खासदार नवनीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित


31st January 2023, 12:00 am
खासदार नवनीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

मुंबई : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुंबईतील शिवडी न्यायालयाने नवनीत राणांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित केले आहे. तसेच, न्यायालयाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

नवनीत राणांनी उमेदवारी अर्जाबरोबर दिलेली जात प्रमाणपत्र हे बोगस असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईत शिवडी न्यायालयात सुनावणी पार पडली. तेव्हा, नवनीत राणांच्या वडिलांच्या पुकारा करण्यात आला. पण, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही त्यांना अटक झाली नाही. तसेच, ते न्यायालयात हजरही झाले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले. आता हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या निवासस्थानी न्यायालयाची नोटीस लावण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा ही अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यात फेरफार करून अनुसूचित जाती (एससी) चे प्रमाणपत्र अवैधरित्या मिळवले. ते प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज भरताना दाखल करण्यात आले. याप्रकरणी नवनीत राणा यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात नवनीत राणांसह त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेसही आरोपी आहेत.