दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी झोकून द्या : बी. एल. संतोष

कोअर समितीच्या बैठकीत घेतला प्रचारकार्याचा आढावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th April, 01:06 am
दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी झोकून द्या : बी. एल. संतोष

पणजी : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असतानाच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी गोव्यात येऊन कोअर समितीची बैठक घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा झाली. बैठकीत संतोष यांनी राज्याच्या दोन्ही मतदारसंघांत भाजप उमेदवार निवडून येण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते आमदार, मंत्र्यांना काम करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, काही नेते पक्षासाठी काम करत नसल्याची कुणकुण लागल्यानेच संतोष तातडीने गोव्यात आल्याची माहिती आहे.
बैठकीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोवा प्रभारी आशिष सुद, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, मंत्री विश्वजीत राणे, माॅविन गुदिन्हो, दामू नाईक, नीलेश काब्राल, बाबू कवळेकर, नरेंद्र सावईकर यांच्यासह कोअर समितीमधील अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संतोष यांनी दोन्ही मतदारसंघात भाजप उमेदवार दिल्यानंतर सामान्य जनतेचे काय मत होते ? आता प्रचाराच्या दुसरा टप्पा संपत आल्यावर जनतेचे मत काय आहे? याबाबत गोव्यातील नेत्याकडून माहिती घेतली. मागील लोकसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात कोणत्या समस्या होत्या? त्या सुटल्या आहेत का? तसेच आता सामान्य जनतेला कोणत्या समस्या आहेत? त्यांच्या अपेक्षा काय आहेत याची माहितीही घेतली.
सध्याच्या घडीला दोन्ही मतदारसंघात जनतेचे काही प्रश्न, समस्या असतील तर केंद्रात मोदी सरकार पुन्हा आल्यावर त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन तेथील जनतेला देण्याच्या सूचनाही संतोष यांनी केल्या आहेत. दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून येण्यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांसह वरिष्ठ नेत्यांकडून झोकून काम करून घेण्याच्या सूचनाही संतोष यांनी दिल्या आहेत.
याशिवाय निवडणूक काळात समाज माध्यमांच्या वापरावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पक्षातर्फे काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारां विरोधी जनतेसमोर कोणते मुद्दे मांडण्यात येत आहेत ? यासाठी समाज माध्यमातून कोणते प्रयत्न सुरू आहेत ? भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टींना समाज माध्यमातून कसे उत्तर दिले जात आहे याचा आढावाही संतोष यांनी घेतला. दरम्या, संतोष दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांसोबत स्वतंत्र बैठकाही घेणार आहेत.

उद्या पंतप्रधानांची सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (दि.२७) सांकवाळ येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीबाबत बैठकीत चर्चा झाली. या सभेला राज्यभरातून ५० हजार लोक उपस्थित राहतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे व उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी बैठकीनंतर बाेलताना व्यक्त केला.

सत्तेत आल्यास काँग्रेस संविधान बदलणार!
गेल्या काही दिवसांत काँग्रेसचे उमेदवार, नेते अप्रत्यक्षपणे संविधान बदलण्याच्या गोष्टी करत आहेत. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास संविधानात बदल करेल, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला. गुरुवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तावडे म्हणाले, काँग्रेस आमच्यावर आरोप करते. मात्र, त्यांचेच उमेदवार संविधानविरोधी आहेत. दक्षिण गोव्यातील एका उमेदवाराने संविधान आमच्यावर थोपले, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत गोव्यातील मतदारांनी विचार करून मत देणे आवश्यक आहे.

होय! आम्ही घटना दुरुस्ती करणार...
काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास घटना दुरुस्ती करणार आहे. मात्र, भाजप आरोप करते तशी घटना दुरुस्ती नाही, तर दहाव्या अनुसूचीमध्ये सुधारणा करून पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनधींना तात्काळ अपात्र करणार आहोत. काँग्रेसच्या या वचनबद्धतेमुळे भाजप नेते विनोद तावडे घाबरले आहेत, असा पलटवार युरी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. भाजप नेते खोटी माहिती पसरवीत आहेत. संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस वचनबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा