पास्टर डॉम्निककडून तडीपारीच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th May, 04:41 pm
पास्टर डॉम्निककडून तडीपारीच्या  आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान

म्हापसा : शिवोलीतील फाईव्ह पिलर्स चर्चचा पास्टर तथा बिलिव्हर्सचा स्वयंघोषित गॉड डॉम्निक डिसोझा व त्याच्या पत्नीला उत्तर गोव्यातून तडीपार करण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर या आदेशाला डॉम्निकने राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधित यंत्रणांकडे अर्जाद्वारे आव्हान दिले होते. त्याचा हा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे आता त्याने पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्याला आव्हान दिले आहे.

हेही वाचा

बिलिव्हर्सच्या पा. डॉम्निकला पत्नीसह उ. गोव्यातून तडीपार व्हावेच लागणार

डॉम्निक याच्याविरोधात २००९ सालापासून पोलिसांत ९ तक्रारींच्या आधारे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यात तीन गुन्हे धर्मांतराशी संबंधित आहेत. सडये-शिवोली येथील बिलिव्हर्सच्या फाईव्ह पिलर्स चर्चमधून पा. डॉम्निक काळ्या जादूचा वापर करून धर्मांतरण करत असल्याची तक्रार मूळ तामिळनाडूतील वडिवेल बी. (सध्या रा. कुर्टी-फोंडा) यांनी म्हापसा पोलिसांत दाखल केली आहे. याच तक्रारीला अनुसरून पोलिसांनी यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारीत डॉम्निकला अटक करत न्यायालयात हजर केले होते. तेव्हा त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.

त्यानंतर पोलिसांनी त्याला सपत्नीक उत्तर गोव्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना केली होती. ही प्रक्रिया थांबवावी, यासाठी जानेवारी २०२४ मध्ये त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तेव्हा खंडपीठाने त्यास नकार दिला होता. तसा आदेश जारी झाल्यावर खंडपीठात येऊ शकता, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश जारी केल्यानंतर डॉम्निकने राज्याच्या मुख्य सचिवांकडे अर्ज सादर केला होता. त्यात जिल्हाधिकाऱ्यांचा तडीपारीचा आदेश रद्द करावा, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, मुख्य सचिवांनीही तो अर्ज फेटाळून लावला. आता त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

हेही वाचा