प्रतिभावान रेडिओ स्टार - पुरूषोत्तम सिंगबाळ

बालसाहित्य लिहिणं जसं कठीण असतं तसंच विनोदी साहित्य लिहिणंही कठीण असतं. विनोद हा अनेक प्रकारचा असतो. त्यात कुणीही दुखावला जाऊ नये याची काळजी घेत व्यक्तिगत वा सूचक शेरे मारणं म्हणजे ते विनोदी राहत नाही.

Story: ये आकाशवाणी है |
07th September, 12:30 am
प्रतिभावान रेडिओ स्टार - पुरूषोत्तम सिंगबाळ

कोंकणी साहित्यात मला विनोदी साहित्य एका लेखकाचं फार आवडलं. ते म्हणजे पुरूषोत्तम सिंगबाळ. हे आकाशवाणीच्या सेवेत निवेदक होते. बहुश्रुत बहुआयामी असं रसायन. प्रतिभावान. त्यांचे विनोदी टॉक रविवारच्या गाजलेल्या फोडणी फोव कार्यक्रमात रात्री ९.१५ वाजता ऐकले. पुनरावृत्ती झाली तरी ते श्रवण करण्यात अती आनंद असे. त्यांची शैली जबरदस्त होती. कुठल्या शब्दावर, कुठल्या अक्षरावर जोर आघात द्यावा, कुठे विराम घ्यावा, कुठे हेल, कुठे चढउतार हे त्यांना पक्कं माहीत होतं. टायमिंग इतकं सुरेख की कुठल्याही कलाकाराने वा निवेदकाने त्यांचा हेवा करावा. ते स्टेजवरचे नट होते. मी भूमिका पाहिल्या आहेत. तिथंही त्यांचे बारकावे पाहिले. अभ्यास, तयारी, उत्कृष्टता यांसाठी झटणारा हा कलाकार. 

शाणो कसो जावप, उतरां आणि भावोजी या त्यांच्या विनोदी निबंध सादरीकरणांची एक कॅसेट आली होती. काही लोकांकडे अजूनही हे ध्वनीमुद्रण आहे. मुळात हे टॉक त्यांनी रेडिओवरून दिले होते. त्याचं डोक्युमेंटेशन छापील रूपात झाले की नाही समजणं कठीण. तशी त्यांची अनेक भाषणे रेडिओवरून प्रसारित झाली. विनोदी साहित्यात लोक पोट धरून हसले पाहिजेत. ते कसं साधावं ही गोम सिंगबाळ यांना माहीत होती. ते क्रिकेट खेळायचे. छानपैकी गायचे. त्यांचा आवाज रेशमी होता. निवेदक म्हणून मला अजूनही त्यांच्या आवाजाचा सात्त्विक हेवा वाटतो. कंठाचा गोडवा विलक्षण. संगीताचं ज्ञान त्यांना होतं. त्यावेळी रेडिओवर एलपी रिकॉर्ड्स होत्या थोर शास्त्रीय संगीत गायकांच्या. त्या ऐकून नंतर ते आम्हालाही भेटल्यावर त्यातील बारकाव्यांविषयी सांगत. हे सांगितिक संस्कार त्यांच्या लयदार वाक्यरचनेत, निबंध, सादरीकरणात आगळं सौंदर्य खुलवून फुलवून येत. असे कलाकार रेडिओवर असणं म्हणजे रेडिओचं वैभव वाढणं. 

सिंगबाळनी आकाशवाणीच्या अनेक श्रुतिका (नाटकुलें) कार्यक्रमात भूमिका केल्या. दणकेबाज संवादांनी त्यांनी श्रोत्यांना हसवून टाकलं. भूमिका कसलीही असो त्या पात्राची भाषा समजून घेऊन त्याला ते न्याय देत. 

एकदा आकाशवाणीजवळच मी माझं रिकॉर्डिंग करून बाहेर थांबलो होतो. इतक्यात सिंगबाळ चालत आले. महालक्ष्मी मंदिराजवळ पोचणारा एक शॉर्ट कट आहे. त्या पायऱ्या चढून ते वर आले होते. मी त्यांना नमस्कार असं म्हणतानाच ते तिकडच्या आंब्याच्या झाडावर अकस्मात चढले... भाई काय झाले हे? अरे आमचा मित्र रमेश येत आहे. खालून नवी स्कूटर घेऊन. तो बघ. इतक्यात नवी करकरीत स्कूटर घेऊन रमेश आला. खर्र टक्क करून गियरं घालत होता. मी सिंगबाळच्या शेऱ्याने हसत होतो. काय झालं रे? रमेश स्कूटर पार्क करून मला विचारायला लागला. काही नाही, भाईने ज्योक केला म्हणून हसलो.  मी म्हटलं.

असे पावलोपावली विनोद करण्याची हजरजबाबी बुध्दी, वृत्ती सिंगबाळकडे होती. म्हणून  आकाशवाणीसाठी हा कलाकार बहुमोल योगदान देऊ शकला.

सिंगबाळ प्रामाणिक. आपल्या प्रत्येक कामात सृजनशीलता ओतत होता. एकदा विविध भाषेतील देशभक्तीपर गीतं मुलांना समजावून सांगून त्याचा अर्थ व सांगितिक रचना, ताल, मात्रा, वजन स्पष्ट करण्याचा एक साप्ताहिक कार्यक्रम देशभर सुरू झाला. पणजी केंद्रावर ही जबाबदारी सिंगबाळकडे दिली. त्यानं त्याचं सोनं केलं. तन्मयतेने गाऊन एक एक ओळ तो मुलांना समजून सांगायचा. बंगाली देशभक्तीगीत आमोर जन्मभूमी हे सिंगबाळने कथन करून मुलांना समजावलेलं गीत आम्ही विसरू शकत नाही. एक दोन तीन चार,.... असं मात्रांचं ठेक्याचं वजन तो गाऊन दाखवायचा तेव्हा त्याच्यातील सांगितिक जाण दिसायची. 

रेडिओ स्टार पुरूषोत्तम सिंगबाळ आठवणीत राहिला.


मुकेश थळी 
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक,
कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)