अर्थसंकल्प येत्या बुधवारी !

आजपासून अधिवेशन; सत्ताधारी-विरोधकांत जुंपण्याची शक्यता

|
27th March 2023, 12:43 Hrs
अर्थसंकल्प येत्या बुधवारी !

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : राज्य विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्री​ डॉ. प्रमोद सावंत बुधवारी (दि. २९ मार्च रोजी) विधानसभा सभागृहात २०२३-२४ चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानीही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रासाठी समाधानकारक आर्थिक तरतूद असेल, असा विश्वास जनतेला वाटत आहे.       

दरवेळीप्रमाणे यावेळीही विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून वादंग उठले. गेल्या वर्षभरात गोमंतकीय जनतेला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. त्यावर परिपूर्ण चर्चा करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी अधिक दिवसांचा असावा, असे मत विरोधी आमदारांनी मांडले होते. परंतु, सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन अगोदर पाच दिवसांचे जाहीर केले.त्यानंतर तत्काळ त्यात बदल करून ३० मार्चला रामनवमीची सुट्टी देऊन अधिवेशन चार दिवसांवर आणले. यावरून विरोधकांकडून अजूनही सरकारवर टीकास्त्र सुरू आहे. 

पुन्हा तेच प्रश्न तापण्याची शक्यता

गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने धगधगत असलेला म्हादई प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात नव्याने तापण्याची शक्यता आहे. तसे संकेत विरोधी बाकांवरील काही आमदारांनी अगोदरच दिले आहेत. म्हादईप्रश्नी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा ठपका विरोधकांकडून कायम आहे.       

राज्यातील बेरोजगारीचा दर वाढतच चालला आहे. यावरूनही विरोधी आमदार सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.       

गत अर्थसंकल्पातील अनेक घोषणा सरकारकडून पूर्ण झालेल्या नाहीत. त्यावरून जनतेतही​ काही प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे त्यावरूनही विरोधी आणि सत्ताधाऱ्यांत जुंपण्याची शक्यता आहे.       

वीज, पाणी आदींसारख्या मूलभूत प्रश्नांवरूनही काही भागांतील जनतेत संतापाचे वातावरण आहे. या प्रश्नांवरूनही विरोधी तसेच काही सत्ताधारी आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे.       

संख्येने कमी असले, तरी गत अधिवेशनात विरोधी आमदार सरकारला भारी पडले होते. चार दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची पुनरावृत्ती दिसणार की सत्ताधारी आक्रमक होणार, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.

आमदारांकडून ८०३ प्रश्न       

अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी २०७ तारांकित आणि ५९६ अतारांकित, असे एकूण ८०३ प्रश्न आमदारांनी विचारलेले आहेत.      

सकाळच्या सत्रात प्रश्नोत्तरे, शून्य प्रहर असेल. पहिल्या दिवशी श्रद्धांजली ठराव, अभिनंदन प्रस्ताव, तसेच पुरवणी मागण्यांवर चर्चा असेल.       

अधिवेशनात सरकारची सुमारे आठ विधेयके चर्चेला येणार आहेत. सभागृहात सरकार पक्षाकडे पूर्ण बहुमत असल्यामुळे या सर्व विधेयकांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत २९ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर पुढील चार महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून घेतले जाईल. अर्थसंकल्पावर जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात चर्चा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी याआधीच जाहीर केले आहे.