पोर्तुगालला गेलेल्या ३७१ जणांची नावे मतदार यादीतून वगळली

अंतिम मतदार यादी जाहीर : देशात भारतीयांनाच मतदानाचा हक्क

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th April, 01:11 am
पोर्तुगालला गेलेल्या ३७१ जणांची नावे मतदार यादीतून वगळली

पणजी : नुकतेच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठीची राज्याची अंतिम मतदार यादी जाहीर केली. या मतदार यादीतून विविध कारणास्तव  मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यातील ३७१ जणांनी भारतीय पासपोर्ट सरेंडर करून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले आहे. यामुळे या ३७१ जणांना मतदानासाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सदर माहिती दिली आहे.                   

मिळालेल्या माहितीनुसार, ३७१ अपात्र उमेदवारांपैकी ९२ उत्तर गोवा मतदासंघांतील, तर २७९ दक्षिण गोवा मतदासंघांतील आहेत. देशात केवळ भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क आहे. त्यामुळे विदेशी नागरिकत्व स्वीकारल्यावर भारतात मतदान करता येत नाही. भारतीय पासपोर्ट सरेंडर करून विदेशी नागरिकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीला मतदान कार्ड देखील परत करावे लागते. त्या व्यक्तीने आपण विदेशी नागरिकत्व स्वीकारले असल्याचे निवडणूक आयोगाला लेखी कळवावे लागते.                  

याआधी निवडणूक आयोगाने ५ जानेवारीपासून नवमतदार नोंदणी सुरू केली होती. लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अंतिम दिवसापर्यंत नोंदणी सुरू होती. या कालवधीत मतदार यादीत १९ हजार ९४९ मतदारांची भर पडली होती. याशिवाय आयोगाने विविध कारणास्तव मतदार यादीतील नावेही वगळली होती. उत्तर गोव्यातून ३,५५५ तर दक्षिणेतून ३,९८९ अशी एकूण ७,५४४ नावे वगळण्यात आली होती. वगळण्यात आलेल्या एकूण नावांपैकी ३३५ मतदारांची नावे दोन वेळा मतदार यादीत नोंद झाली होती.                  

 याशिवाय उत्तर गोव्यात १,१६७ व दक्षिणेतून १,०२७ अशा एकूण २,१९४ मृत मतदारांची नावे देखील वगळण्यात आली आहेत. उत्तर गोव्यातून २३३ व दक्षिणेतून १४२ अशा ३७५ मतदार गायब असल्याने त्यांची नावे काढण्यात आली आहेत. ही नावे काढण्याआधी बीएलओनी मतदारांच्या पत्त्यावर जाऊन तीन ते चार वेळेस तपासणी केली होती. यानंतर त्यांच्या शेजाऱ्यांकडे चौकशी करून गायब मतदार ठरविण्यात आले होते. तसेच राज्याबाहेर स्थलांतर केलेल्या ४,२६९ जणांची नावेही मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. 

पोर्तुगीज नागरिकत्व मिळवण्यात गोमंतकीय अधिक

भारतात दुहेरी नागरिकत्वाचा कायदा नसल्यामुळे दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारताच भारतीय नागरिकत्वाचा त्याग करावा लागतो. गेल्या काही वर्षांत पोर्तुगीज नागरिकत्व मिळवण्यात गोमंतकीयाचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश मंडळी नोकरीसाठी परदेशात जातात. तेथील सुविधांमुळे नंतर तेथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतात. गोव्यात पूर्वी पोर्तुगिजांचे राज्य होते. त्यामुळे बहुतांश नागरिक पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारण्याला प्राधान्य देत आहेत. पोर्तुगीज नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांना युरोपियन देशांमधील अनेक लाभ मिळतात. भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यामागे हेही एक मुख्य कारण आहे.

सध्या भारतात दुहेरी नागरिकत्वावरून कायदेशीर वाद सुरू आहे. युरोपियन संघ सध्या कर्जाच्या संकटात सापडला आहे आणि याचा जबर फटका पोर्तुगाल सरकारला बसलेला आहे. या पार्श्वभूमीवर पोर्तुगाल सरकारला भारताशी संबंध सुधारणे हिताचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकियांना साहाय्य पुरवण्याचा बोजा गोवा सरकारवर आहे.

हेही वाचा