देऊळ बंद : सरकारने सोडवावेत देवस्थानांचे तंटे!

गोव्यातील देवस्थानांमध्ये चांगला सलोखा रहावा, तंटे, वाद होऊ नयेत यासाठी जेवढे प्रयत्न म्हाजनांनी करायला हवेत तेवढेच भाविकांनीही करायला हवेत. कायद्यानुसार भाविकांना जरी अधिकार नसले तरीही म्हाजनांना काही गोष्टी पटवून देण्याची गरज आहे. आपल्या अहंकारामुळे देवाला कमी दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखविण्याची गरज आहे. यांच्या अहंकारामुळे देवाचे गाभारे बंद करण्याची वेळ का येते, त्याचा विचार सरकार आणि भाविकांनीही करायला हवा.

Story: उतारा | पांडुरंग गांवकर |
01st April 2023, 11:45 pm
देऊळ बंद : सरकारने सोडवावेत देवस्थानांचे तंटे!

देवस्थानांमधील वादांविषयी ‘गोवन वार्ता’मध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्या प्रतिक्रियांवरून गोव्यातील देवस्थानांचे जे वाद सुरू आहेत, त्या वादांमुळे भाविकांना नाहक मन:स्ताप होतो आणि देवाच्या सेवेतही खंड पडतो. किमान देव सोडून इतर कुठल्याही विषयावर वाद चालतील असे एकाचे म्हणणे होते. गोव्यातील देवस्थाने ही त्या समाजाची, गावाची, भागाची श्रद्धास्थाने आहेत. गोव्यातील मूळ निवासी लोकांची देवस्थाने आणि शेकडो वर्षांपूर्वी म्हणजे कदंब राजवटीच्याही फार पूर्वी पश्चिम घाटातील क्षेत्रातून वेगवेगळ्या कारणांमुळे गोव्यात आलेल्या हिंदूंनी आपले देवही सोबत आणले त्यांची देवस्थानेही इथलीच झाली. त्यांनी आपापले गाव वसवले. अर्थात ते सगळे पन्नास-साठ वर्षांचे नव्हेत तर हजारो वर्षांपासून आपली गावकी आणि देवस्की सांभाळत आहेत. इतकेच नव्हे गोव्यातही वेळोवेळी लोकांची स्थलांतरे झाली. 

पोर्तुगीज राजवटीत तर अशी कित्येक स्थलांतरे झाली, ज्यात काही लोकांनी आपले देव सोबत नेले तर काहींनी गाव, देव सोडून स्थलांतर केले. परिस्थिती निर्माण झाली तसतसे लोक एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरीत झाले. गावे वसली, देवस्थाने उभी राहिली. काही देवस्थाने एकाच समाजाची तर काही देवस्थाने वेगवेगळ्या समाजाची आहेत. पण प्रत्येक समाजातही अनेक म्हाजन (महाजन) किंवा ‘गांवकार’ आहेत. अर्थात गोव्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, समाजाच्या चालीरितींप्रमाणे महाजनांचा उल्लेख होतो. तसे महाजन सर्वच देवस्थानांमध्ये आहेत. त्या महाजनांमध्ये पुढे लॉबी तयार झाल्या. काही मंदिरांची सरकारकडे नोंदणी आहे तर काही देवस्थानांची नोंदणी नाही. पण महाजन बहुतांश मंदिरांच्या व्यवस्थापनात आहेत. अर्थात देवस्थानांच्या व्यवस्थापनाचे सदस्य हे महाजन. या महाजनांमध्ये गट निर्माण झाले. काही गट देवस्थानांच्या हक्कांवरून, निधीवरून तर काही वाद ‘पहिला मान कोणाचा?’ यावरून सुरू झाले. या वादांमुळे कितीतरी प्रकरणे आज मामलेदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी व इतर न्यायालयांत प्रलंबित आहेत. मयेसारख्या भागातील महामाया, केळबाई अशा देवस्थानांचे वाद हल्लीच्या काळात पुन्हा पुन्हा उफाळून येत आहेत.

हल्लीच धुळापी गावातील देवस्थानातही दोन दिवस तणाव होता. तिथेही वाद पूर्णतः मिटलेला नाही. मूळ महाजन आणि देवस्थानाच्या कामात सहकार्य करण्यासाठी आणलेले किंवा गावातील महाजनांना अडचणीच्या काळात देवकार्यात मदत व्हावी म्हणून आणलेल्या लोकांनी पुढे म्हाजनकी मिळवली आणि काही ठिकाणी बहुसंख्य असल्यामुळे मुख्य पदांवर दावा ठोकला. पेडण्यातील एका गावातील प्रकरण अशाच पद्धतीने न्यायालयात गेले. देवस्थानाचे काम पाहणाऱ्या व्यक्तीनेच देवस्थानची जमीन आपल्या नावावर केल्यानंतर निर्माण झालेला वाद उच्च न्यायालयात गेला. गावकरी हतबल झाले. पण शेवटी न्यायालयाने गावाला न्याय दिला. त्या प्रकरणातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. तरीही एकमेकांंची सत्ता संपविण्यासाठी दावे केले जातात. वाद निर्माण केले जातात. एकमेकांना मारहाण केली जाते. देवळाला कुलुप लागले की कोणालाच देवाची सेवा नाही अशी स्थिती निर्माण केली जाते. तसे करणाऱ्यांना आपल्यालाही नाही आणि ज्यांना मिळायला हवेत त्यांनाही अधिकार नाहीत याचा आनंद असतो. पण देवाच्या इतर भाविकांचा कोणीही विचार करत नाही. 

सत्तरी, डिचोली, पेडणे आणि फोंडा तालुक्यांमध्ये महत्त्वाच्या देवस्थानांमध्ये वाद आहेत. काही ठिकाणचे वाद मिटले. डिचोली शहरातील एका महत्त्वाच्या देवस्थानामध्ये पूर्वी वाद होता. तो वाद मिटल्यामुळे तिथे आता चांगले वातावरण आहे. नार्वेतील वादही मिटला, तिथला शिमगोत्सव विनाव्यत्यय सुरू झाला. सत्तरीत वेळूस, हिवरे, केरी, मालोळी, पिसुर्ले तसेच पेडणेत हंसापूर, डिचोलीत मये, फोंड्यात मडकई व अन्य काही देवस्थानांत अंतर्गत वाद आहेत. फक्त ‘पहिला मान’ कोणाला यावरूनच वाद नाही तर आर्थिक व्यवहार, समाजाचा हक्क, जमीन बळकावणे, व्यवस्थापन समितीची निवडणूक न घेणे, हिशोबामध्ये फेरफार अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाद गोव्यातील देवस्थानांमध्ये सुरू आहेत. त्यासाठी देवस्थान कायद्यात बदल करून सरकारचे अधिकार राहतील, नियंत्रणासाठी सरकारी अधिकाऱ्यांना अधिकार मिळतील, देवस्थानांचे वाद सोडवण्यासाठी एखादा लवाद किंवा आयोग स्थापन होईल अशा गोष्टींचा देवस्थान नियमनांमध्ये समावेश व्हायला हवा. 

गोव्यातील देवस्थानांमध्ये चांगला सलोखा रहावा, तंटे, वाद होऊ नयेत यासाठी जेवढे प्रयत्न म्हाजनांनी करायला हवेत तेवढेच भाविकांनीही करायला हवेत. कायद्यानुसार भाविकांना जरी अधिकार नसले तरीही म्हाजनांना काही गोष्टी पटवून देण्याची गरज आहे. आपल्या अहंकारामुळे देवाला कमी दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखविण्याची गरज आहे. यांच्या अहंकारामुळे देवाचे गाभारे बंद करण्याची वेळ का येते, त्याचा विचार सरकार आणि भाविकांनीही करायला हवा. देवस्थान बंद राहणार नाही आणि तसाच प्रसंग आला तर त्यावर सरकारचा ताबा राहील. सरकारने नियुक्त केलेला व्यक्ती देवस्थानात रोज उपस्थित राहतील म्हणजे भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला हवी. सरकारने हस्तक्षेप करण्यासाठी प्रत्यक्ष कृती केली तरच गोव्यातील देवस्थानांचे वाद लवकर मिटतील. अन्यथा आपल्याला लाभ मिळत नाही, या अहंकारामुळे देवस्थानांमध्ये तेढ निर्माण करणारे देऊळ बंद करण्याची मोहीम सुरूच ठेवतील.