माहितीतल्याच किचन टिप्स.. आठवणीकरिता

Story: घराबद्दल बरेच काही | गौरी भालचंद्र |
18th March 2023, 12:43 am
माहितीतल्याच किचन टिप्स.. आठवणीकरिता

एकदा स्वयंपाक घरात गेलं की स्वयंपाक झाल्याशिवाय बाहेर यायचं नाही किंवा कॉलवर बोलायचं नाही कारण तुम्ही कॉलवर बोलत बसलात किंवा बाहेर बोलत बसलात तर तुमच्या लक्षात राहणार नाही की गॅसचं बटण चालूच आहे आणि जेव्हा वस्तू जळाल्याचा वास येईल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल, तोपर्यंत ती वस्तू पूर्ण जळालेली असेल.

जेवणं बनवताना नेहमी केस बांधावे, कारण कदाचित टीव्हीवरच्या मालिका बघून तुम्हाला वाटेल, जेवणं बनवणं किती छान आहे पण वस्तुस्थिती एकदम विरुद्ध असते. केस मोकळे ठेवले तर लोकांना स्वादिष्ट जेवणांसोबत एक केसं फ्री असं होईल. स्वयंपाकघरात नेहमी पंखा असला पाहिजे. जेवण बनवताना मीठाची बरणी नेहमी डोळ्यासमोर ठेवावी.

सगळ्या वस्तू आणि स्वयंपाकाचे जिन्नस एकत्र हाताला चटकन मिळावेत म्हणून स्वयंपाकाचा ओटा हाही बारीकसारीक गोष्टींचा विचार करून केलेलाच असायला हवा. स्वयंपाक घराला नेहमी दरवाजा किंवा पडदा असला पाहिजे कारण जेव्हा नवीन-नवीन स्वयंपाक शिकणारे किंवा नवीन-नवीन लग्न झालेली मुलगी किंवा एखादा नवा शेफ प्रोफेशनवाईज आपल्या स्वतःच्या घरातील किचनमध्ये नवनवे प्रयोग करत असेल, तेव्हा घरातील इतर लोकांना मध्येमध्ये लुडबुड करायची सवय असते किंवा प्रत्येक पाच मिनंटाला स्वयंपाकाची काय प्रगती आहे हे तपासायला येतात. अशाने स्वयंपाक बनवणाऱ्या नवशिक्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स लो होतो, त्यांचा आत्मविश्वास डगमगायला लागतो, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशनने जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघराला दरवाजा असणं फार गरजेचं.

सगळ्यात महत्त्वाचे दूध तापायला ठेवून कुठेही जाऊ नये. दूध तापायला ठेवून जर कुठे जाण्याची गरज पडलीच तर दुधाच्या भांड्यात स्टीलचा चमचा ठेवावा. चमच्याद्वारे दुधातील वाफेला बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो व सायीखाली वाफ अडकत नाही व दूध उतू जात नाही.

स्वयंपाकाचा मेनू आदल्या दिवशीच ठरवून ठेवा, म्हणजे ऐनवेळी गोंधळ होणार नाही.  बाजारातून आणलेल्या भाज्या लगेच स्वच्छ धुवून, निवडून डब्यांमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवून टाका. कोथिंबीर सूरी पेक्षा कात्रीने फार छान चिरली जाते. हिरव्या मिरचीला अधिक दिवस सुरक्षित ठेवण्यासाठी प्रथम त्या पाण्याने चांगल्या धुवा आणि नंतर त्यांचे देठ वेगळे करा. हे पूर्णपणे साफ केल्यावर, एखाद्या वृत्तपत्राचा कागद हवाबंद डब्यात घाला किंवा लपेटून घ्या आणि या मिरच्या ठेवा. या मिरच्या २० ते २५ दिवस खराब होणार नाहीत.

चपात्या  बनवल्यानंतर बऱ्याच वेळानंतर त्या कडक होतात. त्यासाठी, आल्याचे  काही तुकडे पोळीच्या डब्यामध्ये ठेवल्यास आणि त्यावर एखादा कापड किंवा नॅपकिन ठेऊन मग त्यावर चपात्या ठेवा. मऊ आणि ताजेपण टिकवून ठेवतात.

काही काळ गरम पॅनवर लसूणच्या कळ्या ठेवा, सोलणे सहज होईल. बटाटा टिक्की अधिक कुरकुरीत करण्यासाठी, बटाट्यात एक चमचे रवा मिसळा. चिंच कोरडी करा आणि त्याचे गोळे  बनवा, काही मीठ लावा. चिंच बराच काळ सुरक्षित असेल.

वस्तुचं काम झालं ती लगेच जागेवर ठेवावी, नाहीतर पसारा आवरायलाच इतका वेळ लागेल की ते पदार्थ खाण्याआधीच थंड होऊन जातील. मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी साधं मीठ त्यात ग्राईण्ड करावे. रवा नेहमी हलके भाजून घ्या आणि तो डब्यामध्ये ठेवा, अधिक काळ टिकेल. 

स्वयंपाकघरातील स्वच्छतेवर आपलं आरोग्य अवलंबून असते. किचनमध्ये नियमित ओटा, भांडी, गॅसची शेगडी स्वच्छ ठेवण्याकडे आपला कल असतो. त्याचप्रमाणे किचन टॉवेल नियमित स्वच्छ करणं आवश्यक आहे. टॉवेल सुकल्यानंतर पूर्ण कोरडा झाल्यानंतर वापरा.

स्वयंपाकघरातील भांडी किंवा डबे बराच वेळ स्वच्छ न केल्यास ते चिकट होतात. मग जर ते सामान्य पद्धतीने स्वच्छ केले तर ते व्यवस्थित साफ केले जात नाहीत. अशा परिस्थितीत, आपण त्यांच्यामध्ये कोणताही माल ठेवू शकत नाही. तुमच्या स्वयंपाकघरातही असे डबे असतील तर तुमच्यासाठी ही एक टिप आहे, ज्याचा वापर करून डब्यातील ग्रीस काढता येईल. स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी चहा पावडर खूप उपयुक्त ठरू शकते.

जेव्हा जेव्हा आम्ही चहा बनवतो तेव्हा आम्ही वापरलेली चहाची पावडर फेकतो, मात्र ती वंगणयुक्त भांडी साफ करण्यासाठी उपयुक्त आहे. आपल्याला फक्त उर्वरित चहाची पावडर पुन्हा एका पात्रात उकळवावी लागेल. नंतर त्यात डिशवॉश पावडर मिसळून त्याचा वापर केल्यास भांड्याचा चिकटपणा जातो.

कोणत्याही घरात स्वयंपाकघर या जागेला विशेष महत्त्व आहे. कारण माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे. हे अन्न रुचकर स्वरुपात मिळाले तर माणसाला आनंद होतो. त्याच्या जगण्याचा उत्साह वाढतो. संबंधित व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. यामुळे मानवी आयुष्यात स्वयंपाक घराला महत्त्व आहे. घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंपाकघर. सणवार असो वा वाढदिवस जोपर्यंत स्वयंपाकघरातून घमघमीत सुगंध पसरत नाही तोपर्यंत कशालाच मजा नाही.