कोलवाळ भंगारअड्ड्यांना आरोग्य केंद्राची नोटीस

अवैध कारणासाठी वीज जोडणी मिळवल्याचे प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th March 2023, 12:30 Hrs

म्हापसा : आरोग्य कायद्यांतर्गत घरगुती कारणासाठी दिलेला वीज पुरवठा इतर अनधिकृत कारणासाठी वापरला जात आहे. या प्रकरणी येत्या सात दिवसांच्या आत ना हरकत दाखला व वीज जोडणी संबंधित कागदपत्रे सादर करावीत, असा आदेश कोलवाळमधील भंगारअड्डेवाल्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राने दिला आहे.
कोलवाळमधील भंगारअड्डेवाल्यांनी आरोग्य कायद्यांतर्गत वीज जोडणी मिळवली आहे, असा दावा करत म्हापशातील सामाजिक कार्यकर्ते संजय बर्डे यांनी वीज खाते व भंगारअड्ड्यांच्या मालकांविरुद्ध दक्षता खात्यासह संबंधित खात्यांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन वीज खात्याने कोलवाळ प्राथमिक आरोग्य केंद्राला पत्र पाठवून भंगारअड्ड्यांनी वीज जोडणीसाठी दिलेल्या ना हरकत दाखल्याची शहानिशा करावी, असे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार आरोग्य केंद्राने कोलवाळमधील सर्व भंगारअड्ड्यांना नोटीस बजावली आहे. आरोग्य कायद्याखाली मिळवलेल्या वीज जोडणीचा दुरुपयोग करून ती अनधिकृत कारणासाठी वापरली जात आहे. त्यामुळे आरोग्य केंद्राचा ना हरकत दाखला आणि वीज जोडणी मिळवण्यासाठी सादर केलेली इतर कागदपत्रे केंद्राकडे सादर करावीत. सात दिवसांत ही कागदपत्रे सादर केली नाहीत, तर आवश्यक कारवाई केली जाईल, असा आदेश या नोटिसीतून देण्यात आला आहे.