मंत्री बाबूश यांच्यावरील खटल्याचा निवाडा ३० जानेवारीला

लैंगिक अत्याचार प्रकरण : सुनावणी पूर्ण, निकाल राखून

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th January, 11:16 pm
मंत्री बाबूश यांच्यावरील खटल्याचा निवाडा ३० जानेवारीला

म्हापसा : पणजीचे आमदार तथा मंत्री आतानासियो (बाबूश) मोन्सेरात यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. या खटल्याचा अंतिम निवाडा सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी ३० जानेवारी २०२६ रोजीपर्यंत राखून ठेवला.

न्यायालयात दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण

सोमवारी (दि. ५) मेरशी येथील उत्तर गोवा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी मंत्री मोन्सेरात उपस्थित होते. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता रॉय डिसोझा यांनी, तर प्रतिवादींतर्फे अॅड. दामोदर धोंड आणि अॅड. अनुप कुडतरकर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायालयाने सर्वांची बाजू ऐकून घेत निकाल ३० जानेवारीपर्यंत राखून ठेवला.

२०१६ मधील गंभीर आरोप

२०१६ मध्ये एका १६ वर्षीय पीडित मुलीने संशयित आरोपी बाबूश मोन्सेरात यांनी गुंगीचे औषध देऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीनंतर पणजी महिला पोलिसांनी मोन्सेरात यांच्यासह इतर दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

खटल्याचा तपशील आणि कलमे

घटक माहिती / कलमे
लावलेली कलमे IPC ३७६, ३४२, ५०६, पोक्सो कलम ४, IT कायदा ६७ बी
आरोपपत्र २५० पानी विस्तृत आरोपपत्र दाखल
साक्षीदार सुमारे ४० जणांची साक्ष नोंदवली
महत्त्वाची तारीख ३० जानेवारी २०२६ (अंतिम निकाल)

आरोप निश्चिती आणि खटल्याचा प्रवास

महिला पोलिसांनी या प्रकरणात उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. संशयितांनी याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र तो अर्ज मागे घेतल्यानंतर कनिष्ठ न्यायालयात खटला सुरू झाला. मोन्सेरात यांच्यासह इतरांविरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे आरोप निश्चित करून ही सुनावणी पार पडली असून आता सर्वांचे लक्ष ३० जानेवारीच्या निकालाकडे लागले आहे.

#BabushMonserrate #GoaNews #CourtVerdict #PanajiMLA #POCSOCase