वृक्षवल्ली आम्हा सोयरे

मे महिना सुरु झाला की उष्णता वाढू लागते. अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात. जीव हैराण होतो. कधी एकदा पाऊस सुरु होतो आणि उष्णतेपासून मुक्तता मिळते असे होऊन जाते. आपण सर्वजण वाट पहात असतो वर्षाऋतूच्या आगमनाची.

Story: लोकसंस्कृती | पिरोज नाईक |
27th May 2023, 10:59 pm
वृक्षवल्ली आम्हा सोयरे

वर्षाऋतू म्हणजे सारी सृष्टी प्रफुल्लित करणारा, नवचैतन्य प्राप्त करणारा ऋतू. सर्वांचे डोळे आभाळाकडे लागलेले असतात. ग्रामीण भागातील कष्टकरी समाजातील अनुभवी माणसांना पाऊस कधी व कोणत्या नक्षत्रावर येणार याचा बरोबर अंदाज असतो. तो भराभर आपली कामे उरकून घेतो. घरे, गोठा शाकारतो. पावसाळ्यात गुरांसाठी गवताची कुडी काढतो, जळावू लाकूड, मिर्ची-मसाल्याची साठवण झाली की तो चिंतामुक्त होतो.

अकस्मात आभाळात काळे ढग घिरट्या घालू लागतात. सोसाट्याचा वारा सुटतो. ढगाच्या गडगडटात आणि विजेच्या लखलखाटात पावसाचे तांडव नृत्य सुरु होते. धूळमिश्रित पाण्याचे पाट वाहू लागतात. सगळा परिसर न्हाऊन धुवून स्वच्छ होतो. नदी-नाले भरुन वाहू लागतात. सृजनशीलतेचा अविष्कार घडवणाऱ्या वसुंधरेबरोबरच मानव, प्राणी, पशु-पक्षी, लता-वेली, झाडे-झुडपे सगळेच हर्षभरीत होतात.

वर्षाऋतू आला की सण-उत्सव, व्रत-वैकल्ये सुरु होतात. जगाच्या नकाशावर अग्रेसर झळकणारी भारतीय संस्कृती म्हणजे भारतीयांचा मानाचा मुकुटमणी. ती लोकवेद, लोककला यापुरती मर्यादित नसून निसर्गप्रेम, आदर भावना, श्रद्धा, धार्मिकता, भक्तीभाव, वात्सल्य, आपुलकी याने परिपूर्ण आहे. त्यामुळेच येथील लोकजीवनात सण-उत्सवांना महत्त्व देत असल्याचे दिसून येते.

मानवी जीवनामध्ये विवाहाला विशेष महत्त्व आहे. विवाह सोहळा हा मानवी उत्पतीचा केंद्रबिंदू असे ठरवलेले असल्याने, हिंदू धर्मीय हा सोहळा धार्मिक पद्धतीने देवा-ब्राम्हणासमक्ष अग्निनारायणाच्या साक्षीने पार पाडतात. सप्तपदीच्या सात फेऱ्यानंतर मालीनीला सौभाग्याचा मान प्राप्त होत असतो. त्यावेळेपासून पती हाच परमेश्वर मानून ती जगत असते. त्याच्या समवेत कितीही कष्ट सोसावे लागले, हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, छळवाद झाले तरीही तिन्ही सांजेला सांजवात करताना तुळशी वृंदावनापाशी तिचे एकच मागणे असते, ते म्हणजे अखंड सौभाग्यादान.

सौभाग्यासाठीच तिची व्रत-वैकल्ये, उपवास असतात. निसर्गदेवता सर्वश्रेष्ठ दैवत आहे. त्याच्या सनिध्यात राहून त्याची उपासना केल्यास जीवनावश्यक सर्व गोष्टीचा आपल्याला लाभ होऊ शकतो. हे ज्ञात झालेली मालीनी सूर्य चंद्र, वृक्ष, वेली यांची उपासना करुन त्याच्या प्रती आदर भावना व्यक्त करते. श्रावण महिन्यात आयतार पूजन असते. मकर संक्रातीला आदित्य पूजन, कोजागिरीला चंद्र दर्शन, गौरीपूजन, तिळगुळ समारंभ, दिवजोत्सव असे सण-उत्सव साजरे करुन पतीला दीर्घायुष्य चिंतते.

 ज्येष्ठ महिन्यात येणारी वटपौर्णिमा हे असेच एक व्रत पावसाळ्यातील पहिला सण. यादिवशी सुहासिनी वटसावित्रीचे व्रत करतात. सावित्रीने हे व्रत करुन अंधसासू-सासऱ्याची दृष्टी व सत्यवानचे प्राण परत आणल्याची आख्यायिका आहे. सुवासिनी महिला या दिवशी फक्त फलाहार घेतात. पारंपरिक वेषभूषा करुन वडाच्या झाडाखाली एकत्र जमतात. वटवृक्षला दोरा गुंडाळून त्याची पूजा करतात. जमलेल्या सुवासिनींना हळद-कुंकू करतात. वडाच्या पानापासून द्रोण तयार करुन त्यामध्ये नारळ, केळे, अननस, आंबा, जांभूळ, कोकम यासारखी फळे घालून वाण देतात व अखंड सौभाग्यदानाची मागणी करतात. वडाचे झाड हे विस्ताराने, आकाराने खूप मोठे; दीर्घायुषी असते. त्याच्याप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, कुटुंबाचा विस्तार व्हावा, वंशवेलीला फळे-फुले बहरुन यावी यासाठी मनोभावे प्रार्थना करतात. 

मानवाला जगण्यासाठी लागणारा प्राणवायू, अन्न, वस्त्र, निवारा, निरनिराळी औषधे तर वनस्पतीपासूनच मिळतात. हवा शुद्ध करण्याचे काम पर्यावरणाचे संतुलन राखणारे किटक, पशु, पक्षी यांचे जीवन वनस्पतीवरच अवलंबून आहे आणि म्हणूनच अशा मोठमोठ्या दीर्घायुषी वृक्षांना पवित्र मानून पूर्वजांनी त्यांना देवस्वरुप दिलेले आहे.