मोपातील टॅक्सी सेवेची नोटीस कायम!

नोटीस रद्द करण्याच्या मागणीची याचिका फेटाळली


27th March 2023, 12:18 am
मोपातील टॅक्सी सेवेची नोटीस कायम!

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी सेवेत सहभागी होण्यासाठी सरकारने ५ जानेवारी २०२३ रोजी नोटीस जारी केली होती. ही नोटीस पेडणे तालुक्यातील टॅक्सी चालकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी जारी करण्यात आली आहे. तर सरकार मोटार वाहन कायद्याचे पालन करून टॅक्सी सेवा सुरू करणार असल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दिली. सबंधित याचिका अकाली असल्याचे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने याचिका फेटाळली आहे.

या प्रकरणी राहुल कोलवाळकर, विठ्ठल कोरगावकर, सुदीप ताम्हणकर याच्यासह १३ जणांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी राज्य सरकार, वाहतूक खाते, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, पेडणे येथील क्षेत्रीय वाहतूक प्राधिकरण, मोपा विमानतळ विकास प्राधिकरण आणि जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनीला प्रतिवादी केले होते.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पिवळी काळी टॅक्सी स्टॅण्ड सुरू करण्यासाठी याचिकादार सुदीप ताम्हणकर यांनी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सबंधित यंत्रणेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर त्यांनी अनेकदा सबंधित सरकारी यंत्रणेकडे अधिसूचना जारी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ५ जानेवारी २०२३ रोजी विमानतळ सुरू करण्यात आला. असे असताना राज्य सरकारने पिवळी काळी टॅक्सी स्टॅण्डबाबत काहीच केले नाही. दरम्यान, राज्य सरकारने त्याच दिवशी वर्तमानपत्रावर नोटीस जारी केली. त्यानुसार सरकारने विमानतळावर काळी -पिवळी ऐवजी निळी टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच पेडणे तालुक्यातील व्यावसायिकांना त्यात सहभागी होण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज मागवले. त्यानंतर याचिकादाराने पुन्हा सबंधित यंत्रणेकडे पत्रव्यवहार करून वरील नोटीस रद्द करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य न केल्याने याचिकादाराने खंडपीठात याचिका दाखल करून ५ जानेवारी २०२३ रोजी जारी केलेली नोटीस रद्द करण्याची मागणी केली. या संदर्भात खंडपीठात सुनावणी झाली असता, अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी वरील माहिती खंडपीठात दिली. याची दखल घेऊन खंडपीठाने निर्देश जारी करून याचिका फेटाळून लावली.