भारतीय रंगभूमीच्या सुरुवातीचा काळ

भारतीय रंगभूमीला कित्येक शतकांची परंपरा आहे. खंडप्राय असलेल्या आपल्या देशातील रंगभूमीची एकच एक निश्चित प्रतिमा दर्शविणे कठीण आहे. भाषा, रितीरिवाज, धर्म, पंथ यातील भिन्नता आणि सरमिसळ यांच्या परिपाकातून विविध प्रांतातील नाट्य प्रयोग सिद्ध झाले. स्वाभाविकच त्यामुळे त्यात विविधता दिसून येते. अशा विविधतेतील एकता असलेल्या भारतीय संस्कृतीतील भारतीयत्व लक्षात घेऊन इथे प्राचीन रंगभूमीचे नाट्य दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे.

Story: जागतिक रंगभूमी | श्रीधर कामत बांबोळकर |
18th March 2023, 11:19 Hrs
भारतीय रंगभूमीच्या सुरुवातीचा काळ

भरतमुनींचा 'नाट्यशास्त्र' हा भारतातील प्राचीन रंगभूमीवर भाष्य करणारा आद्यग्रंथ मानला जातो. 'रसस्वादातून सौंदर्यानुभूती येते' असे प्रमेय मांडून त्यांनी या ग्रंथात रससिद्धांताची प्रक्रिया विशद केली आहे.

 संस्कृत नाटकांच्या निर्मिती बरोबरच समाजात विशेषत: बहुजन समाजात जे मनोरंजनाचे प्रकार व्हायचे, ते बंद झाले नाहीत. बाराव्या-तेराव्या शतकाच्या सुमारास संस्कृत नाट्य निर्मितीला आरंभ झाला.

इ.स. बारा-तेराव्या शतकात मराठी, हिंदी, बंगाली, आदी आधुनिक भारतीय भाषांचा विकास होऊन त्यातून साहित्य निर्माण होऊ लागले आणि त्याचबरोबर संस्कृत भाषेतल्या साहित्य निर्मितीला ओहोटी लागली.

काही शतकांत भारतीय नाटकांचा घुसमटलेला आपला श्वास काही प्रमाणात मोकळा करण्याचा प्रयत्न केला तो ब्रिटिशांच्या राजवटीत. ब्रिटिशांनी भारतावर कमी अत्याचार केले नाहीत, पण ते करताना ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्यातली एक म्हणजे लोककलांवर बंदी घातली नाही. यामुळे भारतीय नाटक आपली मुळे धरून टिकली, वाढली.

 मुळाव्या अवस्थेतल्या वेगवेगळ्या नाट्यप्रकारांनी घोळणाऱ्या मराठी रंगभूमीला निर्णायक व निश्चित स्वरूपाचे वळण लावण्याचे काम १८४३ या वर्षी नाट्याचार्य विष्णुदास भावे यांनी केले. त्यांच्या 'सीता स्वयंवर' या नाटकाचा प्रयोग कर्नाटकी नाटकाच्या नमुन्यावर तयार झाला. दशावतार, यक्षगान आदी लोककलांच्या अवलोकनातून त्यांच्या नाटकांची सुरुवात झाली.

 'विष्णुदासी परंपरा' मराठी रंगभूमीची सुरुवात ठरली. ५ नोव्हेंबर, १८४२ रोजी 'सीता स्वयंवर' नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीला झाला. म्हणून पाच नोव्हेंबर हा 'मराठी रंगभूमी दिन' म्हणून साजरा केला जातो. परंतु मराठी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे सादरीकरण सांगली, गोवा, इलीचपूर, तंजावर आदी नेमक्या कोणत्या स्थळी झाल्याच्या नोंदीबद्दल भरपूर वाद झालेत आणि ते चालूच आहेत. परंतु त्यांच्या नाट्यप्रयोगांची परंपरा जास्त काळ तग धरू शकली नाही. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी स्वतःची अशी 'रंगवाट' निर्माण केली. ती भविष्यकाळात विस्तारत राहिली.

१८४७ च्या सुमारास मुंबई, कलकत्ता, मद्रास या शहरांत इंग्रजी विद्यापीठे स्थापन झाली. इंग्रजी आणि संस्कृत भाषेतल्या साहित्याचा अभ्यास नव्या नजरेतून आस्थेने सुरु झाला. या भाषांमधील चांगल्या, उत्कृष्ट नाट्यकृतींचे अनुवाद आणि रूपके करण्यात आली. 'वेणीसंहार', 'शाकुंतल', 'मुद्राराक्षस', 'मृच्छकटिक' या नाटकांची रूपांतरे झाली. शेक्सपियरच्या सगळ्या नाटकांची भाषांतरे करून रंगमंचावर सादर झाली. प्रेक्षकांची अभिरुची बदलली. नाटक बदलले. मराठी रंगभूमीच्या सुरुवातीच्या ५० ते ६० वर्षांमध्ये संस्कृत आणि आंग्ल नाटके रंगमंचाच्या प्रेरणांवरच जगली. संगीत नाटक, गद्य नाटक प्रामुख्याने ऐतिहासिक, सामाजिक, काल्पनिक विषयांवर लिहून झाली. हे साधारण १९२० पर्यंत घडत गेले. विसाव्या शतकाची पहिली दोन शतके ही संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ ठरली.

१९३३ या वर्षी नाट्य मन्वंतर या संस्थेने 'आंधळ्यांची शाळा' या नाटकाचा प्रयोग करून मराठी रंगभूमीला एक वास्तव दिशा देण्याचा डोळस प्रयत्न केला. हा नाट्यप्रयोग मराठी प्रयोगशील रंगभूमीची मुहूर्तमेढ करणारा ठरला.

 आधुनिक भारतीय रंगभूमीची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर घडविण्यासाठी आपल्या कितीतरी रंगकर्मींनी योगदान दिले. दिल्लीत स्थापना झालेल्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाशी संबंधित अनेक नाट्यकर्मींनी यासाठी पुढाकार घेतला. बदलणाऱ्या संदर्भातल्या कथानकाला धारदार करण्यासाठी नव्या नाट्य भाषेचा शोध, शैली आणि  प्रयोगशीलता साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

 बंगालीतून बादल सरकार, मनोज मित्रा, शंभू मित्रा, उत्पल दत्त; गुजरातीतून गोवर्धन पांचाळ, जयवंत ठाकर, मार्कंड भट्ट; हिंदीत हबीब तन्वीर, बी. व्ही. कारंथ, इब्राहिम अलकाजी, सत्यदेव दुबे, प्रसन्ना, बन्सी कौल; कन्नडमध्ये चंद्रशेखर कंबार, गिरीश कर्नाड, के.व्ही. सुबण्णा, बी. व्ही. कारंथ; मल्याळममधून जी. शंकर पिल्ले, के. एन. पण्णीकर, मणिपुरीतून कनय्यालाल, रतन थिय्यम; मराठीतून विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, विजया मेहता, जब्बार पटेल, पु. ल. देशपांडे; कोंकणीतून  पुंडलिक नायक, प्रकाश थळी, श्रीधर बांबोळकर आणि इतर या सगळ्यांनी एक सार्थक रंगनजर राखून आपली ओळख घडवली 

आणि आपल्या अस्मितेची पुनर्प्रतिष्ठा करण्यासाठी सृजनशील धडपड आपल्या स्वतंत्र शैलीने अधोरेखित केली.

 आजची रंगभूमी कालच्या रंगभूमी पेक्षा खूप वेगळी आहे. पूर्वी रंगमंचावर मशाली, दिवट्या, कीटसन वा पुढे पेट्रोमॅक्सच्या उजेडात नटांना कामे करावी लागत. आज प्रकाश योजना आणि नाट्यगृहात प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था झाल्याने रंगमंचावरील सगळ्या वस्तू प्रेक्षकांना दिसतात. नेपथ्यामध्ये सुधारणा होऊन पडदे, बॉक्स सेटपर्यंत नव्हे, तर वेगवेगळ्या चमत्कारांनी भरलेले नेपथ्य करण्याचे काम होते. फिरता रंगमंच, सरकता रंगमंच या तांत्रिक सोयीबरोबरच नाट्य लेखनाची सुद्धा तंत्रे बदललेली आहेत.