५०० मीटरच्या कच्च्या रस्त्यामुळे गावात येत नाही बालरथ!

वडामळ - भांडोळ किर्लपाल रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st April, 06:36 pm
५०० मीटरच्या कच्च्या रस्त्यामुळे गावात येत नाही बालरथ!

फोंडा : वडामळ - भांडोळ किर्लपाल येथील खड्डेमय रस्त्यावर हॉटमिक्स करण्याची मागणी अजूनही प्रलंबित आहे. २००३ साली या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. येथील सुमारे ५०० मीटर रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनल्याने बालरथ गावात जात नसल्याने विद्यार्थ्यांना चालत जावे लागत आहे. जंगल भागातून जाणाऱ्या खड्डेमय रस्त्यावर गवे दिसून येत असल्याने स्थानिकांना धोका निर्माण झाला आहे. सरकारने त्वरित ५०० मीटर रस्त्याचे हॉटमिक्स करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वडामळ येथे जाणाऱ्या रस्त्याचे हॉटमिक्स करण्यास एका व्यक्तीने विरोध दर्शविला. त्यामुळे ५०० मीटर रस्त्याचे हॉटमिक्स काम रखडले होते. सध्या खड्डेमय रस्त्याचा त्रास स्थानिक लोकांना तसेच शिरोडा, मडगाव व वेर्णा भागात जाणाऱ्या कामगारांना होत आहे.

प्रलंबित असलेल्या खड्डेमय रस्त्याचे हॉटमिक्स करण्याची मागणी स्थानिक लोकांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे. दि. १० जानेवारी रोजी सुद्धा स्थानिकांनी बांधकाम खाते, मुख्यमंत्री व अन्य खात्याला निवेदने देऊन हॉटमिक्स करण्याची मागणी पुन्हा केली होती. पण अजूनपर्यंत रस्त्याचे हॉटमिक्स करण्यात न आल्याने स्थानिक लोक संताप व्यक्त करीत आहेत.

तातडीने हॉटमिक्सिंग करा!

खड्डेमय रस्त्यासंबंधी अंदाजे ५०० मीटर रस्त्याचे हॉटमिक्स करण्याची मागणी लोकांकडून होत आहे. खड्डेमय रस्त्याचा त्रास स्थानिक तसेच या भागातून प्रवास करणाऱ्या लोकांना होत आहे. सरकारने यासंबंधी त्वरित निर्णय घेऊन रस्त्याचे हॉटमिक्स करून द्यावे, असे सुरेश सावंत देसाई यांनी सांगितले.

मतदानावर बहिष्कार नाही!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांनी खड्डेमय रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला असला तरी त्यात कोणीच राजकारण करू नये. ग्रामस्थांनी रस्त्यासाठी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. पण लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय बदलला असल्याचे सुरेश सावंत देसाई यांनी सांगितले.