'जबान संभालके'सारख्या लोकप्रिय दूरदर्शन मालिकांपासून ते 'फोर मोअर शोट्स प्लीज'सारख्या गाजलेल्या वेबसिरीजपर्यंत डॉ. मिनाक्षी मार्टिन्स यांच्या बहुरंगी अभिनयाचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. एक स्त्री म्हणून रुपेरी पडद्यावर आणि समाजात वावरताना त्यांनी विविध भूमिका समर्थपणे पार पाडल्या आहेत.
एक उत्तम मानसोपचारतज्ञ ज्यांनी चित्रपट, रंगमंच, दूरदर्शन, वेबसिरीज या क्षेत्रात आपले नाव कमावताना गोवा सरकारच्या राज्य महिला आयोगाचे सदस्यत्वही सांभाळले आणि याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली, त्या दुसर्या तिसर्या कोणी नसून त्या आहेत, आपल्या सर्वांच्या लाडक्या डॉ. मिनाक्षी मार्टीन्स.
एक स्त्री म्हणून इतक्या विविध भूमिकांतून सहजतेने वावरताना त्यांनी आपली कार्यक्षमता कधीच कुठेही कमी पडू दिली नाही. हे सर्व सांभाळतानाच त्यांनी एक गृहिणी म्हणूनही तितक्याच निष्ठेने आपल्या नात्याला न्याय दिला. त्यांनी हे जे यश मिळवले, ते त्यांना काही सहजासहजी प्राप्त झाले नाही, त्या आज ज्या उंचीवर आहेत, तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी प्रचंड जिद्दीने मेहनत घेतली. अनेक अपमान, वेदना सहन केल्या.
हा कामाचा व्याप सांभाळताना आपली जुळी मुले सांभाळणे हे एक मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. जुळ्या मुलांपैकी अमेयला इतर जन्मजात विसंगती होत्या. आश्विनही आईची साथ कधीच सोडायचा नाही. त्यामुळे कामानिमित्त गोव्याबाहेर जाताना त्यांनी मुलांची साथ कधीच सोडली नाही.
डॉ. मिनाक्षी यांनी 'अ रेनी डे', 'प्रेमसूत्र', 'उदय' (मराठी), 'ओ मारीया', 'नाचुया कुंपासार', 'गुणाजी', 'एनिमी', 'हांव तू तू हांव', 'इन सर्च ऑफ मदर', 'गोवरी' (मल्याळम), 'आश्रय', 'कालापोर', 'जॅकपॉट', 'रानी दुर्गावती' (हिन्दी), 'यू कॅननॉट गिव रिझन', 'कॉफी मेकर', 'द लेटर्स' (इंग्रजी) या चित्रपटांतून कामे केली. त्यांचे यातील कित्येक चित्रपट इफ्फीमध्ये गाजले. 'नाचूया कुंपासार' या चित्रपटातील त्यांची डोनाच्या आईची भूमिका गाजली. त्यातील सहजसुंदर अभिनयाची सर्वांनी प्रशंसा केली. या चित्रपटाला ६२वा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. 'एनिमी' या चित्रपटाला ६३वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या इसाबेला या प्रमुख भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देखील प्राप्त झाला.
दूरदर्शनवर १९९७ साली 'जबान संभालके', 'व्योमकेश बक्षी', 'जमीन आसमां', 'रजनी', 'दिल्लगी', 'रिपोर्टर', ‘दृष्टान्त’, ‘हम मुंबई नही जाएंगे’, ‘शादी’ या दूरदर्शन मालिका गाजत होत्या. 'जबान संभालके' या विनोदी मालिकेतील त्यांच्या अर्चनाच्या भूमिकेने तर आपला चाहता प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. 'व्योमकेश बक्षी'तील लतिकाची भूमिकाही लक्षवेधी होती.
गोवा राज्यातील नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल रंगसन्मान या पुरस्काराने त्यांना २०१६मध्ये सन्मानित करण्यात आले. त्यांच्या 'लोक कथा ७८', 'अंधार यात्रा', 'बाकी इतिहास', 'वसंत दाह' या चित्रपटासाठी तसेच राज्यस्तरीय मराठी नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पुरस्कार गोवा तसेच महाराष्ट्र राज्यातर्फे प्राप्त झाले आहेत. याशिवाय त्यांनी भूमिका निभावलेल्या 'फोर मोअर शोट्स प्लीज', 'टाइपरायटर', 'फील्स लाइक इष्क' या व इतर काही वेबसिरीजही लोकप्रिय झाल्या.
मिनाक्षी यांनी १९९७मध्ये अभिनय करणे थांबवले होते. 'जबान संभालके' ही त्यांची शेवटची मालिका होती. त्यानंतर त्यांनी गोवा राज्य महिला आयोग आणि इतर अनेक राज्य समित्यांवर कार्य केले. त्यावेळेस अनेक चित्रपट आणि मालिकांसाठी अनेक दिग्दर्शकांनी त्यांच्याशी संपर्क साधला परंतु मुलांना सोडून जाणे शक्य नसल्याने त्यांनी ते नाकारले. त्यांची स्वतःची एक बाग आहे. त्यात त्यांनी अनेक फळझाडे, फुलझाडे आणि शोभिवंत झाडांची लागवड केली आहे.
सत्य खूप कटू असते असे सांगताना डॉ. मिनाक्षी सांगतात की, यश नेहमीच चांगले नसते. असे बरेच लोक असतात ज्यांना तुम्ही अपयशी व्हावे असे वाटते. प्रसिद्धी मिळाल्यामुळे ईर्षावान लोकांचे मत्सर आणि निर्दयी वर्तन जागृत होते आणि ते तुम्हाला खाली आणण्यासाठी कोणत्याही कितीही खालच्या थराला जाऊ शकतात. असे असले तरी काही प्रामाणिक, प्रतिभावान आणि आदर करणार्या व्यक्ती समाजात आहेत, ज्यांचा त्या आदर करतात.