सुटकेसाठी संशयित राजेंद्र सिंगची खंडपीठात याचिका

श्रीकांत वेरेकर खून प्रकरण : पुढील सुनावणी २४ एप्रिलला


28th March 2023, 12:42 am
सुटकेसाठी संशयित राजेंद्र सिंगची खंडपीठात याचिका

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : वास्को येथील प्रसिद्ध डाॅ. श्रीकांत वेरेकर यांचा २००५ मध्ये खून करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी राजेंद्र सिंग याने लवकर मुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी सरकारी वकिलाने तीन आठवड्याचा वेळ मागितला आहे. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी ठेवली आहे.

डाॅ. श्रीकांत वेरेकर यांचा जावई रायन फर्नांडिस याने साथीदाराच्या मदतीने १७ जानेवारी २००५ रोजी खून केला होता. या प्रकरणी वास्को पोलिसांनी रायन फर्नांडिस याच्यासह त्याचे साथीदार फ्रान्सिस डिसा, राजेंद्र सिंग, सचिन परब आणि प्रथम गडगकर या संशयितांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी वरील संशयितापैकी प्रथम गडगकर माफीचा साक्षीदार बनल्यामुळे न्यायालयानेत्याची सुटका केली होती.

त्यानंतर तत्कालीन दक्षिण गोवा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी रायन फर्नांडिस याला फाशीची तर फ्रान्सिस डिसा, राजेंद्र सिंग, सचिन परब या तिघा आरोपींना ८ जून २००७ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर आरोपींनी वरील शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले. त्यावेळी तत्कालीन न्या. ए. पी. लवंदे आणि यू. व्ही. बाक्रे यांनी १७ डिसेंबर २०१२ रोजी रायन याला दिलेली फाशीची शिक्षा रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर इतर आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर सर्व आरोपींनी १४ वर्षे शिक्षा पूर्ण केल्याचा दावा करून त्याना लवकर मुक्त करण्यासाठी राज्य शिक्षा पुनरावलोकन मंडळाकडे अर्ज केला होता. त्यानंतर १६ जून २०२१ रोजी मंडळाने चारही आरोपींना लवकर मुक्त करण्यास नकार दिला. या आदेशाला आरोपी रायन याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०२३ रोजी मंडळाचा आदेश रद्द करून रायन फर्नांडिस याची सुटका केली आहे.