ज्या ज्या गावांमध्ये 'हौसा' वाटण्याची परंपरा आहे, त्या त्या गावातील प्रत्येक स्त्री आपल्याला आयुष्यभर हे 'हौशाचे' लेणे मिळावे म्हणून देवाकडे साकडे घालत असते. ज्या ज्या गावांमध्ये गौरी पूजनाची परंपरा आहे, त्या त्या गावातील प्रत्येक स्त्री आपल्याला गौरी पूजन करण्याचे भाग्य जन्मोजन्मी लाभो अशीच इच्छा मनात बाळगत असते.
गोव्यामध्ये गणेशोत्सव हा दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस आणि अकरा दिवस अशा कालावधीचा असतो. यामध्ये गोव्यातील सत्तरी, डिचोली आणि पेडणे तालुक्यातील काही गावांमध्ये हौश्यांची परंपरा आहे. त्याचबरोबर गौरी पूजनही केले जाते.
गौरी पूजन म्हणजे काय? तर गणपतीची जन्मदात्री, माता पार्वती हिचे जलस्वरूपात पूजन. बहुतांश गावांमध्ये पाचव्या दिवशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी, तर काही गावांमध्ये गौरी पूजनाच्या मुहूर्ताच्या दिवशी सकाळी सुवासिनी साज-शृंगार करून नऊवारी नेसून गौरीला आणायला तयार होते. बांबूपासून बनवलेली पाटी, एक नारळ, तांब्या, हळद-कुंकू, आंब्याच्या डहाळ्या आणि पूजेचे साहित्य, त्याचबरोबर हळदीचे खांद घेऊन सुवासिनी गावातील इतर बायकांसोबत नदीकाठी जातात. ज्या गावांमध्ये नदी नसते, त्या गावातील स्त्रिया विहिरीवर जातात. त्या नदीचे पूजन करतात, हळद-कुंकवाने तांब्या सजवतात. त्याचे कलशात रूपांतर करतात. नदीतील पाणी आणि पाच खडे कलशात घालतात. हे पाणी अतिशय अलगद घरापर्यंत घेऊन येतात. नदीपासून घरापर्यंत येण्याचे हे काम मोठे जेखमीचे असते. हे पाणी आणताना, म्हणजेच गवर आणताना, गवर आणणाऱ्या स्त्रीने कोणाशीही बोलू नये, असा नियम असतो. तिच्या तोंडात पाणी भरलेले असते. हे पाणी तसेच तोंडात धरून तिला आपल्या घरापर्यंत यावे लागते. घरी आल्यावर दरवाज्याच्या दोन्ही बाजूला हे पाणी थोडे थोडे थुंकावे लागते आणि त्यानंतरच आपल्या घराच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवावे लागते. त्यानंतर पाणीरूपी गौरी घेऊन आलेली स्त्री आणि कलशरूपी गौरीचे धूप-दीपाने घरातील कोणीतरी एक सुवासिनी पूजन करते. आणि मग लक्ष्मीच्या पावलांनी ती स्त्री हातामध्ये पार्वतीचे प्रतीक असलेल्या गौरीचे पाणी घेऊन घरात प्रवेश करते. आणि गणपतीच्या जवळ एका आसनावर ही गौरी विराजमान होते. त्यानंतर घरातील प्रत्येक स्त्री त्या गौरीचे पूजन करते. गौरीचा बाळ पाच दिवस अगोदरच घरात आलेला असतो. आज गौरी आपल्या बाळाच्या विसर्जनाच्या दिवशी घरात येते आणि घरामधील मांगल्य अजून वाढवते.
सकाळी गौरी आणल्यानंतर घरामध्ये पंचपक्वान्नांचे अन्न शिजवले जाते. यामध्ये विशेष महत्त्व असते पाच प्रकारच्या पालेभाज्या एकत्र करून तयार केलेल्या पालेभाजीला. त्याचबरोबर गोडधोड पदार्थ करून हळदीच्या पानावर भाताबरोबर ते पदार्थ, वडे हे सगळे वाढले जाते. तसेच पाच प्रकारची फळे, विड्याचे पान, हळद-कुंकू, अक्षता, फुले हे सगळे सुद्धा त्याच हळदीच्या पानावर वाढले जाते. या हळदीच्या पानावर वाढलेल्या अन्नाला 'हौसा' असे म्हटले जाते. हा 'हौसा' नंतर गणपती-गौरीपुढे दाखवून, तुळशीपुढे ठेवून घरातील सगळ्या ज्येष्ठांच्या हातामध्ये देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. त्यानंतर ती घरातील स्त्री आपल्या पारंपरिक नऊवारीच्या वेशात घरातून बाहेर पडते आणि गावातील प्रत्येक गणपतीजवळ हे हौशाचे पान ठेवून येते. काहींचा 'हौसा' मात्र मूग डाळीचा असतो. इथे पाच पक्वान्न न वाढता फक्त मूग डाळीचे पंचखाद्य वाढले जाते. नवीन सून जेव्हा लग्न होऊन सासरी येते, त्यावेळी तिचा पहिला 'हौसा' अन्नाचा किंवा मूग डाळीचा नसून तो पंचफळांचा असतो. नंतरच्या वर्षी मात्र तिला अन्नाचा किंवा मूग डाळीचा 'हौसा' घेऊन आपल्या घरच्या परंपरेप्रमाणे घरोघरी वाटावा लागतो.
अशाप्रकारे प्रत्येक घरी हौसा ठेवल्यानंतर घरी आल्यावर ती स्त्री आपला संबंध दिवसभराचा उपवास सोडून जेवण करते. संध्याकाळी पुन्हा गौरी ज्या नदीवरून आणलेली असते तिथेच विसर्जित होते ज्या स्त्रीने ते पाणी आणलेले असते ती स्त्री पुन्हा ते पाणी नेऊन नदीत विसर्जित करते. गौरी देवीचा प्रसाद म्हणून माणसो वाटला जातो.
माणसो म्हणजे तांदळाच्या भाकरीचे तुकडे आणि पाच प्रकारच्या पालेभाज्या एकत्र करून शिजवलेली भाजी. एरवी ज्या माणसाला भाजी-भाकरी आवडत नाही, तो माणूससुद्धा त्या दिवशीचा हा माणसो अगदी आवडीने खातो. कारण त्या प्रसादाची चवच मुळी एवढी चविष्ट असते आणि हा प्रसाद पुन्हा मिळवण्यासाठी पूर्ण वर्षभर पुढच्या वर्षीच्या गौरी पूजनाची वाट पाहावी लागते. म्हणून ज्यावेळी गर्दीमध्ये गावातील लोक हा माणसो गोळा करत असतात. माणसो वाटणे आणि माणसो आपल्या हातामध्ये घेणे हा जणू त्यातल्या त्यात एक सोहळाच असतो.
ज्या ज्या गावांमध्ये 'हौसा' वाटण्याची परंपरा आहे, त्या त्या गावातील प्रत्येक स्त्री आपल्याला आयुष्यभर हे 'हौशाचे' लेणे मिळावे म्हणून देवाकडे साकडे घालत असते. ज्या ज्या गावांमध्ये गौरी पूजनाची परंपरा आहे, त्या त्या गावातील प्रत्येक स्त्री आपल्याला गौरी पूजन करण्याचे भाग्य जन्मोजन्मी लाभो अशीच इच्छा मनात बाळगत असते. पण दुर्दैवाने विधवा स्त्रियांना ही पूजा करता येत नाही, त्यामुळे आपले दुःख त्या फुगडीतून व्यक्त करताना गाऊ लागतात....
कांगलीच्या झाडापोना काय गवर उभी शी
पायात लो वेळो सांडलो काय करू मामंजी
सांडलं तर सांडू सुने लोकांचो
आम्ही घडवूया रुप्यांचो
इथे अशी स्त्री आपलं दुःख आपल्या सासऱ्याला सांगते, जिचा नवरा तिच्या नकळत्या वयातच जग सोडून गेलेला असतो. अशावेळी तिच्या पायातील वेढे काढून घेतलेले असतात आणि ही अल्पवयीन विधवा बालिका आपले वेढे शोधत असताना आपल्या सासऱ्याला 'माझा वेढा हरवला' असे सांगते. अशावेळी त्या बालसुलभ स्त्रीचे दुःख समजून घेऊन सासरा तिची समजूत घालतो. तो सांगतो, 'तो लोकांचा होता म्हणून हरवला. तो हरवू दे, आपण तुझ्यासाठी नवीन करूया'. रीती-परंपरा बाजूला ठेवून जर आपण नात्यांविषयी विचार केला, तर सासरा आपल्या सुनेला मुलीहूनही अधिक मान देऊन तिचे मन जपताना आपल्याला इथे दिसून येतो. याचाच अर्थ, सासरा तिच्यामध्ये असलेल्या स्त्रीत्वाचा मान ठेवताना दिसतो. सण, परंपरा, रीती हे फक्त सोहळे नव्हते, तर ती एक जगण्याची शिस्त होती. सुख-दुःख व्यक्त करण्याची एक सोय होती. जे आजही समाज जपत आहे. कालांतराने अनेक बदल झाले असले तरी ही संस्कृती अजूनही टिकून आहे, ती लोकांच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळेच होय.
गाैतमी चाेर्लेकर गावस