घरातील उपयोगी जागा

भिंतीवरुन टांगलेल्या या गोष्टी कोपऱ्याची शोभा नक्कीच वाढवतात. एखादे छानसे वॉलहँगिंग लावून आपण दिवाणखान्याचा कोपरा सजवू शकतो.

Story: घराबद्दल बरेच काही । गाैरी भालचंद्र |
26th May 2023, 11:31 pm
घरातील उपयोगी जागा

घरातील कोपऱ्यांना तुमच्या हटके अंदाजात सजवल्यास ते कोपरेसुद्धा पाहणाऱ्यांचे लक्ष सहजपणे वेधून घेतील असे वाटते. एखादया कोपऱ्यात शो-पिस किंवा काही फोटो ठेवण्यासाठीची रॅक असेल तर आपण त्या ठिकाणी साजेशा वस्तूंची मांडणी करू शकतो. लिविंग रूमच्या एखाद्या कोपऱ्यात फ्लॉवरपॉट ठेवून त्यात आपण खरी किंवा शोभेची फुले ठेवू शकतो. फुलांमुळे प्रसन्नता तर वाढतेच आणि दिसायलाही साजेसं वाटू शकतं. एखाद्या कोपऱ्यात ठेवलेली आकर्षक कुंडी आणि त्यातील देखणी फुलझाडे आपला मूड रिफ्रेश करतात. तसेच अनेक युनिक शो पिससुद्धा दिसायला एकदम रॉयल दिसतात.

कोपऱ्यासारख्या छोट्या जागेतही बरंच काही करता येऊ शकतं. घराच्या सजावटीत तिथल्या कोपऱ्यांना महत्त्व दिलं तर घराचा कायापालटच होऊन जाईल असे वाटते. विचारपूर्वक त्या कोपऱ्यांचा वापर केल्यास जागेचा योग्य उपयोगही होईल आणि कोपरा आकर्षक दिसण्यास मदतही होईल. छोटेसे बुक शेल्फ त्या कोपऱ्यात ठेवून त्या जागेला अजून आकर्षक बनवू शकता. दुमजली घरात जिन्याखालच्या जागेचा उपयोग करून तिथे बुक शेल्फ आणि एक जागेच्या हिशोबाने बसणारी खुर्ची ठेवल्यास एक हटके लुक येईल. त्या जागेत आपली अशी स्पेस निर्माण होईल. मोकळेपणाने बसण्यासाठी आणि रात्री जर तिथे हँगिंग लाईट्सची योजना केली तर रात्रीही त्या जागेचा वापर स्टडी कॉर्नर म्हणून करता येऊ शकतो.

साईड टेबलचा वापर करूनही कोपरा उपयोगात आणता येऊ शकतो. खिडकीच्या उंचीचं साधं त्रिकोणी आकाराचं कॉर्नर टेबलसुद्धा एखाद्या रूमच्या कोपऱ्याची शोभा वाढवू शकते आणि त्याचा उपयोगही चांगल्या प्रमाणात होऊ शकतो. त्यावर कोपऱ्याच्या आकारात कडप्पा बसवून त्यावर फोटोफ्रेम, आर्ट पिस, फुलदाणी किंवा आपल्याला मिळालेल्या ट्रॉफी ठेवता येऊ शकतात. काचेचे दार असलेल्या कॉर्नर युनिटमुळे जागा कमी लागून शोभेच्या वस्तू ठेवायलाही जागा मिळते. यामुळे कोपरा अगदी सजीव वाटू शकतो.

एखादा घराच्या कोपर्‍यात वॉशिंग मशिन किंवा फ्रीजसाठीही जागा करून घेऊ शकतो. किंवा एखाद्या दिवाणखान्याच्या कोपऱ्यात सिडी प्लेअर ठेवून म्युझिकल थीम वापरू शकतो आणि तिथे मंद सुमधुर संगीत लावून ठेवू शकतो. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे लक्ष हा कोपरा नक्कीच वेधून घेऊ शकतो आणि संगीतामुळे घरातही साकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.

'कोपरा' म्हटलं तर किती लहान? असे आपल्या मनात येते. पण हा कोपरा आपल्याला खूप काही देऊन जातो. कधी कधी आपल्याला हवी असलेली शांतता, सर्जनशील काम करण्याची उर्मी आणि वर्क फ्रॉम होम करण्याची ऊर्जा मिळते ती माझ्या लाडक्या कोपऱ्यातच. त्या कोपऱ्यातील खिडकीतून डोकावणारी हिरवाई मन प्रसन्न करते. निसर्गाची विविध रूपे या कोपऱ्यात बसूनही न्याहाळता येतात आणि एक आगळा वेगळा आनंद निर्माण होतो. 

खिडकीशेजारील कोपरे तर प्रत्येकाचे बेहद्द आवडते असतात. काम करताना अधेमधे जितकी लांब नजर जाईल तितके चांगलेच असते. त्यात हिरवळ दिसत असेल तर डोळे आणखी सुखावत जातात. कोपरा ही बहुपयोगी जागा आहे. कधीकधी इस्त्री करायलाही त्याचा उपयोग होतो आणि तिथे नवीन आणि जुन्या वस्तुचा संगम पहायला मिळतो. घरातील प्रत्येकाचे असे विशिष्ट कोपरे असतात जिथे आपलं असं एक जग असतं.