कोंकणी रंगकर्मींचे योगदान आणि नाट्यरंगपंचम

कोंकणी रंगमंचावर आजपर्यंत वेगवेगळे विषय आले असले, तरी गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकणारी एक दोन उदाहरणे सोडल्यास काहीच नाट्यलेखन झालेले नाही. ४५० वर्षांच्या जुलमी सत्तेत इथल्या समाजाने जे हाल सोसले, जे अत्याचार पोर्तुगीजांनी कोंकणी माणसांवर केले त्याचे प्रतिबिंब कोंकणी रंगमंचावर पाहिजे तसे दिसत नाहीत.

Story: जागतिक रंगभूमी | श्रीधर कामत बांबोळकर |
20th May 2023, 11:19 pm
कोंकणी रंगकर्मींचे योगदान आणि नाट्यरंगपंचम

गाेवा मुक्तीसंग्राम चित्रित करणारी काही नाटके

विष्णू वाघ यांच्या 'सुवारी' नाटकातून काही प्रमाणात गोवेकरांनी पोर्तुगीज काळात भोगलेल्या वेदनांचे चित्रण केले. श्रीधर कामत बांबोळकर यांनी ते दिग्दर्शित केले होते. महाबळेश्वर सैल यांनी आपल्या 'युग सांवार' कादंबरीत गोवेकरांनी पोर्तुगीज काळात बाटाबाटीच्या आणि इन्क्विझीशनच्या काळात कसे हाल सहन केले याचे अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी चित्रण केले आहे.

श्रीधर बांबोळकर यांनी या कादंबरीच्या आधारे 'सांवार युग' हे नाटक लिहून रंगमंचावर सादर केले. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा या नाटकास लेखनाचे, सादरीकरणाचे, दिग्दर्शन आणि अभिनयासाठीची पहिली बक्षीसे प्राप्त झाली. खरंतर असे आणखीन प्रयत्न व्हायला पाहिजेत. कोंकणी कथा-कादंबरीच्या क्षेत्रात कितीतरी संहिता नाट्यपूर्ण आहे. या नाट्यबीजांचा वापर करून कितीतरी नाट्यलेखन होऊ शकले असते.

दत्ताराम बांबोळकर यांनी यु. आर. अनंतमूर्ती यांच्या 'संस्कार’ या कादंबरीच्या आधाराने 'संस्कार' हे नाटक रचले आणि ते पुष्कळ यशस्वी झाले. राष्ट्रीय स्तरावर त्याला प्रसिद्धी लाभली. हेमा नायक यांनी आपल्या 'निर्बळा' या कादंबरीच्या आधाराने 'निर्बळा' हे नाटक कला अकादमीच्या स्पर्धेत सादर केले.

महाभारतातल्या कितीतरी घटना आणि व्यक्तिरेखा नाट्य माध्यमातून येऊ शकल्या असत्या. उदय भेंब्रे यांनी कर्णाच्या जीवनावर 'कर्णपर्व' हे प्रभावी नाटक लिहून कोंकणी रंगभूमीला दिले. अनेक संस्थांनी ते सादर केले. सूत्रधार आणि नाट्यसंगीताचा वापर करून श्रीधर बांबोळकरांनी ते पहिल्यांदा पर्तगाळी इथल्या मठाच्या एका मोठ्या कार्यक्रमात हजारो प्रेक्षकांच्या हजेरीत सादर केले. पूर्णानंद च्यारी यांच्या संगीत, गायन व सूत्रधाराच्या भूमिकेमुळे ते नाटक जास्त प्रभावी झाले.

म्हैसूर शहरात 'बहुरूपी' या बहुभाषिक राष्ट्रीय नाट्य महोत्सवात एक कोंकणी नाटक सादर झाले होते. नाटकाचे नाव 'तुळशी'. कलाकुल थिएटर रिपर्टरी या संस्थेने ते नाटक सादर केले. लेखक अरुणराज रॉड्रिग्स आणि दिग्दर्शक ख्रिस्तोफर दे सौझा यांनी रवींद्र केळकर यांच्या 'तुळशी' कादंबरीच्या आधाराने गोव्याच्या व्यक्तिरेखा मंगळूरी कलाकारांनी साकारून फार सुंदर अशी या नाटकाची निर्मिती केलेली होती. कर्नाटकातल्या लोककलेचा सुंदर मिलाफ नाटकात केलेला होता. अशा स्वरूपाचे प्रयत्न आजचे रंगकर्मी का करत नाहीत? हे एक कोंकणी रंगभूमी समोर आव्हान आहे.

कला अकादमीची कोंकणी नाट्य स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, गोवा कोंकणी ऍकॅडमीचा नाट्य महोत्सव, टी. एम. ए. फाउंडेशनची अखिल भारतीय कोंकणी नाट्य स्पर्धा, कला अकादमीची 'रंगमेळ' ही निम्न व्यवसायिक रिपर्टरी कंपनी आणि बालभवनची बालनाट्य शिबिरे, बालनाट्य महोत्सव, कला आणि सांस्कृतिक संचालनालय आणि पश्चिम विभाग सांस्कृतिक केंद्राचा बहुभाषिक नाट्य महोत्सव, कला व संस्कृती खात्याच्या नाट्य विकासासाठी वेगवेगळ्या योजना, कोंकणी भाषा मंडळाचा युवा महोत्सव; चर्चासत्रे, नाट्यलेखन शिबिरे, 'अंत्रुज घुडयो' आयोजित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता नाट्य शिबिरे यासारख्या उपक्रमामुळे कोंकणी रंगभूमीला प्रोत्साहन व समृद्धी मिळत आहे.

कोंकणी रंगभूमीसाठी अनेकांचे योगदान

  गोवा कला महाविद्यालयातून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केलेल्या काही चित्रकारांचे योगदान कोंकणी रंगभूमी कलात्मक करण्यासाठी मौल्यवान ठरलेले आहे. त्यामुळे रंग, रेषा, आकार, अवकाश, पोत या चित्र घटकांचा उपयोग नाट्य निर्मितीत होऊ लागला. यात दिगंबर सिंगबाळ, श्रीधर बांबोळकर, हेमंत कासार, दिलीप धामस्कर, राजीव शिंदे, साईनाथ पडते, कीर्तीकुमार प्रभू, दीपक गाड, कलानंद बांबोळकर, उदय च्यारी, निलेश महाले, अमोघ बुडकुले तसेच नंतरचे अनेक कला शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी कोंकणी रंगभूमीला योगदान देत आहेत.

 एकांकिका लेखनात कोंकणी रंगभूमी समृद्ध झालेली आहे. आधुनिक कालखंडातील ही एक खासियत. अशोक कामत, भरत नायक, राजू नायक, श्रीधर कामत, सु.म. तडकोड, हनुमंत चोपडेकर, संजय पवार, पूर्णानंद च्यारी, एन. शिवदास, दिलीप बोरकर, धर्मानंद वेर्णेकर, प्रकाश वझरीकर, प्रकाश पर्येकर, उल्हास नायक, उमेश महाम्बरे, संजीव वेरेकर, दत्ताराम बांबोळकर, मीना काकोडकर, हेमा नायक, नयना आडारकर, जयंती नायक, प्रशांती तळपणकर, रजनी भेंब्रे, सुरंगा मडकईकर इत्यादी अनेक लेखक-लेखिकांनी या क्षेत्रात योगदान दिलेले आहे.

एकांकिका लेखनात पुंडलिक नायक यांचे योगदान उच्च दर्जाचे आहे. एकांकिकेप्रमाणे नभोनाट्येसुद्धा मोठ्या प्रमाणात लिहिली गेली आहेत आणि राष्ट्रीय प्रसारणात अनुवादित नभोनाट्याचे योगदान उल्लेखनीय ठरलेले आहे.

नाट्यरंगपंचम

गोवा मुक्ती सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने क्रिकेटर शुभम नाईक ट्रस्ट यांच्यावतीने पुंडलिक नायक यांच्या नाटकांच्या पाच दिवसांचा राज्यव्यापी 'नाट्यरंगपंचम' हा नाट्यमहोत्सव कला आणि संस्कृती संचालनालय आणि माहिती व प्रसिद्ध खात्यांच्या सहकार्याने १२ ते १६ एप्रिल या काळात आयोजित केला होता. काणकोण, शिरोडा, सत्तरी, पेडणे अशा केंद्रांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर गाजलेली आणि गोमंतकीय रंग चळवळीला महत्त्वाचे योगदान दिलेल्या पुंडलिक नायक यांची नाटके सादर झाली.

अशा प्रकारच्या गोव्यात पहिलाच महोत्सवात निवडलेली नाटके सादर करणारी संस्था आणि दिग्दर्शक असे होते :

 'शबै शबै भौजन समाज' -(रंगसांगाती, वळवई; दिग्दर्शक : निलेश महाले), 'सुरिंग' - (अंत्रुज लळीतक, बांदोडा; दिग्दर्शक : श्रीधर बांबोळकर), 'श्री विचित्राची जात्रा' - (अथश्री, फोंडा; दिग्दर्शक : दिलीप देसाई), 'चैतन्याक मठ ना' - (विवेकानंद सादरीकरण मंच, केरी सत्तरी; दिग्दर्शक : प्रमोद महाडेश्वर), 'कांसुलो' - (कला चेतना, वळवई; दिग्दर्शक : श्रीधर बांबोळकर)

निवडलेल्या पाचही केंद्रांवर एकाच वेळी संध्याकाळी सात वाजता नाटके सुरू होत होती. महोत्सवाच्या निमित्ताने दर दिवशी वेगवेगळ्या केंद्रावर नाटककार पुंडलिक नायक तिथल्या नाट्यरसिकांना, अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना आणि साहित्यप्रेमींना भेटत होते आणि त्यांच्याशी चर्चा करीत होते.

 या नाट्य रंगपंचमीत संपूर्ण गोव्याच्या कलाकारांचा सहभाग मिळवण्यासाठी रूपरेषा तयार केली होती. महोत्सवानंतर १७ एप्रिल या दिवशी शिरोड्याला एका दिवसाचे नाट्यकलाकार व प्रेक्षकांचे संमेलन झाले. या संमेलनात नामांकित रंगकर्मी विजय केंकरे, चंद्रशेखर शेणॉय, अजय वैद्य, पांडुरंग फळदेसाई, कोंकणी विश्वकोशाचे संपादक तानाजी हळर्णकर यांचे नाट्य कलाकारांना मार्गदर्शन लाभले. कोंकणी रंगभूमीविषयी मौलिक विचारांचे आदानप्रदान करण्यात आले.

आजची कोंकणी रंगभूमी भारतातल्या इतर प्रगत भाषांइतकीच प्रगत आहे असे सिद्ध झाले. कला अकादमीच्या सहाय्याने आणि अंत्रुज लळीतकाच्या आयोजनाखाली महोत्सवातील नाटके लोकांच्या मागणीनुसार परत एकदा कला एकादमीच्या मा. दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात सादर झाली.

क्रिकेटर शुभम नायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि गोव्याच्या राजकारणातले एक सुज्ञ व्यक्तिमत्त्व सुभाष शिरोडकर यांच्या आर्थिक मदतीने हा महोत्सव आयोजित केला गेला. संपूर्ण महोत्सवाचे नियोजन पूर्णानंद च्यारी यांच्या कल्पक संकल्पनेच्या आधाराने करण्याची संधी प्रस्तुत लेखक श्रीधर बांबोळकर यांना लाभली. ट्रस्टचे प्रमुख उल्हास नाईक यांच्या आधाराने हा महोत्सव यशस्वी झाला. कोंकणी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद करण्यासारखा हा महोत्सव कोंकणी रंगभूमीच्या संदर्भात महत्त्वाचा ठरला.