी येईल अशी त्यांची अवस्था झाली होती. सर अत्यंत सरळमार्गी होते. त्यांना किती त्रास झाला असेल याची कल्पना जरत्कारुला आली. सरांचं सांत्वन कसं करावं, यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत असताना तेच बोलले- “तिच्यासोबत मी बाहेरच्या बायकांना भेटायला जातो, असं म्हणण्यापर्यंत हिची मजल गेली. त्या बायकांना मी माझ्याकडे या असं सांगितलं म्हणे...” संपादकांनी आतापर्यंत रोखून धरलेले अश्रू त्यांच्या गालावर ओघळलेच.

“बाहेरच्या बायका?” ह्या कुठून आल्या? तुम्ही विचारलं नाही तिला?” जरत्कारू आश्चर्यचकित झाला. त्याने सरांना टिश्यू पेपर दिला. पाणी दिलं.

“ती म्हणते तिने खरं खरं सांगितलं. अभिमानाने सांगितलं. माझ्या सासूबाईंनीच वाईट अर्थ काढला.”

“असं कसं?” जरात्कारुने विचारलं.

“मागे महिला मेळाव्याला मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं होतं. तिथे मी असं विधान केलं होतं की स्त्रियांनी पत्रकारिता क्षेत्रात आलं पाहिजे.” संपादक म्हणाले.

“सर... मी काय म्हणतो, फकीची भाषा चांगली नाही, त्यामुळे हा गैरसमज झाला. तुमच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तुमच्याबद्दल कुणीही गैरसमज करून घेणार नाही.” जरत्कारू समजावणीच्या सुरात म्हणाला.

“ते खरं आहे रे, पण हिच्यामुळे आपल्या ऑफिसमधल्या तिघांचे प्रेमभंग झाले आणि दोघांची लग्नं मोडली. ही जिथे जाईल तिथे फायदा केवळ हिचाच होतो. तुला एक गोष्ट माहीत आहे का? ज्यांची लग्नं मोडली ते सगळे हिच्या संपर्कात आहेत, म्हणजे हिचे रिलेशन्स सर्वांशी चांगले. पण आपसात त्यांची भांडणं लागली.” सर अगदी विस्मयचकित होऊन सांगत होते.

“सर, मी समजावतो तिला.” जरत्कारू म्हणाला.

“तू काय समजावणार? कुत्र्याचं शेपूट आहे ते

 वाकडं ते वाकडं. तू रजेवर होतास तेव्हा एका महत्त्वाच्या बातमीसाठी मी स्वत: जायचं ठरवलं. ही ऑफिसमध्ये रिकामी बसून होती. सेक्रेटरी त्या दिवशी आली नव्हती. हिला म्हटलं जरा मला आलेले फोन अटेंड कर. ‘आत्ताच बाहेर पडलोय, आता आलात तर भेट होणार नाही’ असं सांग. त्यानंतर मी बातमी कवर करून घरी गेलो, तर माझ्या घरी माणसं जमली होती. एकाने तर माझ्याच खांद्यावर डोकं ठेवून चांगला माणूस गेला असं म्हटलं.”

“कोण...तुमचे वृद्ध काका गेले का? अरेरे....” जरत्कारू सांत्वनपर म्हणाला.

“काका नाही. मी गेलो होतो. नेमके त्याच दिवशी मला सात फोन आले. हिने सातही जणांनी कोंकणीत सांगितलं – ‘सर भायर पडलो. आता तुमची भेट जावची ना.’ तुला माहीत आहे ना? भायर पडलो म्हणजे वारला. एवढं करून ही थांबली नाही. कसा गेला अचानक? असं कुणीतरी विचारलं, तेव्हा ही म्हणाली ‘सर अचानक गेले, पण मला सांगून गेले. ऑफिसची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेले.’ एवढं बोलायची काय गरज होती?”

हे ऐकल्यावर मात्र जरत्कारुला हसावं की रडावं ते कळेना. तेवढ्यात संपादकांनी त्याच्यासमोर एक कागद ठेवला. “हे वाच. मी हे छापलं नाही म्हणून फकी माझ्या केबिनमध्ये येऊन जोरजोरात रडू लागली. मी केबिनबाहेर धाव घेतली. उगीच लोकांना वाटायचे मी हिला काहीतरी केलं. त्या दिवशी मी ही काच बसवून घेतली केबिनला. आत काय चाललंय ते सर्वांना दिसलं पाहिजे. माझ्यावर नसतं बालंट नको.”

अपराधीपणाची भावना जरत्कारुला खाऊ लागली. त्याने कागद हातात घेतला. समास न सोडता, दिनांक न लिहिता अत्यंत गिचमिड अक्षरात लिहिलंय म्हणजे हे फकीचंच काम आहे हे सांगण्याची आवश्यकता नव्हती. कुणा कवीच्या कवितेचं रसग्रहण होतं. जरत्कारू वाचू लागला-

घुलाबाच्या फूला – एक लयकारी आभास.

आजपर्यंत असंख्य म्हणजे एकून चार कवींच्या कवितांवर मी लिहील आहे. थोड्यांकडे कला असते थोड्यांकडे कल्पना. पण कवी फोंडू हे एक सर्वस्रेस्ट कवी आहेत. यांच्याकडे दोनही आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीच नाव कला आहे तर शोट्या मुलीच नाव कल्पना. असे महान कवी फोंडू. त्यांच्या ‘पच्चीमेचे तरंग’ या कविता संग्रहातील घुलाबाच्या फूला या कवितेवर मी आज बोलणार आहे. गुलाबाला काटे असतात, पण फोन्डूंच्या अज्रामर गुलाबाला मात्र काटे दिसून येत नाहीत.

त्यंच्या कवितेतली घुड रम्यता आम्हाला साद घालते. त्यांच एकेक वाक्य म्हणजे ब्रम्हवाक्य. उदाहरण द्यायच झाल तर– ‘कांदा लावला त्याला सये खूप कांदे लागले.’ या वाक्यात त्यांच्या भावविश्वातील कांदा लावणारी सय, म्हणजे आठवण आहे. रसरशीत गुलाब आणि टपोरा कांदा यांची या कवितेत आलेली तुलना म्हणजे साक्षात मावळतीचा भाचा आणि भावजयीचा भाव. फोंडू यांनी स्त्री मनाची घालमेल दाखवली असल्याने ते स्वत: स्त्री असल्याचे दिसून येते. तसेच त्यांनी गुलाबाच्या काट्यांचे वर्णन केल्याने त्यांची आसुरी वृत्तीही छान दिसून येते.

‘तुझा आंबट वास गुलाबा 

रिगतो नाकात माज्या’

या वाक्यातून त्यांच्यातील आंबटशौकीनता दिसून येते. या काव्यसंग्रहात त्यांनी ‘लिंबू माझा टिंबू’ नावाचं बालगीतही लिहिल्याने ही आंबट भावना त्यांच्या हृदयात किती खोलवर खदखदत आहे ते कळते. आज साहित्य विश्वाला अशा शौकीन म्हणजे दर्दी माणसांची गरज आहे.

दर्दीवरून आठवलं

फुटला माज्या मनाचा बांध गुलाबा...

जेव्हा मी जालो रोमांचित रोमांचित’

हे जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांच्या जीवनात बांध फुटण्याएवढा दर्द आहे हे दिसून येते. फोंडूनी माझ्याकडून प्रस्तावना लिहून घेतल्याने त्यांना एका उत्तम कवयित्रीची ओळख असल्याचे जाणवते. 

त्यापुढे वाचणे जरत्कारूला जमेना...