सुखविंदर सिंगचा जामिनासाठी गोवा खंडपीठात अर्ज

सोनाली फाेगट मृत्यू प्रकरण : पुढील सुनावणी १७ एप्रिलला


28th March 2023, 12:49 am
सुखविंदर सिंगचा जामिनासाठी गोवा खंडपीठात अर्ज

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या खून प्रकरणातील दुसरा संशयित सुखविंदर सिंग याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी सरकारी वकिलाने वेळ मागितला आहे. तर या अर्जाला फोगट यांचा भाऊ रिंकू ढाका यांनी हस्तक्षेप केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी ठेवली आहे.

भाजप नेत्या सोनाली फोगट तिचे सहकारी सुधीर पाल सांघवा आणि सुखविंदर सिंग यांच्यासह २२ ऑगस्ट २०२२ रोजी गोव्यात आल्या होत्या. त्यानंतर ते सर्व ग्रॅण्ड लिओनी हॉटेलमध्ये उतरले होते. नंतर दुसऱ्याच दिवशी २३ ऑगस्ट रोजी सोनाली फोगट हिचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता. या प्रकरणी फोगट यांचा भाऊ रिंकू ढाका यांच्या तक्रारीनंतर हणजूण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिचे साथीदार सांघवा व सिंग यांना अटक केली होती.

दोन्ही संशयितांना म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली होती. ती संपल्यानंतर त्या दोघांना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर नंतर सीबीआयच्या दिल्ली विशेष विभागाने भादंसंच्या कलम ३०२, आरडब्ल्यू ३६ व ३४ अंतर्गत चौकशी सुरू करून तपास पूर्ण करून म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात सांघवा आणि सिंग या दोन्ही संशयितांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. हे प्रकरण सत्र न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत असल्यामुळे पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर या प्रकरणातील संशयितापैकी सुखविंदर सिंगने याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यानंतर संशयित सुखविंदर सिंग याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला फोगट याचे भाऊ रिंकू ढाका यानी हस्तक्षेप केला आहे.