सुशीमामीची गजाल

सुशीमामीच्या घराकडं कोण यायला मागत नसे. सुशीमामी होतीच तशी आगडोंब. समोर कोण दिसला रे दिसला की तो बापया असो वा बाई, ही गाळी घालायला सुरूवात करायची. क्षणभर त्या व्यक्तीला कळतच नसे की ही सुशीमामी कशासाठी आपली अशी पूजा करतेय.

Story: गजाल | गीता गरुड |
20th May 2023, 11:09 pm
सुशीमामीची गजाल

वाण्यांची नानी इतकी कजाग पण तीदेखील सुशीमामीच्या तोंडाला घाबरत असे. सुशीमामीचं नाव होतं सुशांता पण आवाठातल्या पोरांनी तिचं नाव सुशी ठेवलं होतं. सुशीमामीच्या घरासमोर जामाचं झाड होतं. जामाला बहर आला की पोरटोरं दुपारची मांजरीच्या पावलांनी यायची. जाम झोडायची, यथेच्छ खायची. त्यादरम्यान सुशीमामी खालच्या परड्यात पातेरा एकटे करत असायची किंवा माजघरात गोधडी मांडून टाके घालत बसलेली असायची. सुशीमामीचा कुत्राही त्या पोरांना सामील होता. अजिबात भुंकायचा नाही. 

सुशीमामीला जाग लागलीच तर दुखऱ्या गुडघ्यांवर हात टेकवत ती बाहेर यायची नि "फटकीचो वाको इलो या चांडाळांवयनी, नायनाट झालो ह्या कारट्यांचो तो, रांडेच्यांच्या नाकात शिरलो माज्या जामांचो वास" म्हणत हातात मिळेल ते घेऊन पोरांपाठी लागायची. चलाख पोरं सूळ्ळकन निसटायची. एखादंदुसरं मेंगळट दगडातनं वर आलेल्या मुळात अडकलंच, तर सुशीमामी त्याचं बखोट पकडून त्याला शेपडावी. "आवशीबापाशीन चोरी करूची शिकवन दिल्यानी तुका! हातपाय मोडून ठेवतलंय परत ह्या वाटेक दिसलस तर!!" जासनीच्या हिरव्या काठीचे वळ पोराच्या पाठीवर, पायांवर रपारप बसायचे. "आये गे मेलो मेलो" ते पोरगं व्हिवळायचं, तोंडावर हात ठेवून ठो ठो बोंबा मारायचं. 

त्याने चड्डीच्या खिशात जाम भरलेले असायचे. पोरगं ते जाम खाली टाकू लागायचं, जेणेकरुन सुशीमामी त्याला सोडेल पण अशी सहज सोडेल ती सुशीमामी कसली?! पोरगं अगदी जाणतं असलं तरी सुशीमामी त्याची पाटलण फेडून घ्यायची. पोरगं रडायचं, "सुशीमामी, माफ कर येक डाव. परत कवा नाय येवचंय तुज्या परड्यात. देवाशपथ सांगतय." म्हणत कान पकडायचं पण सुशीमामी त्याची पाटलण बावट्यासारखी फिरवत म्हणायची, "माज्या परड्यातले जाम तुमका इतके स्वस्त वाटले काय? माज्या जामांची किमत तुमकाच काय, तुमच्या आव्शीबापाशींकाव कळाक व्हयी. तुझी पाटलण शेतातल्या बावडेत टाकतलंय. बापाशीक उतरव नि जा घेऊन." ते पोरगं तोंडातल्या तोंडात सुशीमामीला गाळीशिव्या घालीत, पुढे जायचं. तिथल्याच झाळकीतलं मोठसं पान अब्रुरक्षणासाठी घेऊन घराकडे धुम पळत सुटायचं.

एखाद्या पोराची आई मग सुशीमामीशी भांडायला यायची. ती तशी आली की सुशीमामीला अगदी आनंद व्हायचा. शत्रूपक्षावर धनुष्यबाणांचा वर्षाव करावा तशी ती ठेवणीतल्या गाळी त्या पोराच्या आयशीवर सोडायची. ती बाई बिचारी जीव मुठीत घेऊन पाठी फिरू लागली की सुशीमामी फणसाला बांधलेल्या म्हशीवर हात फिरवत तिच्याशी बोलायची, "पालयांचा झुडतार मेला माज्याशी भांडाक इलला. हेका घोपान हा माझ्यावांगडा भांडाक? फुक मारलय तर उडान जायत! मग पालयो शोधीत रव्हात माझी बायल खय गेली म्हणान. इतकीच मोठ्या पतीची तर आपल्या झिलाक दुसऱ्याचे परड्यातली वस्तू चोरता कामा नये म्हनान शिकवूचा. माझी ढोरा कशी गुनाची आसत, माझी शिकवनच हा तशी. चुकूनव दुसऱ्याचे परड्यात जाव्ची नायत. मगे थयसर सोना का असांदेत," यावर सुशीमामीची सुंदरा म्हस मुंडी हलवून सुशीमामीच्या म्हणण्याला दुजोरा द्यायची. 

सुशीमामीकडे कोंबडीव मोक्कार होती. कोंबड्याचं एक पिल्लूही घारीच्या चोचीला लागू शकत नव्हतं. कोंबडी जरा कलकलली की सुशीमामी बाहेर येऊन आकाशाकडे बघायची नि घिरट्या घालणारी घार दिसली तर तिच्यावर धोंडे मारायची. "अवदसा मेली, काळतोंडी!! माझ्या कोंबडीची पिला खाऊक येताहा. इतकीच खाईनसारी वाटली हत तर समोरच्या आप्पाच्या केळीबुडी आप्पाची कोंबडी फिरताहा पोराटोरा घेऊन. थयली खा जा!!!" घारही चारेक घिरट्या मारून पिलांचा नाद सोडून द्यायची.

सुशीमामी एकदा लग्नाला जायला म्हणून एसटीच्या डब्यात चढली. आबोलीचा वळेसर, पिळदार आंबाडा, काठाचं गर्दगुलाबी लुगडं त्यावर शंकरपाळीच्या आकाराची जरीची नक्षी. गोरीपान काया, कपाळावर ठळकसं कुंकू. आपलं गटारासारखं वहाणारं तोंड उघडलं नाही तर ती दहाबाराजणींत उठून दिसायची. तिच्या कुंकवाचा धनी मात्र लग्नानंतर दीडेक वर्षातच तिच्या अपशब्दांना कंटाळून परागंदा झाला होता. लोकांनी उठून सुशीमामीला सीट मोकळी करून दिली. कोण तिच्या बाजूला बसायला धजेना. 

एक नवीन आलेली परगावची बाई तिच्याबाजूच्या सीटवर जाऊन बसली. गाडी पुढे जाऊ लागली. पंधराएक मिनटं झाली असतील, सुशीमामीला करमेना. तिला कोणालातरी 'अरे तुरे पावणेपाच' करावसं वाटू लागलं. तिन आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. "ए बाई, ते पिशीत काय आसा तुझ्या. लय घाण येऊक लागली बग. कायतरी कुजल्यासारा वाटताहा."

बाजूला बसलेली बाई तिच्या गावची वस्ताद होती. "भवाने, तुजा मढा बसिवला तो. तुज्या पिशीतून काय नरक हाडलहलस की काय! माज्या पिशीची घाण मारताहा म्हनतस. सोडे आसत सोडे. माहिती हत कसे किलो गावतत ते? आयुक्शात कवा बगलं आसशीत तर भाव कळात! म्हनताहा घान मारता."

आता सुशीमामी चांगलीच पिसाळली. तिचं अंग तापू लागलं. "ए सटवे, चांडाळणे, कोनाची ऐपत काढतस गे? तुज्यासाऱ्या छप्पन इकत घेईन मी! जमीनजुमलो कितको असा माजो कचेरीत जाऊन चवकशी कर. डोळे गरगरतीत तुझे नि फीट येऊन पडशीत तर कोन पानीव देवचा नाय. मगे खाशीत सोड्याची आमटी भुरकून भुरकून."

आजूबाजूच्या मंडळींना मस्त विरंगुळा भेटला. सगळी गालातल्या गालात हसत होती. अगदी कंडक्टरही त्या दोघींच्या तोफांची मजा लुटत होता. त्यात एकदोघे चान्स मारत विनातिकीट उतरूनही गेले.

परगावच्या बाईने सुशीमामीचा बुचडाच धरला. तिच्या मानेला जोराचा हिसका दिला त्याबरोबर सुशीमामीने त्या बाईचं मनगट पकडलं नि जोराचा चावा घेतला.

सोड म्हणता सोडीना तेव्हा कंडक्टर मधे पडला, "ओ मामींनू, वायच थंड घेवा. आता काय मास काढताव काय तेंचा."

"तू गप रे भीकमाग्या. तिकीट तिकीट करत लोकांकडे पैशाची भीक मागनारो तू. तू माका शिकवतलस?"

कंडक्टरच्या पेशाबद्दल असं बोलल्याने त्याच्या अहंला जोरात धक्का बसला. "मामींनू उतरायचा बगा. डायव्हर गाडी थांबवा!" म्हणत कंडक्टरने बेल हाणली.

त्याबरोबर ती पथगावातली बाई कंडक्टरच्या वस्सकन अंगावर आली, "होय तर अशी सुखासुखी जाऊ देईन की काय ह्या कैदासनीला. गड नदीचा पानी पिललला आसय. लेचीपेची नाय आसय. हिचो आज मर्डरच करतय बघीत रव्ह. मग जेलात जावचा लागला तरी चलात."

सुशीमामीचा संताप अनावर झाला. उजव्या हाताला घेतलेल्या चाव्याच्या झणझणत्या वेदना सहन करणाऱ्या त्या बाईची पिशवी तिने हिसकावून घेतली नि डोळ्यांची पापणी लवायच्या आत ती दोनेक किलो सोड्यांची पिशवी तिने फाडली नि लग्नात अक्षत वाटतात तसे त्या बाईच्या डोक्यावर नि कंडक्टराच्या अंगावर सोड्यांच्या अक्षता फेकल्या तसे बसच्या मागच्या सीटवरच्या टोळक्याचा कोरस सुरात गाऊ लागला. "आली लग्नघटिका समीप... कुर्यात सदा मंगलम..." ड्रायव्हर गपा गपा सांगतोय पण कोणी ऐकायला तयार होईना. शेवटी ड्रायव्हर म्हणाला जवळच्या पोलीस स्टेशनात गाडी न्हेतोय.

परगावची बाई म्हणाली, "चलाच ठेशनात घेऊन. नाय हिचं पातळ फेडून घेतलं तर बगा."

"तू तू माजा पाताळ फेडतलंस. काळतोंडे आरशेत ताँड बगलस? तुका आडयीच पाडतय बग कशी ती," म्हणत सुशीमामीने त्या बाईला मधल्या जागेत ढकलली नि तिच्यावर बसून तिला बुकलू लागली. त्या परगावच्या बाईला सुशीमामीने इतकी बुकलली की तिच्या तोंडून शब्द निघेनात. एकदोघे धीर करून पुढे येऊ लागताच सुशीमामी गरजली, "खबरदार फुढे येशात तर! येयेकाची खांडोळी करून माज्या म्हशीक खाऊक घालीन."

थोड्याच वेळात बस पोलीस स्टेशनच्या दारात येऊन थांबली. सुशीमामीने केलेला प्रताप इन्स्पेक्टर साहेबांनी याची डोळा पाहिला. गाडीतल्या प्रवाशांचा जबाब लिहून घेतला. सगळे फाशे सुशीमामीच्या विरूद्ध पडत होते पण तिच्या गावचे चारसहाजण मात्र तिथेच थांबले. त्यांनी इन्स्पेक्टरांशी जुजबी बोलण केली. सुशीमामीकडून दोनेक हजार घेऊन तिला सोडवण्याची विनंती केली. आपल्या गावाची अब्रू वेशीवर टांगू नये म्हणून त्यांनी ते केलं. आपापल्या कामांचा खाडा करून सुशीमामीसोबत थांबले. परगावच्या बाईला दवाखान्यात भरती केली. एकदोन सलाईनच्या बाटल्या लावल्यावर ती शुद्धीवर आल्याचा इस्पितळातनं डॉक्टरचा फोन आला.

तसं समोरचा पेपरवेट फिरवत इन्स्पेक्टर भोसले म्हणाले, "सुशांताबाई, नशीब समजा तुमचं. ती बाई शुद्धीवर आली. तिचा मुलगा तिला बघायला आला. त्याच्या तुमच्या गावकऱ्यांनी नाकदूऱ्या काढल्या तेव्हा त्याने केस मागे घेतलीय. गावातल्या लोकांचे आभार माना. नशीबवान आहात म्हणून अशी देवमाणसं पाठीशी आहेत तुमच्या."

पोलीस मडमांनी दाखवलेल्या हिसक्यांनी सुशीमामी चांगलीच भेदरली होती. त्यात गावकऱ्यांमुळे आपण सुटलो म्हणता तिने गावकऱ्यांकडे पाहिलं. त्यांत सदू गावडे होता. त्याची गाय हिच्या परड्यात आली म्हणून हिने गायीवर धोंडा मारला होता जो तिच्या जिव्हारी लागला होता. दुसरा धोंडी मठकर होता जो तुळशी मागायला आला होता, परड्यात मोक्कार होत्या पण तिने त्याला हात लावू दिला नव्हता. तिसरा परशू शिंगनाय होता जो शिडी मागायला आला होता पण सुशीमामीने त्याला दिली नव्हती नि चौथा राजू परुळेकर होता, ज्याच्या झिलाची पाटलण तिने जाम काढलेन म्हणून सोडून त्याला नागडं पाठवलं होतं नि त्याच्या आयशीचीव आयमाय काढली होती.

सुशीमामीने कधी नव्हे ते गावकऱ्यांपुढे हात जोडले. तेव्हापासनं सुशीमामी सुधारली, अडल्यानडल्याला मदत करू लागली. "ह्या गाव म्हणजेच माझा कुटुम, गावातल्या लेकीसुना माज्या लेकीसुना नि त्यांची चिलीपिली माझी नातरवा," म्हणू लागली. पोरांना साद घालून फणसाचे गरे, आंबे देऊ लागली. त्यांच्या आयांना बोलवून ताक, लस्सी देऊ लागली. आता सुशीमामी अख्ख्या गावाची मामी झाली. समाप्त