महिलांचा उन्हाळ्यातील आहार

मार्च महिना म्हटला की हिवाळा संपून न उमगताच उन्हाळ्याची चाहूल लागते. उष्णता एवढी वाढते की रखरखत्या उन्हात बाहेर निघायचं म्हणजे अंगावर नुसता शहारा येतो. वाढत्या गर्मीत अन्न, त्वचा आणि एकूणच निरोगीपणाला प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः आजकाल वाढत्या कामाचे ओझे सहन करणार्‍या महिलांनी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे.

Story: आरोग्य | डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
18th March 2023, 12:47 am
महिलांचा उन्हाळ्यातील आहार

नाेकरदार तसेच बाजार-खरेदी, उन्हाळ्यातील पदार्थ तयार करण्यासाठी, सूर्यप्रकाशात बराच वेळ घालवावा लागणाऱ्या व अशा अनेक कर्तव्ये पार पाडण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या महिलांना, रोज वाढत्या उष्णतेची तडजोड करत या काळात, मासिक पाळीचा थकवा, आम्लता, डोकेदुखी यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे वृद्ध महिलांनी व जास्तकरून गरोदर महिलांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. 

गरोदरपणात शरीरातील तापमान नियमित करणाऱ्या, रक्त प्रवाह संस्थेत प्रचंड बदल घडलेले असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात गरोदर मातांनी विशेष काळजी घ्यावी. गरोदरपणात रक्तदाबाचे नियंत्रण, मेंदूमधील रक्तदाबाचे ऑटो रेग्यूलेशन बदललेले असते, यामुळे उष्माघाताचा धोका वाढतो. निर्जलीकरण, उलट्या, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, तोंड कोरडे पडणे, मूर्च्छा आणि चक्कर येणे यादेखील समस्या निर्माण होऊ शकतात. तर आपण आज उन्हाळ्यात महिलांनी आहारासंबंधी घेण्याच्या काळजीबद्दल जाणून घेऊया.

आहारात कोणते घटक असावेत?

अशा गर्मीत खरं तर काहीही खायची इच्छा होत नाही, फक्त थंड पेये प्यावीशी वाटतात. अशा वेळी शरीराला गरज लागते थंडावा देणाऱ्या व उष्णता कमी करणाऱ्या पदार्थांची. ज्यामुळे पित्त, मळमळ, उलट्या किंवा डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही. म्हणून, उष्णता वाढताच आहारात काही बदल त्वरित केले पाहिजेत. गर्मीमुळे पचनप्रक्रिया मंद झाली असल्याने जड, गरम पदार्थ खाणे टाळावे. 

पचनास सोपे असे हलके जेवण आहारात घ्यावे. बाजरी, नाचणी, मूग यासारखे थंड गुणधर्म असलेले पदार्थ खावेत. शिवाय, शरीर थंड होण्यास मदत करणारे जेवण, जसे की गायीचे दूध, वरणभात, खिचडी यांचे सेवन करावे. तळलेले, मसालेदार, चमचमीत फास्ट फूड किंवा शीतपेयापासून परावृत्त रहावे. कारले, कढीपत्ता, कांदा, काकडी, गाजर, पुदिना आणि हिरवी किंवा लाल कोशिंबीर यांचा आहारात समावेश करावा.

आहाराचे नियोजन कसे करावे?

गर्मीमुळे मंद झालेल्या पचनक्रियेचा सामना करण्यासाठी या काळात आहाराचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. वेळ पाळून आहार सेवन केल्याने एकाचवेळेस पचनप्रक्रियेवर तणाव येत नाही, पचनास सोपे पडते व वेळोवेळी शरीराला ऊर्जा मिळते. घेतलेला आहार सहज पचण्यासाठी २ ते ३ वेळा थोडासा घ्यावा. एकाचवेळी भरपेट जेवणे उन्हाळ्यात टाळावे. उन्हाळ्यासाठी आपल्या पोषणाचे नियोजन करण्याचा विचार करावा.

द्रव पदार्थांचे सेवन वाढवावे

उन्हाळ्यात पुरेसे द्रव पदार्थ प्यावे. कारण उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास डिहायड्रेशनची स्थिती होऊ शकते. 

दिवसभरात पुरेसे म्हणजे ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या थंड केलेले पाणी प्यावे. जसे की वाळा, मातीच्या मडक्यातील पाणी, यामुळे शरीराचे तापमान आपसूकच कमी होते आणि शरीरात आर्द्रता टिकून राहते. गरोदरपणात शरीराचे तापमान वाढल्यास त्याचा परिणाम गर्भावर होऊ शकतो. त्याकरिता पुरेशी काळजी घ्यावी. मात्र फ्रिजमधील थंडगार पाणी पिऊ नये. शरीरातील पाण्याची पूर्तता आणण्यासाठी विविध आरोग्यदायी पेये जसे कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, विविध फळांचे रस, नाचण्याचे आंबिल, गूळ घालून तयार केलेले कैरी पन्हे इत्यादी पेयांचे उन्हाळ्यामध्ये सेवन करावे. दुध, दही, ताक, लस्सी, तुप यांचा वापर आहारामध्ये करावा, ज्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते.

चौरस आहार घ्यावा

उन्हाळ्यात संतुलित आहार ठेवावा ज्यातून सर्व पोषक तत्वे मिळू शकतात. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही आहारातून हे मिळू शकतात. पण प्रत्येक पदार्थ प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. कोशिंबीर, फळे, पालेभाज्या या सर्वांचा आहारात नियमित समावेश करावा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये द्राक्षे, टरबूज, कलिंगड, करवंदे, फणस, आंबे, डाळिंब यासारखी फळे खावीत. ज्यामध्ये अनेक उपयुक्त पोषकघटक म्हणजे व्हिटॅमिन्स, खनिजे, अँटी ऑक्सिडंट आणि फायबर्स असतात.

उन्हाळ्यात काय खाऊ नये?

उन्हाळ्यात वातावरणातील एकूण उष्णता वाढली असल्याने आपल्या शरीरातील वात, पित्त, कफ या तीन दोषांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे मुळातच उष्ण गुण असलेला पित्तदोष वाढतो व निसर्गतःच थंड गुणाच्या वात व कफदोषांचे शमन होते त्यामुळेच हे तीन दोष समतोल राहण्याच्या दृष्टीने उन्हाळ्यात आपला दररोजचा आहार म्हणजे खाणेपिणे व विहार म्हणजे हिंडणे-फिरणे असले पाहिजे. साबूदाणा, वरई, पोहे, चुरमुरे, कोरडे पदार्थ खाणे टाळावे. गरम मसाला, सुके खोबरे किंवा शेंगदाणा कूट घालून केलेल्या भाज्या आहारात कमी ठेवाव्यात. पापड, लोणची, ठेचा, कोरड्या चटण्या, मांसाहारी पदार्थ, सोयाबीन, नट्स, खवा किंवा साखरेचा पाक असलेले गोड पदार्थ टाळावेत. 

उन्हाळ्यातील उष्णतेमुळे महिलांमधील चिडचिड होऊ शकते. शरीर चांगला प्रतिसाद देत नाही. अशा वेळेस जास्तीची कामं करणे टाळावीत. दुपारच्या वेळी वेळ काढून थोडी विश्रांती घ्यावी. पण जर जास्त थकवा, वाढलेले हृदयाचे ठोके, चक्कर येणे, उलट्या होणे किंवा घाम येणे अशी लक्षणे दिसून आल्यास लगेच डॉक्टरांची भेट घ्यावी कारण ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात.