ओंजळ

Story: मनातलं | प्रतिभा कारंजकर |
18th March 2023, 12:37 am
ओंजळ

हल्लीच कुंकळीच्या तिरूपती मंदिरात जाण्याचा योग आला. तिथे मंदिरात देवासमोर हाताची ओंजळ करून डोळे मिटून उभी असलेली एक दाक्षिणात्य स्त्री दिसली. दुपारची शांत नीरव वेळ ती परमेश्वराशी एकरूप होऊन मनातल्या मनात स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी काहीतरी मागणे मागत असावी त्यासाठी हाताची ओंजळ तिला पुरेशी होती. इतक्यात कुणीतरी गोविंदा गोविंदाचा गजर केल्याने तीची समाधी भंग पावली. हाताची ओंजळ मिटून तिने पुनः एकदा देवाला नमस्कार केला.

 दोन्ही हाताचे तळवे जोडून तयार होणारी ओंजळ खरं तर खूप गोष्टींचे द्योतक असते. आकाराने जरी ती छोटीशी दिसत असली, तरी मानाने ती खूप मोठी असते. ओंजळ हे आपल्या संस्कृतीत दातृत्वाचं प्रतीक रूप आहे. तृषार्त जीवाची ओंजळभर पाण्याने तृप्ती होते, भुकेल्या माणसाला ओंजळभर अन्न मिळालं तरी पुरतं. त्याने त्याची क्षुधा शांती होते. ओंजळ ही समर्पणाची भावना शिकवते. पहाटेच्या पारी दारी आलेल्या वासुदेवाच्या झोळीत ओंजळभर धान्य घालायची आपली परंपरा. खेडोपाडी अजूनही कुणीही भिकारी, अतिथी दारी आला की घरची गृहिणी ओंजळभर धान्य, पीठ देताना दिसते. आता जरी हे चित्र पुसट होत चालले असले, तरी विद्याभ्यास करणारा भिक्षुक विद्यार्थी  माधुकरी मागून त्यावर  चरितार्थ चालवताना समाजात अजूनही काही ठिकाणी बघायला मिळतो.

 ओंजळ एक हाताची असेल तर ती अधिक छोटी होते जी आपण तीर्थ किंवा प्रसाद घेताना वापरतो. मंदिरात मिळणारे तीर्थ या ओंजळीत घेऊन माथ्यावर हात पुसतो. कोणत्याही पूजेच्या वेळी गुरुजी सांगतात तेव्हा आचमन करायला एका हाताच्या ओंजळीत पळीने पाणी घेतो. ते पाचवेळा घेऊन नंतर ताम्हणात सोडतो. किंवा श्राद्ध वगैरे विधीमध्ये तर्पण देताना एकाच हाताची ओंजळ वापरतात. आणि पाणी सोडताना अंगठ्यावरून सोडतात. जेवणानंतर मुखशुद्धीसाठी बडीशेप किंवा सुपारी याच ओंजळीत घेतो. 

बहुतेक वेळा आपण दोन्ही हातांची ओंजळच वापरतो. सूर्याला अर्ध्य देताना पाणी दोन्ही हाताची ओंजळ करून सोडतात. आरती नंतर निरांजनाच्या ज्योतीमधून परमेश्वराचा आशीर्वाद घेताना ओंजळीत घेऊन तो चेहऱ्यावर सामावून घेतो. माणसांच्या अनेक कृतींशी आणि भावनांशी ओंजळीचं घट्ट नातं आहे. लग्नात कन्यादानाच्या पवित्र वेळी मुलीचे आईवडील मुलाच्या आईवडिलांच्या हाताच्या ओंजळीत आपल्या हाताच्या ओंजळीतून पाणी सोडतात. हे दानाचे महत्त्व सांगणारी सर्वात पवित्र कृती. हे दान स्वीकारणारेही हाताच्या ओंजळीतच त्याचा स्वीकार करतात. दान स्वीकारायला ही ओंजळच लागते. 

ओंजळ संदेश देते-आधी दान द्या आणि मग घ्या. अशाने ओंजळ कधीच रिती होणार नाही. करसंपुटी, करतल, अंजली अशी अनेक नावे आहेत ओंजळीला. असं म्हणतात, या ओंजळीत ब्रम्हांड मावते म्हणूनच सकाळी सकाळी उठल्यावर ही हाताची ओंजळ करून "कराग्रे वसते लक्ष्मी करमद्धे सरस्वती, कर मुले तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम" म्हणायला सांगणारी आपली संस्कृती आहे. ती कीती योग्य आहे. बोटांच्या अग्राशी लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि मुळाशी गोविंद आहे असं या ओंजळीचं महत्त्व आहे. 

आपली सुख दुखे:ही या ओंजळीत मावतात. मनाच्या तळाशी दडलेले भावनांचे कल्लोळ ओंजळीत पेलता येतात. प्रियजनांचे हात ओंजळीत घेतले की वेगळीच अनुभूती येते. खूप दुख: झाले की ओंजळीत चेहरा लपवून अश्रूंना वाट मोकळी करून देतो. तर कधी लाजरा साजरा मुखडा लाजून ओंजळीत लपवतो.

 परमेश्वराने खऱ्या तृप्तीचे किंवा समाधानाचे परिमाण या ओंजळीद्वारे ठरवून दिले असावे असं मानलं पाहिजे. देव जर प्रसन्न झाला आणि वर माग म्हणाला तर रास्त मागणी देवापर्यंत पोहोचवायची असेल तर 'पोटापुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी; देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी' असं दान मागितलं पाहिजे. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी साऱ्या जगताच्या कल्याणासाठी देवाकडे पसायदान मागितलं. ओंजळ हे तृप्तीचं प्रतीक आहे.