सामुद्रिकम्

ज्योतिषशास्त्राचे संहिता, गणित व जातक असे तीन स्कंध आहेत. सामुद्रिक शास्त्र हे संहितास्कंधाचा भाग आहे. अंगलक्षण होराशास्त्र म्हणून देखील ओळखले जाते. पाराशर, व्यास, नारदमुनी, वराहमिहिराचार्य यांनी सामुद्रिक शास्त्राविषयी पुष्कळ माहिती लिहून ठेवली आहे.

Story: ग्रंथोपजीविये | वैद्य. रश्मिना आमोणक� |
27th May 2023, 11:00 pm
सामुद्रिकम्

स्त्री लक्षणम्, सामुद्रिक चिंतामणि, सामुद्रिक पुरुष-स्त्रीलक्षणादि, भावकुतूहलम्, शिव-पार्वतीसंवाद, सामुद्रिक नष्टजातकम्, सामुद्रिक लक्षण, सामुद्रिक स्वप्नाध्याय बृहस्पति, हस्तपाद सामुद्रिक लक्षणानि, सामुद्रिकम् असे सामुद्रिक शास्त्रावरचे अनेक ग्रंथ आहेत.

गुजरातमधल्या दुर्लभराज नावाच्या ज्योतिष पंडिताने इ.स. ११६० साली 'सामुद्रिक तिलक' नावाचा स्त्री-पुरुष लक्षणांचा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला. अंगलक्षण होराशास्त्र हे वैद्य मो.य. परांजपे यांनी लिहिलेले पुस्तक उपलब्ध आहे. शरीरलक्षणांवरून माणसाची आर्थिक स्थिती, यशापयश, बुद्धिमत्ता, स्वभाव, सुख दुःख यांचा अंदाज बांधला जात असे. आताच्या काळात हस्तसामुद्रिक म्हणजेच हात बघून भविष्य सांगण्यापुरताच या शास्त्राचा अभ्यास मर्यादित झाला आहे. स्त्री-पुरुषांची बत्तीस लक्षणे शुभ म्हणून सांगितली आहेत.

बेंबी उजव्या फेऱ्याची व गंभीर असावी. स्वर गंभीर असावा. नख, डोळे, ओठ, तालू, पाय, जीभ, तळहात ही आरक्त असलेली शुभ मानली जातात. अवयवांचे सांधे, दात, त्वचा, नखे, केस हे कृश असली पाहिजेत. कपाळ, मुख, हृदय ही मोठी असावीत. नाक लांबट असल्यास शुभ. तसेच दोन स्तनांमधील भाग, डोळे, हनुवटी व भुजा ही सुद्धा लांबट असावीत. पाठ, लिंग, जंघा (पोटऱ्या), मान ही आखूड, कृकाटिका (मान व मस्तक यांचा सांधा), मुख, नखे, ऊर, काख व नाक ही उंच असावीत. ही ३२ लक्षणे अतिशय शुभ मानली जातात. शिवलीलामृतात महानंदा ही शिवभक्त वेश्यासुद्धा बत्तीसलक्षणांनी युक्त असल्याचा संदर्भ आहे. महानंदा पुढे मोक्षपदाला गेली.

पादलक्षणांचा अभ्यास करताना संपूर्ण पाऊल, अंगठा, बोटे, नखे, तळपायाचा आकार व रंग, पावलांवरील शिरा, केस व सुरकुत्या तसेच बोटांची जाडी, लांबी एकमेकांशी असलेली संगत, पाऊल टाकण्याची पध्दत, चपला कशा झिजतात यांचा विचार केला जातो.

हस्तलक्षणात तळहाताच्या रेषा, लालसरपणा, उंचवटे यांचा विचार होतो. दंड, मनगट, पंजा, बोटे, नखे, केस, हाताची लांबी बघितली जाते. 

शरीराचे तेज व कांति हे देखील सामुद्रिक शास्त्रात अभ्यासले जाते. पायाच्या घोटा, मांड्या, पोटऱ्या, गुडघा यांचा आकार, लांबी, पायाचा बारीकपणा किंवा स्थूलपणा वगैरेचा विचार शास्त्रात केलेला आहे.

स्त्रीपुरुषांचे कंबर, गुह्येन्द्रिय, नाभि, पोट, छाती, पाठ, स्तन यांची लक्षणे व त्याभागावरील केस हा अभ्यासाचा विषय आहे.

श्री स्वामी समर्थ यांचा चेहरा गोल आहे. कान मोठे असून डोळ्यांच्या रेषेच्या खाली भेदक परंतु अंतर्मुख दृष्टी आहे. ही अवतारी पुरुषाची लक्षणे आहेत.

वाल्मिकी रामायणात माता सीतेची शुभलक्षणे वर्णिलेली आहेत.

केशा सूक्ष्मा: समानीला भृवौचासंहते मम ।

केस बारीक सूम्क्ष व नीलवर्णी आहेत. भुवया असंहत म्हणजे न जुळलेल्या आहेत.

वृत्ते चारोमके जंघे दंताश्चाविरला मम ।। 

मांड्या गोलाकार पुष्ट व केस नसलेल्या आहेत.

शंख नेत्रे करौ पादौ गुल्फावुरु समौचितौ। 

डोळे शंखाकार असून हात, पाय, मांड्या, घोटा बांधेसूद आहेत. हाताच्या अंगठ्यावर यवचिन्ह आहे. मंदस्मित आहे. अशी बारा शुभफलदायी चिन्हे, पायावरील पद्मचिन्हे ही सुलक्षणी, पतिव्रता, पुत्रवती, अविधवा स्त्रियांच्या अंगावर असतात.

राजस्त्रियांना देखील स्त्रीलक्षणांचे ज्ञान असे. दासींची नेमणूक करताना या ज्ञानाचा उपयोग केला जाई. द्रौपदीचे राणी सुदेष्णाने केलेले खालीलप्रमाणे वर्णन ह्याची ग्वाही देते.

नोच्चगुल्फा संहतोरुस्त्रिगम्भीरा षडुन्नताः । 

रक्ता पंचसु रक्तेषु हंसगद्गद् भाषिणी ।।

सुकेशी सुस्तनी शामा पीनश्रोणि पयोधरा ।

द्रोपदीच्या पायाचे घोटे उंच नसून निगूढ होते. त्रिगंभीरा म्हणजे शब्द, बुध्दी, नाभि हे तीन गंभीर आहेत. षडुन्नता ह्याचा अर्थ नासिका, अक्षि, श्रोत्र, नख, स्तन, कृकाटिका उठावदार होते. पंच रक्तानि म्हणजे पादपाणितल, नेत्र, ओठ, जिव्हा, नख हे पाच अवयव लालसर रंगाचे होते.

स्त्री व पुरुष यांची उन्मान (उंची), मान (वजन), गति (चालण्याची ढब), संहति (हातापायांच्या सांध्यांचा ठसठशीतपणा), सार (शरीराचा दणकटपणा व धातूंचे सारासारत्व), वर्ण (त्वचेचा रंग), स्नेह (त्वचेची तुकतुकी), स्वर (आवाज), प्रकृति, सत्त्व, अनूक, क्षेत्र (अवयवाची ठेवण), मृजा म्हणजे अंगकांती इत्यादि गोष्टींचे शास्त्रीय दृष्टीने अवलोकन करण्यास वराहमिहिर यांनी सांगितले आहे.

प्रथम आयुष्य किती आहे पाहावे. अल्पायु माणसांत इतर शुभलक्षणे असल्यास फायदा नसतो. तळपायापासून आरंभ करून डोक्यापर्यंत क्रमाक्रमाने निरनिराळे अवयव अभ्यासून शुभाशुभ लक्षणे पाहावी.

एकदा भोजराजा शिकारीला चालला असताना त्याला धुळीत उमटलेली एका माणसाची पाउले आढळली. भोजराजा उत्तम सामुद्रशास्त्रवेत्ता होता. पावलांच्या ठशावरून ती पावले निश्चितच कुणीतरी राजपुरुषाचीच असली पाहिजेत याविषयी त्याची खात्री पटली. त्या माणसाचा शोध घेऊन त्याच्या अंगलक्षणांची परीक्षा केली. राजलक्षणांकिंत असूनसुद्धा निष्कांचन व कष्टमय जीवन जगणाऱ्याच्या शरीरावर एखादे जबरदस्त राजयोगभंगलक्षण कुठेतरी असावे. म्हणून एक कणकेचा गोळा घेऊन त्या माणसाच्या टाळयाचा ठसा घेण्यात आला आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या टाळयावर 'काकपद' नावाचे अशुभ चिन्ह दिसून आले.  भारतीय समाजात बऱ्याच बायका पूर्वी स्त्रीचे पाय व पायाचा अंगठा या वरून वैधव्य योगाचा अंदाज लावत. परंतु वैधव्ययोग भंग करणारी चिन्हे इतर अवयवात असल्यास वैधव्य टळू शकते. अर्धवट ज्ञान घातकी असते. सामुद्रिक शास्त्राचा सखोल अभ्यास करून व सर्व चिन्हाची व्यवस्थित गोळाबेरीज करून एखाद्याचे चारित्र्य, आयुष्य, स्वभाव याविषयी अंदाज लावावा. स्त्री शुभलक्षणी मिळाल्यास गृहस्थाश्रम सुखाचा होतो. म्हणून लग्न करण्यापूर्वी प्रथम स्त्रीची शुभा- शुभ लक्षणे जाणून घेऊनच विवाह केला जात असे. जावईपरीक्षा सुद्धा अशीच केली जाई. आजच्या काळात देखील सामुद्रिकाचे ज्ञान महत्त्वाचे आहे.