वयानुरूप आपल्या त्वचेत बदल घडत जातो. त्वचेवर सुरकुत्या पडणे, त्वचा सैल पडणे अशा वयाच्या खुणा दिसू लागतात. खरं म्हणजे त्वचेचं सौंदर्य टिकवणं हे आपल्या हातात असतं, परंतु त्यासाठी तरुणपणीच प्रयत्न करावे लागतात. एकदा त्वचा डल झाल्यानंतर ती पूर्ववत होण्यासाठी खूप प्रयत्न करूनही फारसे यश मिळत नाही. आपल्या काही वाईट सवयीच आपल्या सौंदर्याला बाधा आणण्यास कारणीभूत असतात. आपण त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो. असे न करता, चांगल्या सवयी जोपासा नि तुमचे रुप खुलवा!
रात्री उशिरापर्यंत जागं राहून नेट सर्फिंग, टी.व्ही. पाहणं, वाचन न करता योग्य वेळी झोपून पहाटे लवकर उठा. झोप पूर्ण झाल्यास त्वचा तजेलदार दिसते तसेच डोळ्यांभोवती काळी वर्तुळेही येत नाहीत.
वर्तमानपत्र, लेख वा मासिक वाचायचे असल्यास ते मोबाईल वा लॅपटॉपवर वाचणे टाळा. यामुळेही डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येऊ शकतात.
झोपल्यानंतर सतत कुस बदलल्यामुळे चेहर्यावर सुरकुत्या पडतात. तेव्हा शक्यतो सरळ ताठ झोपण्याचा प्रयत्न करावा.
कोणत्याही ऋतुत घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीनचा वापर अवश्य करा. दर तीन-चार तासानंतर ते परत लावा. यामुळे सनटॅन सोबतच प्रिमॅच्युअर एजिंगपासून वाचता येईल. भारतीयांनी कमीत कमी ३० एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरावे. चेहर्याला सनस्क्रीन लावताना डोळ्यांच्या आजूबाजूला, खाली व कोनामध्येही हलक्या हाताने सनस्क्रीन लावा. तसेच संपूर्ण शरीरास सनस्क्रीन लावा.
मेकअप ब्रशची स्वच्छता, दर्जा यावर लक्ष द्या. वेळोवेळी ब्रश बदला. खूप काळ एकच ब्रश वापरत राहिल्यास त्यावर बॅक्टेरिया जमा होतात जे आपल्या त्वचेचे नुकसान करू शकतात.
मेकअप प्रॉडक्ट शेअर केल्याने अॅलर्जी, इन्फेक्शन, त्वचा रोग होण्याची शक्यता असते.
एक्सपायर झालेली सौंदर्यप्रसाधने कितीही महाग असली तरी वापरू नका.
क्रीम वा सीरम चेहर्याला लावताना मान व गळ्यालाही लावा. असे न केल्यास चेहरा आणि मानेच्या रंगामध्ये फरक दिसून येतो. यामुळे मानेची त्वचा लवकर कोरडी पडून तेथे सुरकुत्या येतात.
स्क्रब आणि पॅकच्या नियमित वापराने हातापायांची त्वचा निरोगी राहते.
आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य मॉइश्चरायजर निवडून रोजचं स्किन केअर रुटीन फॉलो करा.
केसांची चमक, पोत यावरून आपण निरोगी आहोत की नाही हे समजतं. आपल्या केसांच्या प्रकाराप्रमाणे शाम्पूचा वापर करा, नियमितपणे कंडीशनर लावा. हेअर स्पा करून घ्या.
केसात कोंडा होण्याची समस्या असेल तर तेल, हेअर मास्क वापरून कोंडा घालवता येतो. कोंडा फक्त केसांचे नुकसानच नव्हे, तर कपाळ आणि चेहर्यावर मुरमं येण्यासही कारणीभूत ठरतो.
त्वचेसाठी वापरली जाणारी प्रसाधने हा वायफळ खर्च नसून ही गुंतवणूक आहे. तेव्हा चांगल्या दर्जाची प्रसाधने वापरा.
जेवणात मीठाचं प्रमाण कमी करा. जास्त मीठामुळे शरीरात वॉटर रिटेनशनची समस्या निर्माण होते. यामुळे शरीर आणि डोळेही सुजल्यासारखे (पफी) दिसतात.
त्वचेची लवचिकता अर्थात लचक आणि चमक व्यवस्थित राहावी यासाठी ८-१० ग्लास पाणी नियमित प्या. यामुळे शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचा हायड्रेटेड राहते.
सकाळची न्याहारी अवश्य करा. न्याहारीत ओट्स, कॉर्नफ्लेक्स, नट्स, मोड आलेली कडधान्ये, ताजी फळं असू द्या. दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या व दही जरुर खा. शिळं अन्न आणि जंक फूड टाळा.
नियमित व्यायामामुळे तुम्ही तंदुरुस्त राहाल, तुमचे रक्ताभिसरण व्यवस्थित होईल आणि चेहर्यावर तेज येईल. फेस योग तसेच फेशिअल एक्सरसाइज करा. त्यामुळे चब्बी चिक्स, डबल चिनचा सामना करावा लागणार नाही.
कपाळाला आठ्या घालून, नाक मुरडून, भुवया उंचावून बोलण्याची सवय सोडून द्या. त्यामुळे अकाली सुरकुत्या पडतील.
दिवसभरात ३० मिनिटं ताज्या हवेत राहा. नैसर्गिक तजेलपणाचा अनुभव घ्या. त्यामुळे डोळ्यांची चमक वाढेल आणि तुम्ही निरोगी राहाल.
रोज प्रार्थना करा. यामुळे मानसिक शांती, शक्ती आणि ऊर्जा प्राप्त होते.
मनमोकळेपणाने हसा, तुमच्या निखळ हास्यामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसता. हे सौंदर्य कोणत्याही सौंदर्य प्रसाधनांनी मिळवता येणार नाही.