केंद्राने गोव्यासाठी स्थापन केले पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th April, 09:26 am
केंद्राने गोव्यासाठी स्थापन केले पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण

पणजी : केंद्र सरकारने गोव्यासाठी ९ सदस्यीय राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्याची अधिसूचना केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाने जारी केली आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. पुरुषोत्तम पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. दीपक गायतोंडे यांची सदस्यपदी तर पर्यावरण खात्याचे संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. या समितीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.

याशिवाय प्राधिकरणाला मदत करण्यासाठी ९ सदस्यीय तज्ज्ञ मूल्यांकन समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पाश्कोल नोरोन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्यपदी डॉ. नितीन सावंत, डॉ. सुभाष भोसले, प्रसाद रांगणेकर, डॉ. जुझे फालेरो, संजय जहागिरदार, सुजीतकुमार डोंगरे, संजय आमोणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या सदस्य सचिवपदी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अभियंते असणार आहेत.

राज्यात कोणतेही मोठे प्रकल्प उभारण्यापूर्वी या प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे. प्राधिकरण प्रकल्प होणाऱ्या भागातील पर्यावरणीय प्रभावाचा अभ्यास करेल. नंतर त्या प्रकल्पाला पर्यावरणीय दाखला दिला जाईल. यानुसार महामार्ग बांधणे, मोठी टाऊनशिप, अन्य इमारत बांधकामे, कारखाने किंवा औद्योगिक वसाहत उभारणे, खाण काम अशा विविध प्रकल्पांना प्राधिकरणाची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. प्राधिकरण तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेणार आहे.

हेही वाचा