‘जीएचआरडीसी’कडून १,४५९ स्थानिकांना नोकऱ्या !

सरकारकडून अडीच वर्षांत महामंडळावर सुमारे ९५.७१ कोटींचा खर्च


28th March 2023, 12:11 am
‘जीएचआरडीसी’कडून १,४५९ स्थानिकांना नोकऱ्या !

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी : गेल्या अडीच वर्षांच्या काळात राज्य मनुष्यबळ विकास महामंडळाने (जीएचआरडीसी) १,४५९ स्थानिक युवकांना विविध प्रकारच्या नोकऱ्या मिळवून दिल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार दिगंबर कामत यांनी विधानसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट केले आहे. शिवाय या काळात महामंडळावर सरकारने सुमारे ९५.७१ कोटींचा खर्च केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.            

सुरक्षा रक्षक, इन्पॅनल्ड, एमटीएस, कॅज्युएल वर्कर, ज्युनियर ऑफीस असिस्टंट, अटेंडंट, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, लिफ्ट ऑपरेटर, स्टेनोग्राफर आदी प्रकारच्या १,४५९ नोकऱ्या महामंडळाने गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत स्थानिक युवकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. युवकांना नोकरीसाठी या महामंडळाचा मोठा आधार असल्यामुळे सरकारही महामंडळाला भरभरून निधी देत असते. अडीच वर्षांच्या काळात सरकारने या महामंडळावर सुमारे ९५.७१ कोटींचा खर्च केलेला आहे. त्यात कर्मचारी वेतन आणि भत्त्यांसाठी सुमारे ८३.९८ कोटी, करांवर सुमारे ७.४५ कोटी, बाँड चार्जेसवर १.२६ कोटी, कार्यालयासाठी १.४० कोटी, उपकरणांसाठी ९८.९३ लाख, प्रशिक्षणासाठी ११.४५ लाख, कॉम्प्युटरसाठी ६९ हजार, हाऊसकिपिंगसाठी १७.२८ लाख, प्रवासासाठी १४.७२ लाख, कोविड रिलीफ फंडसाठी ११.८९ लाख याशिवाय इतर गोष्टींसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.             

दरम्यान, राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी ‘जीएचआरडीसी’ची स्थापना केली. आमदार असल्यापासूनच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या महामंडळाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती आल्यानंतर या महामंडळामार्फत स्थानिक युवकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. महामंडळाअंतर्गत युवकांना विविध प्रकारच्या नोकऱ्यांसाठी आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांना सरकारी किंवा खासगी क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जातो. शिवाय चांगले वेतन आणि इतर काही सुविधाही देण्यात येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या महामंडळाकडे स्थानिक युवकांचा ओढा वाढत असल्याचेही सातत्याने दिसून येत आहे.

अशा दिल्या नोकऱ्या    

सुरक्षारक्षक : ६७३            

इन्पॅनल्ड : ३९९            

एमटीएस : २०५            

कॅज्युएल वर्कर : ११०            

ज्युनियर ऑफीस 

असिस्टंट : ३९            

अटेंडंट : २१            

प्लंबर : ४            

इलेक्ट्रीशियन : ३             

लिफ्ट ऑपरेटर : ३            

स्टेनोग्राफर :

एकूण १,४५९

हेही वाचा