शब्द - फुलोरा

"माझ्या जीवनातील संघर्ष कधी संपणार??" असा प्रश्न प्रत्येकाने आपल्या देवाला, आपल्या मनाला, आपल्या जवळच्या व्यक्तीला विचारला असेलचं. मित्रहो याचे उत्तर आपल्याकडेच असते कारण आपल्याला माहीत असते की जो पर्यंत जीवन आहे तो पर्यंत संघर्ष आहे. या संघर्षात लढण्याचे बळ देव आपल्या पदरात घातल्या शिवाय राहत नाही.

Story: वाचू आनंदे | अक्षता किनळेकर |
27th May 2023, 11:04 pm
शब्द - फुलोरा

दैनंदिन जीवनातील अशाच छोट्यामोठ्या त्रासांतून स्व सुखाचा शोध घेताना कवयित्री शीला दिनेश काकोडकर यांनी आपल्या प्रज्ञा- प्रतिभेद्वारे दुःखांवर मात केली. गुणकौशल्यांच्या आधारे स्वतःची  जागा निश्चित केली. त्यांच्या अलौकिक परिश्रमांमुळे त्यांच्या हस्ते 'शब्द फुलोरा' नावाचा ५६ पृष्ठ असलेला कवितासंग्रह निर्माण झाला. 'शब्द फुलोरा' या कवितासंग्रहात एकूण ४१ कविता आहेत. सुदेश काशिनाथ आर्लेकर यांच्या जागर प्रकाशन, गोवातर्फे प्रकाशित झालेल्या या  कवितासंग्रहाला लेखिका पूर्णिमा देसाई यांची सखोल अभ्यास करून लिहिलेली  प्रस्तावना लाभली आहे. 

श्री श्री रविशंकरजी यांचा कार्यक्रम गोव्यात झाला होता. त्या उत्सवाचे औचित्य साधून एक स्मरणिका प्रकाशित होणार होती. डॉ व्यंकटेश हेगडे यांच्या सांगण्यावरून कवयित्री शीला काकोडकर यांनी श्री श्री रविशंकरजींवर आधारित कविता रचली व तेथूनच त्यांच्या जीवनाला साहित्यदिशा प्राप्त झाली.

शेवटी कविता म्हणजे आपल्या मनातल्या आतील भावभावनांची लयबद्ध अभिव्यक्ती असते. जे सरळ सांगता येत नाही ते कवितेच्या आधारे, प्रतिमांच्या  पाठिंब्याने आपण प्रकट करत असतो. आपण मुक्त होत असतो. मनात अनेक गोष्टी उकळत असतात त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे अभिव्यक्त होणे. 

पूर्वी बायका आपले मनातले वादळ ओव्यांच्या, फुगड्यांच्या माध्यमातून शांत करत होत्या. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की, आपल्या मनातील कल्लोळ तसाच साचून ठेवला तर एक दिवस त्याचा स्फ़ोट होतो व गोष्टी अधिकच बिघडून जातात. या अभिव्यक्तीचे महत्त्व शीला काकोडकर यांना निश्चितच उमगले आहे म्हणूनच तर कवितेद्वारे त्यांनी स्वतःला व्यक्त केले आहे.

शीला काकोडकर यांची कविता म्हणजे त्यांच्या अंतर्मनाची कविता. कधी त्यांची  कविता बंधनांना झिडकारताना दिसते. तर कधी त्यांच्या मनात भावनांचा कोंडमारा एवढा होतो की, त्यांची कविता सुखाचा शोध घेताना दिसते. कधी नवीन कौशल्ये आत्मसात करण्यात रमते तर  कधी  आईच्या आठवणींनी कासावीस होते कधी नातवाच्या मायेने ओथंबून जाते.

जसजसे पुस्तकाचे पान मागे वळते तसतश्या शीला काकोडकर यांच्या  कविता वेग घेताना दिसतात. जीवनाचा अर्थ कवयित्रीला समजल्यामुळे त्यांच्या सर्व कविता वास्तविकता स्पष्ट करणाऱ्या आहेत. पहिला कवितासंग्रह असला तरी कवितेतील भाव सच्चा आहे. त्या कविता ओघवत्या आहेत. कविता कवयित्रीला सहज स्फुरल्याची जाणीव वाचताना होते. कवितेंमध्ये योजनापूर्वकता, साम्यपण दिसून येत नाही. त्यांच्या कवितासंग्रहाची सुरुवात 'आईची गाथा' या कवितेद्वारे झाली.

"आईच्या  ममतेला तोड नाही

आईच्या व्यथेला पूर्णविराम नाही

आईची बरोबरी कोणी करू शकत नाही

आईची अवहेलना कोणी करत नाही"

आईच्या मायेला सीमा नाही म्हणूनच आईची तुलना या जगात कुणाशीही करता येणार नाही. अशा या आईची  महती 'आईची गाथा' या कवितेत गाताना दिसतात.

'मनाचे दुःख' या कवितेत कवयित्री दुःखांचा अंत शोधत आहेत. जीवनाचा खेळ त्यांच्या  समजूती बाहेरचा आहे. 

"माणसाच्या जीवनाचे खेळ

आनंद दुःख भावनिक मेळ

नाही त्याला आदी

नाही त्याला अंत"

असे म्हणत स्वतःच्या विचारांनी त्यांनी स्वतःलाच मारून टाकले आहे.

'क्षणभँगुर असे हे जीवन ' या कवितेत,

"क्षणभंगुर  असे हे जीवन

काहीच नाही जीवनात धन

नाती गोती आप्त बंधू

आयुष्याचे हे असे कंदन

मुक्त होत नाही कधी

मानवाचे हे स्पंदन"

असे म्हणत कवयित्री जीवन मर्म सांगून जातात. जीवन क्षणभंगुर आहे हे माहीत असूनही माणसे क्षणिक जीवनात गुंतत जातात. शरीर नश्वर आहे ते सोडून जायचेच आहे हे माहीत असूनही माणूस भौतिकवादी दुनियेत कसा स्वतःला अडकवून घेत असतो ते कवितेद्वारे मांडले आहे. 'मन-शरीर' या कवितेद्वारे लेखिकेने आपला निरुत्साह व्यक्त केला आहे. ना त्यांच्या मनाला शांती आहे ना शरीराला. कवितेत त्या म्हणतात,

"मनाचा कोंडमारा सहन होत नाही 

व्याकुळता भयभीतपणा निरुत्साह

मन मरते शरीरही कोमेजते 

नाही आनंद नाही परमानंद"

'दैव' या कवितेद्वारे दैवाशी संबंधित आपले मत सांगितले आहे. आपले दैव आपल्याच हाती असल्याचे त्या सांगतात. 'दैव' कवितेत,

"दैव आहे तुझ्याच हाती

न कळे मज हे कसे होती"

"इच्छाशक्ती असते अगाध 

तेव्हाच तूज मिळतो एक घास "

इच्छाशक्तीच्या बळावर माणसू काहीही साध्य करू शकतो त्यामुळे दैवावरतीच अवलंबून राहण्याची चूक कोणी करू नये.

'नाटकाची कार्यशाळा' या कवितेत नाटकाच्या कार्यशाळेची धमाल वर्णिलेली आहे.  एखादे कार्य करताना आपल्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण झालेली असते. नवीन कार्य करताना मन उत्साही असते त्याच बरोबरीने घाबरलेले ही असते. हीच घालमेल कवितेत कवयित्रीने चोख आकारली आहे. 

"नाटकाची कार्यशाळा

किती बरं सांगू

काय शिकू काय नको

असं कसं बोलू

अभिनय कला शब्दफेक

कशा तऱ्हेने झेलू

मास्तर आम्हां शिकवणार

समजेल तसं करूं"

"सत्य आणि असत्य भरले आहे नसानसात

सत्याचे पारडे खाली, असत्याचे वर

नको ती विटंबना नको ती विडंबना

मनामनात भिनते आहे भयाची व्याकुळता"

असत्याची बाजू कलियुगात भारी आहे असे  स्पष्ट करते. जो तो पैशामागे धावत आहे. पाप पुण्याची भीती कुणालाही राहिली नाही आहे असे कवयित्रीचे मंतव्य आहे.

आपल्या नातवाच्या जन्मानंतर कवयित्रीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. या एका सुखद क्षणामुळे त्यांनी  ब्रह्माण्डाच्या सर्व दुःखांना बाजूला केले आहे. 'नाव' या कवितेत आपल्या नातवाच्या आगमनाचे वर्णनगीत त्या गाताना दिसतात.

"प्रतीक्षा संपली आता

तान्हुल्यास कवेत घेता

वेदनेचाच तो अंत होता

आनंदाचा हा क्षण आता"

असे म्हणत, तान्हुल्याला कवेत घेत त्यांनी आनंदोउस्तव साजरा केला.

"पानापानात फुलाफुलात

आहे खास अशीच बात

दरवळतो सुगंध क्षणाक्षणात

मन प्रसन्न होते नसानसांत"

फुलाच्या सुगंधाचे गुणगान वरील कवितेत गायले आहे. त्या फुलाची पवित्रता, तो सुगंध मानवी अंगी देखील असावा असे कवयित्रीला वाटते आहे.

'अंतयात्रा' ही कविता 'शब्द फुलोरा' या पुस्तकातील उत्कृष्ट कविता आहे.

"मीच माझ्या जीवनाची

अंतयात्रा पाहिली

मीच माझ्या प्राक्तनाची

राख भाळी लावली"

आयुष्य ज्यावेळेस जगत असताना माणसाला अतीव वेदना होतात. नरकीय भास होत असतो, कोलमडून पडलेल्या जीवाला मरणाची आस लागू लागते तेव्हाच हृदयाला भिडणाऱ्या, हृदयाची लक्तरे करणाऱ्या  वरील ओळी सुचू शकतात.

"माझ्या हृदयाची ती धडकन

बांधीत होती मला मोठे बंधन

सांग तू मला मी आहे तरी कोण

एक सुंगंधित लहर वा वादळ"

"जन्माजन्मांतरीची बंधने तोडीत

वादळ वादळाची चिंता न करीत

पोहत होते मी सागरात यथेच्छ

ना मरणाची भीती ना कुणाची"

'प्रेम लहरे' या कवितेतील वरील दोन कडवी कवयित्रीचे अवघे व्यक्तिमत्त्व उलगडून गेली. कधी जीवनात सुगंधित असलेली लहर स्वतः कवयित्री असली तरी प्रसंगी वादळाचे रूप घेऊन युद्ध जिंकणारी योद्धा देखील असल्याचे त्यांच्या 'शब्द-फुलोरा' या कवितासंग्रहाद्वारे स्पष्ट होते. काही कवितेमध्ये त्या आपल्या डगमगलेल्या आत्मविश्वासबद्दल न घाबरता सांगताना दिसतात तर काही कवितेत त्यांच्या निर्धास्त मनाचे दर्शन होते.

आईच्या मायेतून स्फुरलेल्या कवितेद्वारे  या  संग्रहाची सुरुवात  तर शेवट आपल्या नातवाचे निरागस मुख पाहून मिळालेल्या धीरातून होतो. एका मननशील कवयित्रीच्या या भावनात्मक, साध्या व सच्चा कविता आहेत. पुस्तकरुपातला शब्दांचा किंबहुना कवितेचा हा सुंदर फुलोरा कवयित्रीने सर्व वाचकांना अर्पण केला आहे .