नृत्य आणि अभिनयाचा अद्वितीय संगम : वैष्णवी पै काकोडे

नृत्य आणि अभिनय यांच्यासोबत साहित्य, शिक्षण या सर्वच क्षेत्रात चौफेर वावर असणारे फार थोडे कलाकार आहेत. या सर्वच क्षेत्रात आपले सर्वस्व अर्पूण तळमळीने काम करणारे कलाकार पाहिले की, यांना नृत्य कलाकार म्हणावे, संगीत कलाकार म्हणावे, अभिनय सम्राट म्हणावे की साहित्य भूषण म्हणावे असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. अशा चतुरस्त्र कलासंपन्न महिला किंवा मुली पाहिल्या की, त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच! असे वाटून जाते.

Story: तू चाल पुढं | कविता प्रणीत आमोणकर |
19th May, 09:04 pm
नृत्य आणि अभिनयाचा अद्वितीय संगम : वैष्णवी पै काकोडे

तिच्या नसानसात नृत्य, आणि अभिनय यांचा ओघावता संगम जणू झाला आहे. संगीताचा ठेका ऐकला, की तिचे हातपाय नकळत ठेका धरू लागतात आणि तिच्या गळ्यातून कोमल गंधाराची बरसात होते. शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम करताना ती कधी राधा होते, तर कधी उर्मिला. स्टेजवर भरतनाट्यम सादर करताना कृष्ण भक्तीत ती रंगून जाते. तिचे पदलालित्य, मुद्राभिनय यांची जुगलबंदी पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते.

ती मंचावर अभिनय करण्यास आली की, ती ज्या पात्राचा अभिनय करणार आहे, त्यात अक्षरश: स्वतःला झोकून देते आणि तिच्या सहज अशा मुद्राभिनायातून, पदलालित्यातून सुंदर अशा कलेचे दर्शन घडते आणि या सर्वांचा रसास्वाद घेताना प्रेक्षागृहातील रसिक प्रेक्षक तिला भरभरुन दाद देतो. ती गुणी कलाकार आहे,  वैष्णवी पै काकोडे.

मडगावस्थित वैष्णवी एक गुणी कलाकार. महिला नूतन विद्यालयमध्ये शालेय शिक्षण आणि चौगुले महाविद्यालयातून मराठी विषयात बी. ए.ची पदवी सर्वात जास्त गुणांनी प्राप्त करतानाच तिने तीन वर्षांसाठी असणारा बेस्ट स्टुडंटचा हिराबा पुरस्कार हा किताब पटकावला. सध्या नृत्य आणि अभिनय या क्षेत्रात आपला ठसा उमटवत असतानाच तिने शिक्षणाची कास काही सोडली नाही.

गांधर्व महाविद्यालयामधून भरतनाट्यम नृत्यातली विशारद ही पदवी प्राप्त केलेल्या वैष्णवीने आपल्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष केले नाही. सध्या वैष्णवी संस्कृत विषयात एम.ए.चा अभ्यास करत आहे.  लहानपणापासूनच वैष्णवी एक हुशार विद्यार्थिनी म्हणून नावारूपास येत होती.

सात वर्षांची असतानाच तिच्या आई बाबांनी तिला मडगावच्या कलांगण नृत्य संस्थेत दाखल गेले. तिथे शास्त्रोक्त शिक्षण पूर्ण झाल्यावर २०१२ मध्ये तिचा 'शाम बावरी' हा अरंगेत्रम नृत्याचा बहारदार कार्यक्रम झाला. तिच्या नृत्य शिक्षिका ललन देसाई यांच्या सोबत 'डांसनामा प्रॉडक्शन'तर्फे वैष्णवीने  'निजतत्व', 'चांडालिका', 'द वोयेज' हे कार्यक्रम केले. तसेच कॉलेजमधील विद्यार्थ्यांना घेऊन वीरगाथा प्रॉडक्शनतर्फे 'झांसी की रानी', 'कल्चर ऑफ इंडिया'सारखे अनेक नृत्याचे कार्यक्रम केले.

नृत्य, शिक्षण यांच्यासोबत अभिनय क्षेत्रातही आपले वर्चस्व सिद्ध करताना वैष्णवीने कुठेही कमी ठेवली नाही. लहानपणापासूनच शास्त्रीय नृत्यकला अंगात भिनली असल्याकारणाने नृत्य सादर करताना एखादे पात्र नृत्याद्वारे सादर करताना देहबोलीतून, मुद्राभिनयातून सादर करावे लागते. याचा पुरेपूर उपयोग वैष्णवीला झाला.

तिचे पहिले नाटक विनोदी नाटक होते. अनेक स्पर्धेत तिने प्रथम क्रमाकांची अभिनयाची बक्षीसे पटकावली. अनेक एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन त्यातही बक्षीसे पटकावली. 'काजव्यांचा गाव' या नाटकातील तिची 'दीपा'ची भूमिका खूप गाजली. तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. दिग्गज कलाकार मधुराणी प्रभूलकर यांच्यासोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. मधुराणी  प्रभूलकर, प्रदीप वैद्य, रूपाली भावे, आशिष वझे अशा मोठ्या कलाकारांसोबत काम करताना तिच्यातील अभिनय कला बहरत गेली.

पुणे मुंबईमधील असंख्य कलाकारांसमोर तसेच वसंतोत्सव आदी महोत्सवात या नाटकाचे प्रयोग झाले. त्यात वैष्णवीच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र झाले. या नाटकाला झी नाट्यगौरव पुरस्कार मिळाला आणि या पुरस्काराच्या थेट प्रत्यक्ष कार्यक्रमात उपस्थित राहून या सगळ्याचा आनंद घेण्याची संधी तिला मिळाली. 

कला अकादमीच्या 'अ' नाट्य स्पर्धेत 'पालशेतची विहीर'  मधील 'हिराबाई'चा अभिनय करताना तिने आपल्या अभिनयाचे विविध पैलू दाखवले. बिकानेर फेस्टिव्हलमध्ये 'पालशेतची विहीर' या नाटकाचे हिन्दी रूपांतर 'हिराबाई' या नाटकाचा प्रयोग सादर झाला. यातील हिराबाईची भूमिका निभावताना या भूमिकेला योग्य न्याय दिल्याचे समाधान तिला लाभले.

गोव्यातील दिग्गज लेखक, दिग्दर्शक विजयकुमार नाईक यांच्याकडे तिला अभिनयाचे धडे मिळाले. अभिनयातील बारकावे शिकताना वैष्णवीने कुठेही कसर ठेवली नाही. आपल्या गुरुने शिकवलेले ज्ञान आत्मसात करताना तिने मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचे आपल्या जिवंत अभिनयाने अक्षरश: सोने केले. विजयकुमार नाईक यांनी घेतलेल्या कार्यशाळेत वैष्णवीने 'द ब्लॉक' हे नाटक स्वत: लिहून त्याचे सात प्रयोग केले.  

वैष्णवीचा हा सर्व प्रवास अतिशय नाट्यमय, संगीतमय आणि नृत्यमय आहे. त्यात संघर्ष आहे, प्रत्येक गोष्ट शिकण्याची जिद्द आहे आणि त्यासाठी लागेल ते कष्ट घेण्याची तयारीही आहे. कोणतीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नसते. वैष्णवीनेही शिक्षणात अव्वल स्थान राखतानाच नृत्य, संगीत, अभिनय यातही आपले वर्चस्व राखले.

तिचा आवाजही अतिशय गोड आणि कर्णमधुर आहे. तिच्यात वक्तृत्व कलाही उत्तम आहे. ती उत्तम सूत्रसंचालिका आहे तशीच ती उत्तम कवयित्रीही आहे. स्वत: लिहिलेल्या कविता स्वरबद्ध करताना त्यावर छानसे नृत्य बसवताना तिला आत्मिक समाधान मिळते.             

वैष्णवीला तिच्या जीवनातील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.