बागलकोटमधून चोरलेली मिनी टेंपो पकडली मोले नाक्यावर

कुळे पोलिसांची कारवाई : संशयिताला बागलकोट पोलिसांकडे केले सुपूर्द

|
30th January 2023, 11:59 Hrs
बागलकोटमधून चोरलेली मिनी टेंपो पकडली मोले नाक्यावर

मोले येथे पकडलेल्या चोरीच्या मिनी टेंपोसोबत संशयित चालक, निरीक्षक संजीव दळवी व पोलीस.

प्रतिनिधी । गोवन वार्ता

फोंडा : कुळे पोलिसांनी सोमवारी दुपारी बागलकोट येथून चोरीस गेलेली रिक्षा मोले चेकनाक्यावर पकडली. रिक्षा चोरून आणलेला अनंत बुका (३०, रा. म्हैसूर) याला कुळे पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरा बागलकोट पोलिसांच्या स्वाधीन केले. निरीक्षक संजीव दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय धुरी व अन्य पोलिसांनी ही कारवाई केली.       

प्राप्त माहितीनुसार, बागलकोट येथे दि. २९ जानेवारी रोजी केए १७ डी ८९०७ क्रमांकाची रिक्षा चोरीस गेल्याची तक्रार रिक्षा मालकाने तेथील पोलीस स्थानकात दिली होती. सोमवारी दुपारी अनमोड घाटातून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या सदर रिक्षाने एमएच ०२ एफआर ७९९६ क्रमांकाच्या कारला धडक दिली. अपघातानंतर चालकाने रिक्षा घेऊन पळ काढला. यावेळी अन्य वाहन चालकांनी रिक्षा रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु रिक्षा चालकाने सरळ मोले चेकनाके गाठले. 

चेक नाक्यापासून सुमारे दीड-दोन किलोमीटर अंतरावर तैनात पोलिसांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. तेथील पोलिसांना चुकवून रिक्षा चालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्वरित चेक नाक्यावरील पोलिसांना माहिती देऊन गेट लावण्याची विनंती केली.  त्यामुळे रिक्षा गेट समोर येऊन धडकल्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. यासंबंधी कुळे पोलिसांनी बागलकोट पोलिसांना माहिती दिल्यानंतर संध्याकाळी येथील पोलिसांनी संशयित रिक्षा चालक व रिक्षा ताब्यात घेतली. रात्री उशिरा संशयित रिक्षा चालकाला बागलकोट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई कुळे पोलीस निरीक्षक संजीव दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.