चिलया बाळ

लोकसंस्कृतीत असे सत्त्वपरीक्षा घेणारे अनेक प्रसंग येतात. सती अनुसया, पार्वती, सीता, द्रौपदी, तारामती एक ना अनेक. या सर्व पतिव्रता स्त्रियांना लोकपरंपरेतील मालनींनी समान पातळीवर आणून त्यांचे गुण गायिलेले आहेत. त्यांच्याशी त्या समरस झालेल्या आहेत. त्यांचे सुखदुःख तिला स्वतःचे वाटू लागले म्हणून चिलया बाळाची झिनोळी म्हणताना तिचे डोळे भरून येतात.

Story: लोकगंध |
07th September, 12:34 am
चिलया बाळ

खांद्या लायली झोळी गे हाती घेतला दांडा
चांगुणा नारी गे धरम करा
काढिले पाच मुठी साळीं का दाळी
चांगुणा दरवाजात आली
धरम वाढू लागली...
तसला धरम नको आम्हा नारी
कसलो धरम जाय तुम्हा गुरू
चिलया बाळाचा मच्छार व्हाया
एक माझा तान्हा...एक माझा बाळ
कसा मी देऊ तुम्हा गुरुभोजन

ही झिनोळी फुगडी आहे... अगदी माझ्या बालपणी मी माझ्या आजीकडून ऐकली होती. खूप मोठी लांबलचक संपता संपत नसे. या फुगडीचे गायन करताना आयेच्या म्हणजेच माझ्या आजीच्या आवाजाला सुटणार कंप जाणवायचा. तिच्या डोळ्यात दाटून येणाऱ्या अश्रुंचे थेंब मध्येच टपकत असत. एवढी ती समरस होऊन ही झिनोळी म्हणत असे. चिलया बाळाची... 

त्याला वेढून राहिलेल्या कारुण्याची पहिलीच ओळख ही अशी झाली होती. चांगुणेचा एकुलता एक मुलगा नवसाने झालेला. त्यालाही कोणीतरी हिरावून घेऊ पहात आहे ही कल्पनाच त्या वयाला सहन होत नव्हती. चांगुणेची ती सत्त्वपरीक्षा होती. दारी धरम मागायला आलेल्या गोसाव्याला चिलया बाळाचे मांस भक्षण करायचे होते. ते सुद्धा बाळाच्या आईने शिजवून वाढलेले. कल्पना सुद्धा करवत नव्हती. चांगुणेवर तर आभाळच कोसळले होते.

ती अस्वस्थ झाली.  तिच्या सैरभैर मनाने निर्णय घेतला, ती धावली धनगराच्या गवळाकडे...

गेली गे धनगरा पाड्यार
अरेरे धनगरा मामा
तू तरी माझो रे मैतर व्हशी
बोकडाची सांगड लवकर देशी
हाडिल्यो बोकड सांगडी
काणून कुटून मच्छार रानीला
त्याला फोडणी गे हिंगा मिठाची
तळणी गे तेला तुपाची
रानीले नारीन जेवण
उठा हो गुरु नी आंघोळी करा
आंघोळी करा तुमी भोजन करा

गुरू स्वामींनी आंघोळ केली. जेवायला बसले खरे, मात्र पहिल्याच घासाला त्यांनी चांगुणेला सांगितले की मला चिलया बाळाचे मांस भक्षण करायचे आहे. त्यांच्या कृतीत यावेळी अंगार फुलला होता. चांगुणेसाठी हा जीवन मृत्यूचा क्षण होता. गुरूचा कोप होणे म्हणजे सर्वस्व नष्ट होणे याची तिला जाणीव होती. आतून ती तीळ तीळ तुटत होती.

स्वतःच्या मांसाच्या गोळ्याला तिलाच मारावे लागणार ही कल्पना तरी तिला कशी सहन होणार होती?

चिलया बाळाचा मच्छार व्हया
बलोवन आणिलो चिलया बाळाक
मातेन धरिलो, पित्यान वधिलो
शीर सा ठेयीला शिक्यावरी
उठा हो बाबानू आंघोळ करा
लुण का घातीला वाईनात
चिलयाची आई गे धवळू लागली
वरसून पडती मुसळ घाई
काणून कुटून मच्छार रानीला
दिली गे फोडणी हिंगा मिठाची
दिली गे तळणी तेला तुपाची
आंघोळ करा तुमी भोजन करा
कसला मच्छार रानलय 

चांगुणा नारीन शेवटचा प्रयत्न म्हणून मुलाच्या शरीराचे मांस रांधून वाढले. गोसावी गुरु स्वामी जेवायला बसले खरे पण त्यांच्या लक्षात ही गोष्ट येते. ते रागानेच चांगुणेला मुलाच्या शिराचे (डोके) मांस हवे म्हणून सांगतात. काळजावर दगड ठेवून ती तसे करते. केळीची चार पाने वाढ अशी ते तिला आज्ञा देतात. ती विचार करते आपण तर तिघेजण आहोत पण मग चार पाने कशासाठी? परंतु हे विचारण्याचे धाडस तिच्यात नसते. पाने वाढून होतात. गुरू चांगुणेला आज्ञा देतात. अंगणाच्या पेळे बाहेर जा आणि चिलयाला हाक मार. ती तसेच करते. चिलया धावत येतो... तिला तर काही सुचतच नाही. ती हर्षभरीत होते. गुरूचा आशीर्वाद घेते.

फुगडीचा शेवट गोड आहे. चांगुणेला सुखद धक्का देणारा. असे असले तरीही स्वतःच्या मुलाला मारून त्याचे काणून कुटून मच्छार रांधणे ही काळजाला पीळ पाडणारी घटना.

आयेच्या मुखातून ती ऐकताना सुध्दा त्यातील वेदनेची धार काळीज चिरत जायची. कमरेत वाकून दोन्ही हात समांतरपणे एकदा उजव्या तर एकदा डाव्या बाजूने हलवत संथपणे ही ओणव्याने फुगडी घातली जायची. एका तासावर ती चालायची. आपल्याच मुलाला स्वतःच्याच हाताने कसे मारायचे? तिच्यातील माता मग विविध प्राण्यांचे मांस शिजवून गोसाव्याला वाढायची. गोसावी तेवढाच कोपिष्ट. तो तिची चाल बरोबर ओळखायचा. शेवटचा  प्रयत्न म्हणून ती स्वतःच्या मुलाचे शीर नकळतपणे शिंक्यावर ठेवते आणि शरीराचे मांस शिजवून वाढते. तिचा तो आनंदही गोसावी हिरावून घेतो. मात्र त्याने घेतलेल्या सत्त्वपरीक्षेत ती पास होते. चांगुणेला चिलया जिवंत होऊन परत मिळतो.

लोकसंस्कृतीत असे सत्त्वपरीक्षा घेणारे अनेक प्रसंग येतात. सती अनुसया, पार्वती, सीता, द्रौपदी, तारामती एक ना अनेक. या सर्व पतिव्रता स्त्रियांना लोकपरंपरेतील मालनींनी समान पातळीवर आणून त्यांचे गुण गायिलेले आहेत. त्यांच्याशी त्या समरस झालेल्या आहेत. त्यांचे सुखदुःख तिला स्वतःचे वाटू लागले म्हणून चिलया बाळाची झिनोळी म्हणताना तिचे डोळे भरून येतात. फुगडी गाणाऱ्या प्रत्येक मालनींला चिलया स्वतःचा वाटतो. त्याच्याशी ती भावनिकरित्या जोडली जाते. समाज शिक्षणाच्या अनेक जागा इथे आहेत. आये ही गोष्ट गाऊन म्हणून दाखवत असताना आम्ही भावंडे तिच्याजवळ बसत असू. मांडीवर डोके ठेवून झोपत असू. ती स्वतः जास्त फुगडी घालीत नसे मात्र तिच्याकडे झिनोळी फुगडी गीतांचे भांडार होते. त्या वयाला फुगड्या संकलित करण्याचे ज्ञान नव्हते. तरीही त्या गीत नृत्यातून संस्काराची शिदोरी प्राप्त झाली ती आयुष्यभर पुरणारी होती. ही लोकगीते म्हणजे निव्वळ मनोरंजन नव्हते, तर त्यातून जगण्याचे सार एकवटले होते. जे आजही जीवन प्रवासात सोबत करीत आहे...


पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)