ओडिशातून सायबर गुन्हेगाराच्या आवळल्या मुसक्या

पणजी: एका साध्या 'टेक्स्ट मेसेज'च्या माध्यमातून डिजिटल दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा गोवा गुन्हा शाखेने पर्दाफाश केला आहे. डीटीडीसी (DTDC) पार्सल डिलिव्हरीचा बहाणा करून गोव्यातील एका व्यक्तीला ८५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या सुशांत ऋषिकेश भुये (३८) याला ओडिशातून अटक करण्यात आली आहे. या कारवाईने टेक्नोलॉजीच्या मुखवट्या लपून सामान्य लोकांच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा छडा लागला आहे.
हे प्रकरण २७ डिसेंबर २०२५ चे आहे. गोवा वेल्हा येथील एका तक्रारदाराने गुन्हा शाखेकडे दाद मागितली होती. तक्रारदाराला त्यांच्या मोबाइलवर 'तुमचे डीटीडीसी पार्सल पुन्हा पाठवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा' असा बनावट मेसेज आला होता. त्या लिंकवर क्लिक करताच तक्रारदाराच्या खात्यातून ८५,२३८ रुपये लंपास करण्यात आले. या घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा शाखेने भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-ड अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तांत्रिक तपासादरम्यान गुन्हेगाराचे धागेदोरे ओडिशात असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने थेट ओडिशा गाठले आणि संबलपूर जिल्ह्यातील थेरकोलोई परिसरातून सुशांत भुये याला शिताफीने ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याच्या मोबाइलची तपासणी केली असता तपासी अधिकारीही चक्रावून गेले. संशयित सुशांत हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नव्हता, तर तो 'बल्क एसएमएस' सुविधेचा वापर करून देशभरातील हजारो लोकांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढत होता.
त्याच्या मोबाइलमध्ये केवळ पार्सल फसवणुकीचेच नव्हे, तर 'हनी ट्रॅपिंग', क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट्स, ऑनलाइन गेमिंग पेआउट आणि अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने पाठवलेले शेकडो फिशिंग मेसेज आढळले आहेत. लोकांची मानसिकता ओळखून त्यांना वेगवेगळ्या आमिषांच्या लिंक पाठवून तो जाळ्यात ओढत असे. ३ जानेवारी २०२६ रोजी त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार आणि यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निरीक्षकमहेश गडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथक या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेत आहे.