धर्म आपल्या जागी श्रेष्ठच आहे. अन्य धर्मातील लोकांना जवळ केले म्हणून आपल्या धर्माचे महत्त्व कमी होईल, असे कोणी समजण्याचे कारण नाही. एखादा मुस्लिम हिंदूच्या घरी गेला किंवा एखादा हिंदू मुसलमानाच्या घरी गेला, यातून धर्माला बाधा पोहोचणार आहे का? इतक्या छोट्याशा कृतीवरून धोक्यात यायला तुमचा धर्म इतका कमकुवत आहे का? हा विचार सर्वांनी करावा.
सध्या समाजात दोन तट पडले आहेत. एक, ज्यांना सामाजिक सौहार्द हवा आहे आणि दुसरा, ज्यांना कट्टरतावादाला खतपाणी घालून आपले डबके तेवढे सांभाळायचे आहे. हे सर्व धर्मांच्या बाबतीत दिसून येते. मात्र गोव्यातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवातील काही व्हिडिओ, फोटो व्हायरल झाले आणि कट्टरतावादाच्या धारणेला हलकासा हादरा बसला. उजव्या फळीचे लोक ‘सेक्युलर’ शब्दाची नेहमीच खिल्ली उडवतात. पुरोगामी विचार मांडणाऱ्यांना ‘फुरोगामी’ म्हणून हिणवतात. मात्र गोव्यातील सौहार्दाची परंपरा आजही टिकून असल्याचे चित्र गणेशोत्सवादरम्यान दिसून आले. यामुळे कट्टरतावादी शक्तींचा बराच हिरमोड झाला!
‘आम्ही सांगू तोच धर्म आणि आम्ही करू तीच पूर्व’ असा हट्टाग्रह अलीकडच्या काळात धर्माच्या बाबतीत बोकाळला आहे. केवळ धर्माचा द्वेष करण्यापुरता मर्यादित असलेला हा प्रकार आता सण, परंपरांच्या आड येऊ लागल्याचे वेदनादायी चित्र दिसून येते. एका धर्माच्या लोकांनी उत्सवानिमित्त मिरवणूक काढल्यास सार्वजनिक शांतता धोक्यात येईल, असा प्रचंड हास्यास्पद शोध एका धार्मिक संघटनेने लावला आणि पोलिसांना तसे निवेदनही सादर केले. मिरवणूक काढली गेली, तर म्हणे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल. ज्यांच्या विचारांचे सरकार सध्या सत्तेत आहे, अशा संघटनांनी तरी असे दावे करता नयेत. संघटनांच्या पातळीवर धार्मिक द्वेष वगैरे ‘वैयक्तिक भूमिका’ या तत्त्वावर एकवेळ मान्य करता येईल. पण अवघ्या समाजाला आणि सरकारी यंत्रणेला वेठीस धरण्याची ही वृत्ती योग्य नाही. गोव्यात अशा प्रकारांना थारा देता नये, याचे भान सरकारनेही राखायला हवे. समाजमन कलुषित करण्यासाठी कोणी कितीही ताकद लावली, तरी सार्वजनिक पातळीवर धार्मिक सौहार्द हाच समाजाला पूरक आहे, हे तत्त्व सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. किंबहुना गोव्याची हीच ओळख जगभर आहे. ती ओळख पुसण्याचा चंग बांधलेल्या काहींच्या डोळ्यांत अंजन घालणाऱ्या घटना गणेशोत्सवात समोर आल्या ही या वर्षीच्या गणेशोत्सवाची जमेची बाजू.
फादरनी जिंकली मने...
पहिला प्रसंग घडला उत्तर गोव्यात. कळंगुट चर्चच्या फादरनी गडेकर कुटुंबीयांच्या घरी भेट दिली आणि गणपतीच्या मूर्तीसमोर प्रार्थना केली. सर्वांना सद्बुद्धी देण्यासह निसर्ग आणि एकूणच गोव्याचे रक्षण करण्याची विनवणी त्यांनी हात जोडून केली. सर्वसामान्य गोवेकरांच्या मनातील निरागस भावनेचे हे प्रातिनिधिक उदाहरण. हा व्हिडिओ सोशल मीडियावरून वेगाने व्हायरल झाला आणि असंख्य लोकांनी फादरच्या भूमिकेचे स्वागत केले. आपल्या कृतीये समाजाला एकत्र आणण्याचे काम धार्मिक नेते किती सहजपणे करू शकतात, हे फादरनी दाखवून दिले. मात्र दोन्ही धर्मांतील काही कूपमंडुकांना ही गोष्ट रुचली नाही. या व्हिडिओवर अनेक जण नकारात्मक आणि कट्टरतावादी विचारांनी मेंदू कुरतडल्यासारखे व्यक्त झाले. काही संकुचित ख्रिस्तींनी, फादरना धर्माचा विसर पडला आहे का? दुसऱ्या धर्माच्या देवासमोर तुम्ही हात कसे जोडू शकता? असे बालिश प्रश्न उपस्थित केले. काही कट्टर वगैरे हिंदूंनी तर चक्क ज्या घरात फादर आले, त्यांच्या घरावर बहिष्कार टाका, अशी टोकाची भूमिका घेतली. ख्रिस्ती लोक ब्राह्मणांची प्रार्थना मान्य करतील काय, असेही निरागस प्रश्न काहींनी विचारले. सुदैवाने हा टोकाचा छिद्रान्वेषीपणा मोजक्याच लोकांना सुचला. दोन्ही धर्मांतील बहुसंख्यांनी फादरच्या भूमिकेचे स्वागतच केले. यापूर्वी एका फादरने शिवाजी महाराजांसंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य करून लोकांची, विशेषत: हिंदूंची नाराजी ओढावून घेतली होती. मात्र या फादरनी आपल्या कृतीने हिंदू समुदायासह बहुसंख्य ख्रिस्तींचीही मने जिंकली. याचाच अर्थ धार्मिक सौहार्दाचे वातावरण बहुसंख्यांना हवे आहे. हा सौहार्द मान्य नसणारे संख्येने आणि बुद्धीनेही अल्प आहेत!
मुस्लिम मुलाचा निरागसपणा...
दुसरा प्रसंग दिसून आला, दक्षिण गोव्यात. मुरगाव तालुक्यातील एका घरात गणपतीची आरती सुरू असताना हातात पंचारती घेऊन आरती ओवाळणारा एक मुस्लिम मुलगा दिसणारा व्हिडिओही लाेकांच्या पसंतीस उतरला. मुरगाव तालुक्यातील मेस्ता कुटुंबियांच्या घरी मेहबूब शेख या मुलाने अन्य भाविकांसोबत आरतीत भाग घेतला. इतकेच नव्हे, तर मेस्ता कुटुंबियांच्या विनंतीवरून त्याने हातात पंचारती घेऊन आरत्या पूर्ण होईपर्यंत गणेशमूर्तीला ओवाळले. आजच्या टोकाच्या धार्मिक द्वेषपूर्ण वातावरणावर फुंकर टाकणारे हे दृश्य सहृदयी माणसाला नक्कीच भावेल. अशा हजारो लोकांना या मुलाची ही कृती आवडली. मात्र काहींनी इथेही संकुचित भावना व्यक्त केल्याच. जी धार्मिक सहिष्णुता संपुष्टात आणण्यासाठी हे घटक हरप्रकारे प्रयत्न करतात, त्यावर पाणी फेरले गेल्यामुळे त्यांची ही अस्वस्थता समोर आली. समाज म्हणून विचार करताना अशा बारीकसारीक कृती परस्परपूरक असतात, याचे भान ठेवायला हवे. राजकीय दृष्टिकोनातून आखल्या जाणाऱ्या धार्मिक अजेंड्यांनी सर्व धर्मांना संकुचित केले आहे. त्या बंधनांना छोटासा धक्का अशा अनुकरणीय कृतीतून बसतो जो निरोगी समाजनिर्मितीसाठी उपयुक्त ठरू शकतो.
राजकीय नेत्यांची कृती अनुकरणीय
ज्या लोकांनी या दोन्ही प्रसंगांवर तोंडसुख घेतले, त्यांनी काही राजकीय नेते गणेश चतुर्थीत सहभागी होत असताना मात्र सोयीस्कर मौन पाळले. मायकल लोबो, रुडॉल्फ फर्नांडिस या ख्रिस्ती आमदारांनी तर थेट मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपतीसमोर आरती करत घुमटवादन केले. त्यांची ही कृती राजकीय दृष्टिकोनातून असो किंवा अन्य कोणत्याही. मात्र त्यातून फार मोलाचा संदेश लोकांपर्यंत गेला. आपल्या लोकप्रतिनिधींनीच अशा प्रकारे सर्वधर्मसमभावाचे ब्रीद जोपासले, तर लोकही त्यांचे अनुकरण करतात. ओल्ड गोव्याचे फेस्त असो वा ईद उल फित्रच्या मेजवानीत सहभागी होणारे हिंदू लोकप्रतिनिधीसुद्धा हाच संदेश देतात. तो संदेश आपण सर्वसामान्य माणसांनीही गांभीर्याने घ्यायला हवा. किमान जे समाजहितासाठी चांगले आहे, त्याचे अनुकरण करता येत नसेल, तर त्याचा अव्हेर तरी करू नये.
प्रश्न विचारा, उत्तरे मिळवा...
धार्मिक द्वेषाची दुकाने थाटलेले लोक सामान्य माणसाचा बुद्धिभेद करून आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करून घेण्यासाठी टपून बसलेले असतात. त्यांच्या षड्यंत्राला किती बळी पडायचे याचा निर्णय स्वत: घ्यायला हवा. ही माणसे कधीही सर्वसामान्यांना शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी किंवा सामाजिकदृष्ट्या समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी झटत नाहीत. ही कामे त्यांनी करणे अपेक्षित आहे, मात्र त्याच बाबतीत ते अवाक्षर काढत नाहीत. वरकरणी दाखवायला एखाद-दुसरे उदाहरण देतील. मात्र बुद्धिप्रामाण्यवादाच्या आधारावर प्रतिप्रश्न केले की, अन्य धर्मियांच्या कथित वर्चस्ववादाचा बागुलबुवा दाखवून दिशाभूल करतील. डॉक्टरकडे जाताना आपण त्याचा धर्म बघत नाही, रक्ताची गरज भासली की, दात्याचा धर्म विचारत नाही, संकटात मदतीसाठी स्वधर्मियाचीच मदत मिळेपर्यंत थांबण्याचा आत्मघातकीपणा करत नाही. मग दैनंदिन जीवनातच आपण सोयीचा धार्मिक उन्माद का दाखवावा? जे चित्र राजकीय धुरीण उभे करतात, ते कितपत खरे आहे, याचा कधी विचार केला आहे का? हेच राजकीय नेते प्रत्यक्षात अन्य धर्मियांशी सलोख्याचे संबंध राखून असतात, हे आपण लक्षात का घेत नाही? त्यामुळे धार्मिक उत्सवात सहभाग घेतला म्हणून आपण परधर्माला शरण गेल्यासारखे वातावरण कोणी तयार करू नये. धार्मिक सहिष्णुतेतूनच निकोप समाजनिर्मिती साध्य होऊ शकते, हे सर्वच धर्मांतील लोक जितक्या लवकर लक्षात घेतील तितके समाजासाठी उपकारकच असेल. तोच खरा धर्म!
धर्माचे महत्त्व कमी होईल, हा भ्रम!
एखादा मुस्लिम हिंदूच्या घरी गेला किंवा एखादा हिंदू मुसलमानाच्या घरी गेला, यातून धर्माला बाधा पोहोचणार आहे का? इतक्या छोट्याशा कृतीवरून धोक्यात यायला तुमचा धर्म इतका कमकुवत आहे का? हा विचार सर्वांनी करावा. आमचे कोरगावचे पत्रकार मित्र मकबुल माळगिमनी गेली सात वर्षे घरात गणपती पुजतात. त्यांच्या मनाचा मोठेपणा आपण मान्य करायला हवा. जागितक दर्जाचे गायक, संगीतकार रेमो फर्नांडिस शिवोलीतील घरात गणेशपूजन करत असत. आता ते पोर्तुगालवासी झाले आहेत. म्हापसा, डिचोलीसारख्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्यात मुस्लिमांचे सक्रिय याेगदान राहिले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. धर्म आपल्या जागी श्रेष्ठच आहे. अन्य धर्मातील लोकांना जवळ केले म्हणून आपल्या धर्माचे महत्त्व कमी होईल, असे कोणी समजण्याचे कारण नाही.