पोरकी सून

Story: गजाल | गीता गरुड |
18th March 2023, 11:15 Hrs
पोरकी सून

काशीचा थोरला मुलगा ज्ञानेश पुण्यात नोकरीला लागला होता. काशी आता त्याचं लग्न लावून द्यायच्या विचारात होती. दोघीचौघींजवळ तिने तिच्या सुनेविषयीच्या अपेक्षा बोलूनही दाखवल्या होत्या. "फार काय अपेक्षे नाय आसत माजे सुनेकडसून. आपल्या सग्यासोयऱ्यांवांगडा जुळवून घेणारी व्हयी. माझ्या झिलार जीवापाड पिरेम करनारी व्हयी. झिल माझो कसो गोरोपान, उंचोपुरो हा, राजपुत्रावानी गमता. तेका शोभात असा तिचा रुप व्हया. रुपान दोन आंगळा पाठी आसली तरी येक पाऊट चलात पन गुनान बरी व्हयी. मुलकातला कोन तेंच्या खोलीर गेला तर आपुलकीन तेंची उठबस करनारी व्हयी."

ऐकणाऱ्या बायाबापड्यांना काशीचं म्हणणं पटे पण अशी रुपवान, गुणवान पोरगी त्यांच्या नजरेसमोर येत नव्हती. कदमांच्या वासंतीने तिच्या दिराच्या मुलीविषयी सुचवलं. मुलगी बारावी पास होती. घरकाम, शेती सगळं करायची तिला सवय होती. "बघ बाय कासले, पोरग्या शेतीची सगळी कामा करता. शिकूची लै हौस हुती पन बापसान फुढे शिकवल्यान नाय. पोरीच्या जातीक जास्ती शिकून काय करूचा हा म्हनान घरात ठिवल्यान. आव्स सदीची आजारी तेकारनान घरातला, भायरला सगळी कामा येकटीन वढता. तुझ्या ज्ञानेशाक पसंत पडली तर त्या रामरगाड्यातसून सुटात बिचारी. गोरीपान आसा. न्हिमरात कामा करता पन रंग कसो दुधासारो ढवळो. ज्ञानेशाच्या खांद्याक लागात इतक्या उच आसा."

काशीने ठरवलं, वासंतीच्या दिराची मुलगी सून म्हणून घरात आणायची. तिने ज्ञानेशला फोन करून मुली पहायला यायला सांगितलं. ज्ञानेश आईच्या सांगण्यानुसार आला खरा पण मुलगी बघायला येईना. काशी अगदीच आग्रह करू लागली तसं त्याने तिला सांगितलं, "आये, माजा मी जमवलय. ओगीच लोकाची पोर बघूक कशाक येव!"

ज्ञानेशचं हे बोलणं ऐकून काशीच्या छातीत धस्स झालं. आपल्या मर्जीतला आपला पोरगा एवढा मोठा निर्णय आपल्याला विचारल्याशिवाय घेतो या विचाराने ती अस्वस्थ झाली. "कुनाची पोरगी? खयच्या गावाची?" तिने विचारलं.

"आये, मुक्ताई नाव असा तिचा. मी ज्या वाड्यात रव्हतय त्या वाड्याच्या घरमालकांची भाची. तेंचे थयच रव्हता. मुक्ताईची आव्स, मुक्ताई चार वरसाची हुती तवा पोटाच्या आजारान गेली. तिच्या बापाशीन दुसरा लगीन केला. सवतर आवशीक ही नकोशी झाली. मुक्ताईचो बापूस तिका वसतिगृहात ठेवूक जाय होतो तवा मुक्ताईचे मामा तिका आजवळाक घेऊन इले."

काशीला लेकाने दिलेली ही माहिती रुचली नाही. तिने त्याला सरळ सांगितलं, "त्या मुक्ताईवांगडा लगीन करूचा असात तर तुझा तुच कर. मिया काय येवचय नाय तुझे टकलेर अक्षत टाकूक." मुलाने काशीची मनधरणी केली पण काशी हट्टालाच पेटली होती. ज्या मुलीला आई नाही, भावंड नाही, जिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलंय, मुलीला जवळ करत नाहीत अशा अनाथ पोरक्या मुलीला सून म्हणून स्वीकारणं काशीच्या मनाला पटत नव्हतं. "गावात काय पोरींची कमी होती, जातीपातीतली, चांगल्या आईबापाची पोरगी करूची सोडून खोटे गुण लागले हत हेका. लिना नि भिकार चिना म्हनतत तसल्यातली गत." काशी एकटीच बडबडत राहिली. ज्ञानेश जाताना त्याच्याशी धड बोललीही नाही.

ज्ञानेशच्या लग्नाला काशी गेली नाही. वर्षातच त्याला मुलगी झाली पण नातीला बघायलाही काशी गेली नाही, लेकाशी बोलणं जे टाकलं होतं. 

काशीचा धाकटा लेक रतन, लग्नाच्या वयाचा झाला. बारावीतून त्याने शाळा सोडली होती. कुठल्याशा स्थानिक कंपनीत मामुली पगारावर चिकटला होता. काशीने ठरवलेल्या मुलीशी धाकट्याने लग्न केलं. काशीने धाकट्या सुनेला दोन तोळ्याचं मंगळसूत्र, डाळींबी खड्याची अंगठी, कानातली कुडी, असं लेणं साठवगाठव मोडून, कर्जवाम काढून हौसेने घातलं. थोरला ज्ञानेश मुक्ताईला नि मुलीला घेऊन आला होता पण काशी आपल्या धाकट्या सुनेच्या कोडकौतुकातच रममाण होती. नातीला साधा फ्रॉकही घ्यायचं तिला सुचलं नाही. दोन दिवसांतच ज्ञानेश परत आईला भेटायला यायचं नाही असा विचार करत बिर्हाडासकट कर्मभूमीकडे परतला.

धाकटीचं माहेर गावातच होतं. उठसूठ माहेराला जाऊन राहू लागली. बायको घरात नाही म्हंटल्यावर धाकट्याचाही पाय घरात टिकेना झाला. तोही सासरवाडीला जाऊन राहू लागला. अतिविचाराने काशीची तब्येत बिघडू लागली. दोन लेकांची लग्ना केलय काय दोन सुना घरात येतले मगे आराम करूक गावतलो. या तिच्या विचारांची पार धुळधाण उडाली होती. थोरल्याने गावाचं नावच टाकलं होतं तर धाकटा जणू घरजावईच झाला होता.

शेजारच्या रखमेकडे तिने धाकट्या लेकाला नि सुनेला निरोप पाठवला. आयेक बरा नाय असा. राती डाक्दराक घराकडे हाडुचा लागला. दोगांनीव घराकडे येवा पण निरोप धाकट्या लेकाकडे पोहोचलाच नाही, त्याच रात्री तो सासूसासऱ्यांसोबत सपत्नीक तीर्थयात्रेसाठी निघाला होता. काशीच्या पोटातलं दुखणं वाढतच होतं. तिला असह्य वेदना होत होत्या. डॉक्टरांनी तिच्या जवळच्या माणसांना बोलवायला सांगितलं तसं थोरल्याच्या घरी एकाने फोन लावला. थोरल्याच्या पत्नीने, मुक्ताईने फोन घेतला.

सासूच्या आजारपणाबाबत कळल्यावर मुक्ताई नवऱ्याला म्हणाली, "तुमची आई आजारी आहे. तिला घेऊन येऊ इकडे." नवरा म्हणाला, " तू नकोयसं नं तिला. आपल्या मुलीला बघायला तरी आली का!"

मुक्ताई म्हणाली, "मागचं काढायची ही वेळ नव्हे नि ती चुकली असली तरी ती आई आहे आपली. आई म्हणजे काय असतं ते आईच्या मायेविना एखाद्या रानगवतासारखं वाढलेल्या माझ्यासारखीला विचारा." मुक्ताईचं बोलणं ऐकून थोरल्याचा कंठही दाटून आला. मुलीला मामाआजोबांकडे ठेवून ती दोघं गावाकडे रवाना झाली.  

डॉक्टरांची परवानगी घेऊन काशीला पुण्याच्या नामांकित इस्पितळात भरती केलं. सगळ्या तपासण्या करण्यात आल्या. अल्सरचं निदान झालं. औषधंं, गोळ्या, पथ्यपाणी नि थोरल्या सुनेचं जीव लावणं याने काशीची तब्येत सुधरू लागली.

धाकटा लेक रतन व धाकटी सून एकदा येऊन काशीला पाहून गेले पण धाकट्याने आपल्या बायकोची तब्येत ठीक नसल्याने दादा तू आईला तुझ्याकडेच ठेव म्हणून सांगितले नि गावाकडे परतला. ज्ञानेशने रतनचं बोलणं आईला कळू दिलं नाही.

मुक्ताई रोज रात्री काशीला सोबत करायची. सकाळी काशी उठली की तिचे केस हलक्या हातींनी विंचरून वेणी घालून द्यायची. तिच्यासाठी नाश्त्याला साजूक तुप घातलेली रव्याची पेज करून आणायची, सफरचंदाच्या, संत्र्याच्या फोडी करून तिला खाऊ घालायची. काशी बरी होत होती तसं तिच्या जीभेची गेलेली चव परत येत होती. मुक्ताई डॉक्टरांची परवानगी घेऊन सासू काय मागेल ते तिच्यासाठी करून आणत होती. 

मुक्ताई तिच्या सासूची करत असलेली सेवाशुश्रुषा पाहून वॉर्डमधल्या नव्याने एडमिट झालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्या दोघी मायलेकीच वाटायच्या. काशी स्वत:हून मग त्यांना मुक्ताई माझी थोरली सूनबाई आहे व माझी कशी काळजी घेते ते कौतुकाने सांगायची. मायलेकातला अबोला तर कधीचा वितळून गेला. मामाआजोबा छोट्या आर्याला घेऊन येऊ लागले. आर्याही आपल्या इवल्याशा बोटांनी आजीचे गाल गोंजारू लागली.

 "आता मह्यनाभर तरी पुण्यातनं हलायचं नाही." काशीला थोरल्याच्या घराकडे आणलं तशी मामाआजोबांनी तिला ताकीद दिली. 

"मी तर आज्जीला कध्धीच कुठ्ठे जाऊ देणार नाही."आजीच्या गळ्यात हात टाकत आर्या म्हणाली. काशीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. ज्यूस घेऊन आलेल्या मुक्ताईला तिने आपल्या शेजारी बसवलं. तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली, "लेकी, आईविना पोर तू याचकारनान माका तू सून म्हनान नुको हुतस पन माज्या आजारपनात माजी आव्स झालंस नि माजे डोळे उघाडलस. जमलाच तर माफ कर माका."

मुक्ताईने सासूचे डोळे पुसले व म्हणाली, "आई, मांजरीचे दात तिच्या पिल्लांना कधी लागतात का! तुमच्या रुपात मला माझी आई परत मिळाली. आता एकच विनंती, इथून पुढे आम्हाला कधीही अंतरू नका!"

समाप्त