मुलांची परिपक्वता व त्यासंबंधी समस्या

मागील लेखात आपण मुलांच्या अंतर्मुख व बहिर्मुख व्यक्तिमत्त्व विकासासंबंधी काही मुद्दे पाहिले. आज आपण या लेखाच्या माध्यमातून एका वेगळ्या विषयावर ध्यान केंद्रित करणार आहोत.

Story: पालकत्व | पूजा शुभम कामत सातोस्कर |
19th May 2023, 08:58 pm
मुलांची परिपक्वता व त्यासंबंधी समस्या

वर्तमानकाळातल्या या स्पर्धात्मक युगात प्रत्येक बालकाकडून त्यांच्या पालकांच्या, कुटुंबाच्या तसेच समाजाच्या अनेक अपेक्षा असतात. प्रत्येक क्षेत्रात प्रगती करणे अतिशय गरजेचे असल्या कारणाने बालवयापासूनच मुलांवर अनेक जबाबदाऱ्यांचे ओझे लादले जाते. त्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांना किती प्रमाणात हा भार सहन करता येईल, याकडे कुणाचेही लक्ष नसते व हीच सत्य परिस्थिती आहे. या अशा शर्यतीच्या चक्रात जिथे रात्रीचा आराम करण्याची सुध्दा मुलांना क्वचितच संधी मिळते, अशा चक्रात अडकलेली तीच मुले आपला भार सांभाळू शकतात, जी प्रत्येक गोष्टीत परिपक्व असतात व ज्या मुलांचा त्यांच्या वयोमानाप्रमाणे सर्वांगीण विकास झालेला असतो.

मुलांच्या मनाचा कानोसा घेताना आपल्या ध्यानात येते की प्रत्येक मूल वेगवेगळे असते व ते आपल्या कामात परिपक्व असतेच असे नाही. काही मुले वयाने तर वाढतात, पण नेहमीच त्यांच्यातील बालिशपणामुळे आपली कर्तव्ये नीट पार पाडू शकत नाहीत. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जी कामे त्यांच्या मित्रमैत्रिणी सहजरीत्या काही क्षणात करु शकतात, ती कामे पूर्ण होण्यास अपरिपक्व मुले तासनतास खर्च करतात, तर कधीकधी आपल्या कामात अयशस्वी सुध्दा होतात. जी जबाबदारी आपण आपल्या मुलांवर सोपवत आहोत, त्याकरिता खरेच आपले मूल परिपक्व आहे की नाही, याचे मूल्यमापन प्रत्येक पालकाने नक्कीच केले पाहिजे.

अशी कित्येक लक्षणे मुलांमध्ये दिसून येतात ज्यामुळे हे स्पष्ट होते, की मूल इतरांपेक्षा अपरिपक्व आहे. पण अनेकदा आपल्या अपेक्षांच्या मोहापायी, मातापित्याच्या लक्षात हा मुद्दा येत नाही. 

मूल अपरिपक्व असण्याची लक्षणे

  1.  जे मूल त्याच्या वयाप्रमाणे परिपक्व बनत नाही, ती मुले असे कुठलेही काम करण्यास असमर्थ ठरतात, जी कामे त्याचे मित्र वा त्याच्या मैत्रिणी कुणाच्याही मदतीशिवाय करु शकतात. त्यांना त्यांच्या प्रत्येक कामात सहकार्याची आवश्यकता भासते.
  2.  त्याच्या मित्रमैत्रिणी ज्या पध्दतीने इतर नात्यांमध्ये मिसळतात, त्याप्रमाणे अपरिपक्व असणारे मूल इतर मुलांमध्ये मिसळू शकत नाही. नेहमीच कुणाचा तरी जीवनात आधार घेणारी, ती अस्वस्थ असतात. 
  3.  अपरिपक्व मुले जीवनातल्या अपयशाकडे नकारात्मकतेने पाहतात. मनाविरुद्ध घडणार्‍या घटनांमुळे ती मुले नैराश्यात जातात आणि आजूबाजूच्या प्रत्येक घटनेवर तीव्रतेने प्रतिक्रिया देतात. छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या मनात बरेच दिवस घर करून राहतात. 
  4.  अपरिपक्व मुलांना शालेय वातावरणात आनंदाने तणावविरहीत जीवन घालविण्यात अनेक समस्या आढळतात. 
  5.  वयोमानाप्रमाणे अपरिपक्व मुलांचा सर्वांगीण विकास अपेक्षित पद्धतीने होत नाही. 
  6.  मानवी जीवन म्हणजे आव्हानांचा साठा होय. अपरिपक्व मुले नवीन गोष्टी आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी सहजासहजी रस घेत नाहीत. आवडीच्या क्षेत्रात काम करतानाही त्यांना आत्मविश्वासाची उणीव जाणवते. 
  7. आता मुळात मुले असमर्थ बनण्यामागे असंख्य कारणे असू शकतात: 

घरातील वातावरण

मुलांना सर्वप्रथम आपल्या घरात आनंदी वातावरण मिळणे गरजेचे आहे. बालमन खूप निरागस असते. फुलांच्या पाकळीप्रमाणे कोमल असते. अशा स्थितीत त्यांच्यासमोर घडलेल्या प्रत्येक घटनेचे ते निरीक्षण करतात व त्याचा त्यांच्यावर परिणाम त्वरीत गतीने होत असतो. जर घरात निरंतर भांडणे होत असतील तर याचा नकारात्मक प्रभाव मुलांवर होतो. अगदी छोटेसे भांडणही मुलांच्या मनात दिवसभर थैमान घालत असते. यामुळे तणावग्रस्त झाल्यानंतर आनंदी राहणे वा इतर कुठे ध्यान केंद्रित करणे त्यांना जमत नाही.

शालेय वातावरण

कुटुंबातल्या वातावरणासोबतच जर शालेय वातावरणात समस्या असतील, जर मित्रमैत्रिणी नीट वागत नसतील तर तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. निरंतर जर कुठलेही मूल शाळेत थट्टेचा विषय बनत असेल तर त्याच्या मनात नकारात्मक विचार येतात व त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. पुढील मुद्दे आपण नक्कीच पुढच्या आठवड्याच्या लेखात पाहूया.