वेधक माटोळ्या

माटोळीचे साहित्य गोळा करत असताना कित्येक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामांमुळे वनस्पती नामशेष झाल्याचीही उदाहरणे ऐकायला मिळाली. एका विशिष्ट प्रकारची वनस्पती दुसऱ्या कलाकारांपर्यंत पोहचू नये म्हणून त्या भागातून मुळापासून हटवणे यासारखी दुष्कृत्ये घडत असल्याची खंतही कलाकारांनी यावेळी व्यक्त केली.

Story: साद निसर्गाची |
07th September, 12:12 am
वेधक माटोळ्या

गोव्यातील अंत्रूज महाल हा सांस्कृतिकरित्या श्रीमंत महाल म्हणून ओळखला जातो. हा तालुका म्हणजे‌ कलाकारांची जणू खाणच. चतुर्थीच्या निमित्ताने बांधण्यात येणारी माटोळी ह्या गोष्टीला दुजोरा देते. कलाकुसरीने संपन्न असलेले कलाकार हीच या तालुक्याची खरी ओळख. अंत्रुज महालातील कलाकारांनी विविध प्रकारची वनसामग्री वापरून कलात्मक पद्धतीने साकारलेल्या माटोळींचा आढावा‌ घेणारा हा लेख.

केळबाय कुर्टी येथील रहिवासी विशांत वसंत गावडे व कुटुंबीयांनी सुबक अशी श्रीगणेशाची माटोळी साकारली होती. मक्याचे कणीस, कुडू, शेंगा, घागऱ्या, कुंडळे व विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा वापर‌ करुन ही माटोळी बांधण्यात आली होती. ही माटोळी साकारण्यासाठी तब्बल ३३३ विविध प्रकारचे रानटी साहित्य वापरण्यात आल्याचे सांगण्यात आले. इथून काही अंतरावर, रायत-कोयरवाडा येथील रहिवासी श्रीकांत सतरकर आणि कुटुंबीयांनी आकर्षक अशी गणपतीची माटोळी साकारली होती. माट्टा, घागऱ्या, कांगले, कारले, कुंडले, भोपळा, नागूलकुडा, सागरगोटे, कारली, रानटी भेंडी, काकडी व अन्य औषधी वनस्पतींच्या व्यतिरिक्त मुख्यत: कुडुची फुले, भेरली माडाच्या झावळ्या, मुळा, पडवळ, सागवान वापरून गणेशरुपी टुमदार माटोळी साकारलेली होती. माटोळीसाठी वापरण्यात आलेल्या वनस्पतींची नावे, त्यांचे औषधी गुणधर्म व इतर माहिती श्री सतरकर यांनी तपशीलवार पद्धतीने भिंतीवर लावली आहे. इतर सजावटीसाठी वापरलेली झाडेसुद्धा मुळासकट आणून ठेवली होती जेणेकरून ही झाडे परत लावता‌ येईल, हे कौतुकास्पद. वनस्पतींच्या २०० विविध प्रजाती वापरून ही माटोळी बांधण्यात आली आहे.

तळूले-बांदोडा येथील तानाजी काशिनाथ गावडे यांनी ३०९ रंगीबेरंगी रानटी फळे-फुले-पानांचा वापर करून बजरंगबलीची दैदिप्यमान अशी माटोळी साकारली होती. सुपारी, गुंजी, भोपळा, काकडी, मिरची, कुडूचा वापर करुन तयार केलेली मारुतीरुपी माटोळी खूपच उठावदार दिसत होती. बोणये सावई-वेरे येथील तृप्ती पालकर व कुटुंबीयांनी साकरलेली विष्णूरुपी माटोळी म्हणजे मन तृप्त करणारी कलाकृती. वनस्पतींच्या २०० पेक्षा जास्त प्रजातींचा उपयोग करुन ही माटोळी साकारण्यात आली आहे. 

गावठण-प्रियोळ येथील दत्ता शंभू नाईक यांच्या घरात पाऊल ठेवता थक्क करणारा नजारा पहायला मिळाला. चोहोबाजूंनी ५००० पेक्षा जास्त आंब्याच्या कोयी वापरुन खांब साकारले होते. प्रत्येक खांबाच्या कोपऱ्यात कलाकुसरीने कोयांच्या आधारे तयार केलेले पक्षी खूप सुंदर दिसत होते. डोके वर करुन पाहता मधोमध अप्रतिम अशी माटोळी पहायला मिळाली. माटोळी सजावटीसाठी तब्बल ३४० वेगवेगळ्या प्रकारची वन सामग्री वापरण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले. फोंडा तालुक्यातील मडकई गावची ग्रामदेवी श्री नवदुर्गा मातेची प्रतिमा माटोळी स्वरूपात साकारण्यात आली होती. पोर्तुगीज राजवटीत देवी नवदुर्गेने लोकांना गावशीकान्नीच्या रुपात प्रथम दर्शन दिले होते. यावेळी श्री देवी नवदुर्गा गावशी गावातून मडकईच्या पारंपाई गावात स्थलांतरित झाली होती असे सांगण्यात येते. तिचे मूळ देठलीतील प्रकट स्वरूप दत्ता नाईक यांनी माटोळी स्वरुपात दर्शविले आहे. घोसाळे, सुपारीची पाने, शेंगा, गवताच्या काड्या, अबोलीची फुले व इतर वन सामग्री वापरून कलात्मकरीतीने ही माटोळी साकारण्यात आली आहे. यामागचा सविस्तर इतिहास भिंतीवरील फलकावर लावण्यात आलेला आहे.

माटोळी कलाकारांनी ही सर्व वन सामग्री चोर्ला, अनमोड, म्हादई, तिळारीच्या खोऱ्यातून शोधून आणल्याचे‌ सांगितले. गोव्यातील व गोव्याबाहेरील जंगले पिंजून हे पर्यावरणपूरक साहित्य गोळा करण्यात आल्याचे समजले. माटोळीचे साहित्य गोळा करत असताना कित्येक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. विकास कामांमुळे वनस्पती नामशेष झाल्याचीही उदाहरणे ऐकायला मिळाली. एका विशिष्ट प्रकारची वनस्पती दुसऱ्या कलाकारांपर्यंत पोहचू नये म्हणून त्या भागातून मुळापासून हटवणे यासारखी दुष्कृत्ये घडत असल्याची खंतही कलाकारांनी यावेळी व्यक्त केली.


स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)