कारची काच फोडून चोरी; त्रिची टोळीच्या म्होरक्याला अटक

पणजी पोलिसांची तामिळनाडूत कारवाई


27th May 2023, 12:36 am
कारची काच फोडून चोरी; त्रिची टोळीच्या म्होरक्याला अटक

जप्त केलेल्या वस्तू व संशयितासह पणजी पोलिसांचे पथक.

प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

पणजी : पाटो येथे पार्क केलेल्या कारच्या मागच्या दरवाजाची काच फोडून त्यातील लॅपटाॅप व इतर वस्तू लंपास केले होते. याप्रकरणी पणजी पोलिसांनी तामिळनाडूतील त्रिची टोळीचा म्होरक्या शंकर सालेम  (४५) याला ताब्यात घेऊन गोव्यात आणले. संशयिताला येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अॅड. शिवेन देसाई यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २७ एप्रिल रोजी सायंकाळी पाटो येथील एचडीएफसी बँकेजवळ त्यांनी आपली जग्वार कार पार्क केली होती. तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी कारच्या डाव्या बाजूची मागील काच फोडली. कारमधील लॅपटाॅप, आयपॅड व इतर वस्तू चोरून नेल्या. या तक्रारीची दखल घेऊन पणजी पोलिसांनी अज्ञातांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.             

पोलीस निरीक्षक निखिल पालयेकर यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पालीस उपनिरीक्षक चंद्रशेखर आमोणकर, पोलीस हवालदार नितीन गावकर, पोलीस कॉन्स्टेबल ईर्मिया गुरैया, भूपेश गावडे, योगेश मडगावकर, शुभंम मांद्रेकर, उदय वाडयेकर यांचे पोलीस पथक तयार करून चौकशी सुरू केली.

या पथकाला कारमधून वस्तू चोरून नेलेले चोरटे तामिळनाडू येथील त्रिची टोळीचे सदस्य असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तामिळनाडू येथे पोलीस पथक रवाना करून त्रिची टोळीचा म्होरक्या शंकर सालेम  (४५) याच्या तेथे मुसक्या आवळल्या. त्याला गोव्यात आणून रितसर अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेले लॅपटाॅप, आयपॅड व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. संशयिताला शुक्रवारी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा