म्हादईप्रश्नी सत्य जनतेसमोर येण्याची गरज : सरदेसाई

सभागृह समितीची बैठक तत्काळ बोलावण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th January 2023, 12:17 am
म्हादईप्रश्नी सत्य जनतेसमोर येण्याची गरज : सरदेसाई

मडगाव : केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हादईचे पाणी वळवण्यात गोवा सरकारची संमती असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांकडून यावर योग्य उत्तर मिळत नाही. त्यामुळे जलस्रोतमंत्री शिरोडकर यांनी सभागृह समितीची बैठक तत्काळ बोलवावी. यात मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण द्यावे. म्हादईप्रश्नी सत्य जनतेसमोर येण्याची गरज आहे, असे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
कर्नाटकला पाणी वळवण्यास अनुमती देत म्हादईप्रश्न सोडवण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकमधील जाहीर सभेत दिली. यावेळी पाणी वळवण्याचा निर्णय हा गोवा सरकारच्या सहमतीने झाल्याचेही शहा यांनी सांगितले. यावरुन विरोधकांनी रान उठवले आहे.
गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृह समितीच्या बैठकीची मागणी केली. सरदेसाई म्हणाले की, सभागृह समितीची निर्मिती ही म्हादईप्रश्नी चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी केलेली आहे. कर्नाटकातील सभेत शहा यांनी गोवा सरकारला सोबत घेत कर्नाटकाला पाणी वळवण्याची संमती दिलेली असल्याचे वक्तव्य केले. यामुळे गोव्यातील लोकांची झोप उडालेली आहे. यावर विरोधकांनी राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितले. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी केलेले वक्तव्य खोटे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगणे गरजेचे होते. पण मुख्यमंत्र्यांनी योग्य स्पष्टीकरण दिलेले नाही. गोमंतकीयांच्या जीवनदायिनीचा प्रश्न असतानाही राज्य सरकार त्यावर गंभीर नाही. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सभागृह समितीची बैठक बोलवावी, अशी मागणी करत सरदेसाई यांनी सदस्य या नात्याने पत्र पाठवून मागणी केल्याचे सांगितले. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी सांगितल्याप्रमाणे कर्नाटकला पाणी वळवताना कुणाला याची माहिती देण्यात आलेली होती, याची माहिती जनतेसमोर येण्याची गरज आहे. त्यामुळे सभागृह समितीची बैठक बोलावून चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असेही सरदेसाई यांनी सांगितले.